आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोसंबीवर कोळीकीड; बोंडअळीनंतर शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले नवे संकट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- महाराष्ट्रातील शेतकरी अद्याप बोंडअळीच्या संकटातून बाहेर पडला नसतानाच तोच पैठण तालुक्यात पुन्हा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यासमोर कोळीकीड या मोसंबीवर पडलेल्या रोगाची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील ६० हजार हेक्टरवरील निम्या मोसंबीवर हा रोग पडल्याने शेतकऱ्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.   


तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोसंबीची लागवड व उत्पादन काढले जाते. दरवर्षी कोटीच्या वर मोसंबीतून उलाढाल होते. यंदा मात्र मोसंबीवर कोळीकीड हा रोग पडला आहे.  त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडला आहे. मोसंबी काही महिन्यांवर काढण्यास आली असताना या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. या कोळीकीडमुळे मोसंबीची वाढ खंुटली आहे. त्यामुळे आजघडीला मोसंबीच्या बागाच्या बागा वाया जाणार असल्याचे व्यापारी कौसर पटेल यांनी सांगितले.  

 

विभागाचे दुर्लक्ष  
मोसंबीवर कोळीकीड हा रोग पडला असतानाही या विषयी जनजागृती शेतकऱ्यामध्ये कृषी  विभागाने केलेली नाही.  हा रोग पाचोडसह काही भागातच पडला होता. त्या वेळीच कृषी विभागाने कीडनाशकची फवारणी करण्यासाठी जनजागृती केली असती तर या रोगाचे प्रमाण वाढले नसते, असे शेतकरी सांगत आहेत.

 

बोंडअळीनंतर मोसंबीवर रोग  
कपाशीवर बोंडअळी पडल्याने कपाशीचे उत्पादन ७० टक्के घडले आहे. आता मोसंबीवरदेखील कोळीकीड पडल्याने मोसंबीचे उत्पादन निम्मे घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

 

काय म्हणतात शेतकरी

- मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी कोळीकीड पडण्यापूर्वीच मोसंबीवर कीडनाशक फवारणी करावी. यातून हा रोग आटोक्यात येतो. मात्र एकदा हा रोग पडला  तर ती मोसंबी खराब होते.
- भाऊसाहेब पायघन,  तालुका कृषी अधिकारी

 

- मोसंबीवर कोळीकीड पडल्याने मोसंबी  उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी. 
- दत्ता गोर्डे, माजी नगराध्यक्ष 

 

- यंदा चांगला पाऊस झाल्याने मोसंबीची (अडकन ) बार मोठ्या प्रमाणावर फूट झाली आहे. परंतु  त्यावर कळ्या रोग पडला असून शेतकरी आर्थिक संकटात  सापडला आहे. कळ्या मोसंबीला मार्केटमध्ये उठाव नसल्याने व्यापारी खरेदीकडे दुर्लक्ष करत आहे. 
- कौसर पटेल, मोसंबी उत्पादक, पाचोड.

बातम्या आणखी आहेत...