आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी पाहिजे म्हणून हेच लोक रडत आले होते, आता मीच बदनाम - मंझा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नोकरी पाहिजे म्हणून हेच लोक माझ्याकडे रडत आले होते. मी प्रयत्न केले आणि आता याच लोकांनी मला बदनाम करायला सुरुवात केली आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी फसवणुकीच्या प्रकरणात अटक केलेल्या उपकुलसचिव ईश्वर मंझा याची चौकशी केली असता अशा प्रकारे उलट्या बोंबा एेकायला मिळाल्या. मंझाच्या विरोधात तीन तक्रार अर्ज आले असून त्याने आतापर्यंत आठ लोकांना फसवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. फसवणुकीचा आकडा ४० लाखांपर्यंत गेेल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. 


मंझा याच्या अटकेच्या वृत्तपत्रांतील बातम्या वाचून बुधवारी सकाळी बिडकीन येथील काही तरुण आर्थिक गुन्हे शाखेत आले होते. यातील बहुतांश तरुणांना लिपिक म्हणून नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवण्यात आले होते. २०१४ पासून हे प्रकरण सुरू असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. बिडकीन येथील शेतकरी कल्याण राठोड यांनी सहा लोकांना नोकरी लागावी म्हणून पैसे भरले होते. यात त्यांची २ मुले, २ पुतणे,२ जावई यांचा समावेश होता. राठोड यांची जमीन डीएमआयसीत गेल्यामुळे त्यांच्या परिवाराकडे मोबदल्याचे पैसे आले होते. त्यातून २७ लाख ५० हजार रुपये रोख राठोड यांनी मंझा याला दिले होते, असे राठोड यांनी सांगितले. पहिल्यांदा ११ लाख आणि दुसऱ्या वेळी १६ लाख ५० हजार रुपये असे दोन टप्प्यात हे पैसे दिले. नांदेड येथील महिलेलादेखील मंझा याने फसवल्याचे समोर आले आहे. पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर, अरुण वाघ यांचे पथक तपास करीत आहे. 


भावाच्या नावावर चेक, स्वत: घ्यायचा रोख 
पोलिसांनी केलेल्या चौकशीत, नोकरी लावून देण्याच्या नावाखाली मंझा धनादेशाद्वारे रक्कम भाऊ हिरासिंग मंझा याच्या नावाने घेत असे. रोख रक्कम ही स्वत:कडे त्याच्या घरी किंवा छावणीतील नंदनवन कॉलनीत एका महिलेच्या घरी घेतल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मंझा याचा भाऊ संजय मंझा याच्याविरोधातदेखील विविध गुन्हे दाखल असून ग्राहक मंचाच्या एका प्रकरणात त्याच्याविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...