आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजयंतीनिमित्त आज दीपोत्सव, उद्या अाठही पुतळ्यांवर पुष्पवृष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- छत्रपती शिवाजी महाराजांची ३८८ वी जयंती सोमवारी आहे. त्यानिमित्त औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने रविवारी सायंकाळी ६ वाजता क्रांती चौकातील शिवाजी पुतळ्याजवळ दीपोत्सव आयोजित केला आहे. शिवजयंतीच्या दिवशी सोमवारी सकाळी ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास यंदा प्रथमच शहरातील क्रांती चौक, जयभवानीनगर, पुंडलिकनगर, आविष्कार चौक, एन-७ सिडको आणि मुकुंदवाडी येथील शिवाजी महाराजांचे पुतळे आणि टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे. घरोघरी शिवध्वज फडकवले जाणार आहेत. 


शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा, औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समिती आदी समित्या सज्ज झाल्या आहेत. गुढीपाडव्याप्रमाणे घराघरांवर शिवध्वज लावणे, वाहनांवर भगवा ध्वज फडकावणे, घरासमोर रांगोळी काढणे व दिवाळीप्रमाणे दीपोत्सव साजरा करण्याचा सर्वांनी संकल्पच केला आहे. त्यानुसार सर्वत्र जय्यत तयारी पूर्ण केली जात आहे. औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यंदा प्रथमच क्रांती चौकातील शिवरायांच्या पुतळ्यासमोर सायंकाळी ६ वाजता दीपोत्सव आयोजित केला आहे. 


सोमवारी जयंतीच्या दिवशी सकाळी ९ वाजता ध्वजारोहण आणि शहरातील आठ ठिकाणच्या छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्यांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे. यामध्ये शहर व जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिवप्रेमींनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, अध्यक्ष विनोद पाटील, अभिजित देशमुख यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना केले. 


क्रांती चौकातील पुतळ्याच्या उंचीचा मुद्दा चर्चेत 
क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी मनपाने शिवजयंतीच्या दिवशी सकाळी ९ वाजता ठरल्याप्रमाणे भूमिपूजन करावे, अन्यथा सायंकाळी ५ वाजता समितीच्या वतीने भूमिपूजन केले जाईल, असा इशारा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने देण्यात आला आहे. 


वेरूळ येथेही फडकणार ध्वज
खुलताबाद जयंती महोत्सव समितीच्या वतीने खुलताबाद ते वेरूळ येथील मालोजीराजे यांच्या गढीपर्यंत दुचाकी वाहन मिरवणूक काढली जाणार आहे. सकाळी ९ वाजता मालोजीराजे गढीत ध्वजारोहण करण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने कळवले आहे. 

बातम्या आणखी आहेत...