आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातांसाठी सेफ्टी ऑडिट करणाऱ्यांनाही जबाबदार धरू; संभाजी पाटील निलंगेकर यांचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कमला मिल आगीसारख्या दुर्घटना घडल्यानंतर तेथील जागामालक, भाेगवटाधारकावर कारवाई केली जाते. मात्र, त्या जागेच्या औद्योगिक सुरक्षिततेचे योग्य पद्धतीने लेखापरीक्षण झाले असते, तर कदाचित हा अपघात घडलाही नसता. उद्योगांचे लेखापरीक्षण करणारे काही सेफ्टी ऑडिटर कारखान्यांच्या सोयीनुसार अहवाल तयार करून देतात. यापुढे असे अपघात झाले तर सेफ्टी ऑडिट करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला. अशा घटना टाळण्यासाठी देशात पहिल्यांदाच राज्याचे औद्यागिक सुरक्षा आणि आरोग्य धोरण तयार करण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले. 


औद्योगिक सुरक्षा अधिकाऱ्यांचा पहिला राज्यस्तरीय परिसंवाद आणि सुरक्षिततेच्या उपकरणांचे प्रदर्शन शनिवारपासून वाळूज एमआयडीसीतील मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या नानासाहेब भोगले सभागृहात सुरू झाले. याप्रसंगी निलंगेकर बोलत होते. व्यासपीठावर प्रधान कामगार सचिव राजेश कुमार, कामगार कल्याण विभागाचे सहसचिव अरुण विधळे, कामगार आयुक्त नरेंद्र पोयम, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य खात्याचे संचालक सुधाकर राठोड, म्युच्युअल एड अँड रिस्पॉन्स ग्रुपचे (मार्ग) सचिव अमित दगडे आणि अध्यक्ष जयेंद्र बिरूड उपस्थित होते. मार्ग आणि इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. निलंगेकर म्हणाले, गेल्या दोन वर्षात देशातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. राज्याचे उद्योगपूरक धोरण तसेच ४ कोटी कुशल कामगार हे याचे प्रमुख कारण आहे. या कामगारांची सुरक्षितता सरकारची जबाबदारी आहे. यामुळेच राज्याने औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य धोरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. 


कायदे कितीही केले तरी कामगार, उद्योग आणि अधिकाऱ्यांची मानसिकता बदलणार नाही, तोपर्यंत उद्योगातील स्थिती बदलणार नाही. आतापर्यंत सुरक्षेचे लेखापरीक्षण करणाऱ्यांची जाऊ द्या, पाहून घेऊ ही मानसिकता होती. मात्र, या ऑडिटमध्ये जेवढे मुद्दे नमूद केले आहेत, ते तपासलेच पाहिजेत. काही ऑडिटर कंपन्यांच्या दबावाखाली त्यांना हवा तसा अहवाल देतात. आता हे चालणार नाही. यापुढे अपघात झाला तर कंपनीचे सेफ्टी ऑडिट करणाऱ्यांचीही चौकशी होईल. ते दाेषी आढळले तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील, असा इशारा निलंगेकर यांनी दिला. औद्योगिक सुरक्षेच्या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या कंपन्या, एमआयडीसी आणि वैयक्तिक स्तरावर पुरस्कार देण्याची घोषणा त्यांनी केली. 


याप्रसंगी राज्याच्या औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य धोरणाच्या आराखड्याचे प्रकाशन करण्यात आले. निलंगेकर यांच्या हस्ते मार्गच्या औरंगाबाद शाखेच्या वेबसाइटची सुरुवात करण्यात आली. कारखाने अधिनियम १९४६ नुसार १००० ऐवजी २५० कर्मचाऱ्यांमागे एक सुरक्षा अधिकारी नेमण्याची मागणी सुधाकर राठोड यांनी केली. नवीन धोरण केवळ उद्योगापुरतेच मर्यादित न ठेवता दुकाने, आस्थापना, असंघटित क्षेत्रासाठीच उपयोगाचे ठरेल, असा विश्वास प्रधान सचिव राजेश कुमार यांनी व्यक्त केला. अमित दगडे यांनी प्रास्ताविक केले. अस्मिता पांडे व एस.के. देशमुख यांनी सूत्रसंचालन तर राम दहिफळे यांनी आभार मानले. 


प्रधान सचिवांसाठी मंत्री ताटकळले 
उद्््घाटनासाठी निलंगेकर वेळेवर आले. मात्र, प्रधान सचिव राजेश कुमार तब्बल १५ मिनिटे उशिरा आल्यामुळे मंत्र्यांनाही वाट बघण्याची वेळ आली. ते प्रेक्षकांत बसून होते. राजेश कुमार यांच्या आगमनानंतर निलंगेकर आणि अन्य व्यासपीठावर गेले. 


स्मोक डिटेक्टरची भीती
मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या सभागृहात सुरक्षेच्या दृष्टीने स्मोक डिटेक्टर बसवण्यात आले आहेत. दीपप्रज्वलन केल्यावर डिटेक्टर वाजण्याची भीती हाेती. ही बाब लक्षात घेता दीपप्रज्वलन केल्याच्या दुसऱ्या क्षणीच संयोजकांनी समई विझवली आणि बाजूला नेली. 

बातम्या आणखी आहेत...