आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस, गारपीट; अंबा पिकासह गुहू पिकाचे मोठे नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गेल्या दोन दिवसांपासून होणारा उकाडा व ढगांच्या दाटीनंतर रविवारी (दि. अाठ) दुपारनंतर बीड, उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. बीड जिल्ह्यातील आष्टी आणि शिरूर तालुक्यांत काही गावांत वादळी वाऱ्यासह  गारपीटही झाली. आष्टीतील   ब्रह्मगाव परिसरात वादळ, गारांसह अवकाळी पाऊस पडला. तर सिरसाळा (ता. परळी) येथे जाेरदार वादळी वाऱ्याने पिकांचे नुकसान झाले.


बीड :  दोन तालुक्यांना गारपिटीचा तडाखा
बीड शहरात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण हाेते. दुपारी दाेननंतर सोसाट्याचा वार सुटून  काही वेळातच पावसाने हजेरी लावली. अाष्टी  तालुक्यातील ब्रह्मगाव, कासेवाडी, आंबेवाडी, हाजीपूर, भाळवणी, पांगुळगव्हण, करंजी, कऱ्हेवाडी या भागाला पावसाचा तडाखा बसला आहे.  सिरसाळा येथे दिवसभर वादळी वारा, मेघगर्जना सुरू होत्या. मात्र पावसाने  हुलकावणी दिली.  दुपारी तीनच्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी झाली. ४ वाजता काळोख पसरला.  वादळी वारा व आकाशात ढगांचा गडगडाट सुरू होता. वादळामुळे प्रचंड धूळ उडाली. मात्र, पाऊस झाला नाही. सकाळपासूनच विस्कळीत झालेला वीजपुरवठा दिवसभर सुरळीत झाला नव्हता. 


 आष्टी, शिरूरमध्ये गारपीट
आष्टीसह शिरुर तालुक्यातील काही भागांमध्ये गारपीट झाली. सलग दुसऱ्या दिवशी बीड जिल्ह्यात  अवकाळी पावसाने हजेरी लावली.  दुपारनंतर शिरुर, आष्टी तर सायंकाळी परळी तालुक्यातील सिरसाळा परिसरात हलका पाऊस झाला. आष्टीतील ब्रह्मगाव,करंजी तर शिरुर तालुक्यातील रायमोहा परिसरात गारपीट झाली. इतर भागात  ढगांची गर्दी तर कुठे हलकासा शिडकावा झाला.

 

उस्मानाबाद : अनेक ठिकाणी गारांचा पाऊस
 उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी रविवारी  सायंकाळी  पावसाने थैमान घातले.   शहरात सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान  वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.     लोहारा येथे शनिवारी मध्यरात्री आणि सोमवारी पावसाने हजेरी लावली.    सास्तूर, मुर्षदपूर, कोंडजीगड, एकोंडी, कास्ती, होळी, रेबेचिंचोली, नागूर या भागात शनिवारी रात्र गारांचा पाऊस झाला.

 

डिघोळ अंब्यात वीज पडून चार जण जखमी
 अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळ अंबा शिवारात  शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून चार जण गंभीर जखमी झाले.  रविवारी सायंकाळी सत्यजित गोमदे, फुलाबाई गोमदे, भागवत गोमदे, अशोक माने हे सर्व जण शेतात काम करत असताना सायंकाळी दहा वाजेच्या दरम्यान त्यांच्या अंगावर वीज पडली.  त्यांना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले.

 

जवळे दुमाला : घरांचे नुकसान
 संध्याकाळी सहाच्या दरम्यान जवळे (दु. ) येथील रहिवाशी असलेले अरुण रामा काळे व राजेंद्र देविदास दळवी या दोघांच्या घरांचे वादळी वाऱ्यांमुळे पत्रे उडून आर्थिक नुकसान झाले.  

 

बातम्या आणखी आहेत...