आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- मराठवाड्यातील उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांना रविवारी अवकाळी पावसाने झोडपले. पावसाचा सर्वाधिक फटका उस्मानाबाद जिल्ह्याला बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. तुळजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतीपिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले. झाडे उन्मळून पडली. होर्टी येथे वीज पडून तीन म्हशी दगावल्या. उस्मानाबाद तालुक्यातील राघुचीवाडी येथे शनिवारी रात्री वादळामुळे अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाली. विद्युत खांब कोसळल्याने नागरिकांना रात्र अंधारात जागून काढावी लागली. उमरगा तालुक्यात दुपारी चिंचोली जहागीर येथे वीज पडून बैलजोडी दगावली.
शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अपसिंगा, कात्री, कामठा व बोरी या गावांमध्ये चक्रीवादळाने थैमान घातले. अपसिंगा गावातील जवळपास सर्वच घरांवरील पत्रे उडून गेेली. अनेक झाडे उन्मळून पडली. विजेच्या तारा तुटल्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात जागून काढली. अपसिंगा गावाला चक्रीवादळाने तडाखा दिला. पत्रे लागून ७-८ ग्रामस्थ किरकोळ जखमी झाले. अपसिंगा येथील महेंद्र सोनवणे यांची बैलजोडी वादळामुळे विहिरीत पडून जखमी झाली. बैलांना जेसीबीच्या मदतीने विहिरीतून काढण्यात आले. महादू गाडेकर, भागवत सोनवणे यांच्यासह सात-आठ ग्रामस्थ जखमी झाले. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा परिसरात शनिवारी (दि.१४) मध्यरात्री वादळी वारा व गारपिटीने आंबा व टरबुजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झाडे मुळासकट उन्मळून पडली. बारूळ, होनाळा, वडगाव लाख, खंडाळा, जवळगा, मोर्डा, तडवळा, कार्ला, वानेगाव, हंगरगा तुळ, काक्रंबावाडी आदी गावात रात्री ११ ते १.३० दरम्यान सुमारे दोन तास मेघगर्जनेसह वादळी वारे व गारपिटीने झोडपून काढले.
लहान-मोठे बंधारे भरले
वादळी पावसामुळे काक्रंबा परिसरातील अनेक लहान-मोठे बंधारे तुडूंब भरले आहेत. नदी-नाले वाहू लागले आहेत. अवकाळीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान कृषी विभागाकडून कृषी सहायक अनिल पवार यांनी नुकसानीची पाहणी केली आहे.
नांदेडमध्ये पाऊस, हदगावला गारपीट
नांदेड शहराच्या काही भागात रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. शहर व परिसरात रविवारी दिवसभर कडक ऊन पडले होते. सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. सहाच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पाऊस सुरू होता. हदगाहदगाव तालुक्यात गारपीट झाली. या पावसामुळे अंबा व हळद पिकांचे नुकसान झाले.
हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस
रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास हिंगोली तालुक्यातील फाळेगाव, कनेरगाव नाका या भागांसह कळमनुरी शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. हिंगोली तालुक्यातील फाळेगाव, कनेरगाव, अंबाळा, आडगाव आदी भागात हा पाऊस झाला. तर याच दरम्यान कळमनुरी येथेही जोरदार पाऊस झाला. कळमनुरी शहरालगतच्या अनेक गावांमध्येही हा पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबा, संत्रा, मोसंबी आदी फळपिकांचे नुकसान झाले.
परभणीत वादळी वारे
परभणी शहरासह परिसरात रविवारी (दि.१५) सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वारे व विजांचा कडकडाटात पावसाला सुरवात झाली. जिल्ह्याच्या काही भागात हलक्या पावसानेही हजेरी लावली. शहरात वादळी वाऱ्यामुळे होडिंग्ज उखडून पडल्या. रस्त्यांवर धुळीचे लोटच पसरले होते. वादळामुळे ढग पांगले गेले. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी अशी स्थिती होती. काही ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.