आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेचा दावा थापच : कचरा प्रक्रिया प्रकल्प 148 दिवसांत उभा राहणे अशक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नारेगावात कचरा टाकण्यासाठी तुम्ही आम्हाला मुदत द्या. येत्या १४८ दिवसांत आम्ही डेपोतील कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभा करतो, असे आश्वासन मनपातर्फे आयुक्त दीपक मुगळीकर यांनी शुक्रवारी आंदोलकांना दिले. प्रत्यक्षात असा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी २४५ दिवस (म्हणजेच ८ महिने) लागतील, असे 'दिव्य मराठी'ने तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर समोर आले. मनपाने काल आंदोलकांसमोर प्रकल्प उभारणीचा कालबद्ध आराखडा सादर केला. त्याचा अभ्यास केला असता दिवसांची आकडेवारी म्हणजे केवळ धूळ फेक आहे. गेल्या ४ महिन्यांत निविदा निघू शकल्या नाहीत. त्या आता तातडीने निघतील, असे सांगणे म्हणजे धूळ फेक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

 

किमान सहा महिने 
अशा कामांत तांत्रिक बाबी, तपासण्या खूप असतात. नाहरकत प्रमाणपत्रे मिळवण्यासही वेळ लागतो. त्यामुळे कितीही जोमाने काम केले तरी सहा महिने लागतीलच. 
- एम. डी. सोनवणे, निवृत्त शहर अभियंता 


राष्ट्रवादीने मनपासमोर फेकला कचरा
दरम्यान, कचराकोंडीबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष दत्ता भांगे यांच्या नेतृत्वात शनिवारी मनपा मुख्यालय प्रवेशद्वारावर कचरा टाकण्यात आला. पुढील दोन दिवसांत आयुक्त व महापौरांच्या बंगल्यावर कचरा फेकू, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलनात ग्रामीण कार्याध्यक्ष रहीम पटेल, सुनील चव्हाण, अमोल साळवे, अफरोज पटेल, कैलास कुंटे पाटील, अक्षय डक, धनंजय जाधव, आनंद मगरे, अनिल बोरकर, आकाश गवई, शाहरुख बागवान आदी सहभागी होते. त्यांच्यावर सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल झाला. 


दहाव्या दिवशी नवीन ठिकाणावर कचरा टाकण्याचा आज चौथा प्रयोग 
नारेगाव डेपोत कचरा टाकणे बंद होण्यास रविवारी (२५ फेब्रुवारी) दहा दिवस होतील. या कचरा कोंडीस जबाबदार महापालिकेचा निषेध करण्यासाठी नारेगावचे आंदोलक उद्या दहावे साजरे करणार आहे. दरम्यान, याच दिवशी नव्या ठिकाणी कचरा टाकण्याचा दहावा प्रयोग होणार आहे. 


शुक्रवारी आंदोलकांशी झालेली चर्चा फिस्कटल्याने शनिवारी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, सभागृहनेते विकास जैन, आयुक्त दीपक मुगळीकर या मंडळींनी दिवसभर जागेचा शोध घेतला. खासदार चंद्रकांत खैरे यांना सोबतीला घेऊन नारेगाव येथे जाऊन आंदोलकांशी चर्चा केली. मात्र त्यांनी स्पष्ट नकार दिल्यानंतर महापौर व पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी एक जागा नक्की केली. ही जागा निर्जन स्थळी असून तेथे तीन महिन्यात प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा मनपाचा प्रयत्न राहणार आहे. 


कचरा कोंडीमुळे आता दररोज घरोघर जाऊन फक्त ओला कचरा जमा केला जाईल. सुका कचरा आठवड्यातून दोन वेळा जमा केला जाईल. तो वेगळ्या ठिकाणी नेला जाईल. प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्यापासून वीज किंवा इंधन निर्मिती केली जाणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. 


१३० घंटागाड्यांकडून कचरा संकलन सुरू , मात्र १५७ ठिकाणी जमा होतेय दुर्गंधी 
नारेगाव येथील कचराकोंडीचा वसाहतींमध्ये अजून फटका बसलेला नाही. कारण १६ तारखेपासून १३० घंटागाड्या घरोघरी कचरा गोळा करत आहेत आणि तो शहराच्या विविध भागांतील १५७ ठिकाणी टाकला जात आहे. तेथून तो उचलला जात नसल्याने तेथे ढिगारे साठले आहेत. 


मिटमिट्यात महिलांनी अंगावर रॉकेल घेतले 
शनिवारी सकाळी मनपा आयुक्तांसह सभागृहनेता विकास जैन आदींनी मिटमिटा येथील सफारी पार्कच्या जागेवर कचरा टाकता येईल का, याची चाचपणी केली. नागरिकांनी कडाडून विरोध केला. महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मनपाचे पथक परतले. या वेळी लक्ष्मण बनकर, अजबराव मुळे, बबनराव मुळे, गंगाधर चव्हाण, अण्णासाहेब वाकळे, आसाराम मुळे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 


भाजपच्या एका बड्या नेत्यामुळेच आंदोलन 
भाजपच्या एका बड्या नेत्यामुळेच नारेगावात आंदोलन सुरू असल्याचा आरोप शनिवारी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला. एरवी शहरातील प्रत्येक घटना-घडामोड माझ्यामुळेच झाली असे सांगणारे खैरे नारेगाव प्रकरणात अलिप्त असल्याचे वृत्त दिव्य मराठीने प्रसिद्ध केले. त्या पार्श्वभूमीवर खैरे यांनी थेट भाजप, काँग्रेसवर आरोप केले. ते म्हणाले की, थेट कचऱ्यात राजकारण करण्याइतपत आम्ही लाज सोडलेली नाही. मात्र भाजप आणि काँग्रेसची मंडळी कचऱ्यात राजकारण करताहेत. भाजपच्या जालन्याकडील एका बड्या नेत्यामुळेच नारेगाव येथे आंदोलन सुरू असून फुलंब्री मतदारसंघातील आजी-माजी आमदार त्यांना उचकवण्याचे काम करताहेत. त्याचबरोबर विकास आराखड्यात येथे काही बड्यांच्या जमिनी ग्रीन झोनमधून यलो झोनमध्ये गेल्या आहेत. ही मंडळी आंदोलकांना रसद पुरवत आहेत. खैरे यांनी शनिवारी नारेगावात आंदोलकांशी पाऊण तास चर्चा केली. जिल्ह्यात फक्त नारेगावचीच जागा शिल्लक आहे का? असा सवाल महिला आंदोलकांनी केल्यानंतर ते परतले. 

बातम्या आणखी आहेत...