आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांची एक टोळी पकडताच दुसरी झाली सक्रिय, दुकान फोडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छताचे पत्रे उचकटून शिरले; सिगारेट पीत चोरले पैसे, मोबाइल - Divya Marathi
छताचे पत्रे उचकटून शिरले; सिगारेट पीत चोरले पैसे, मोबाइल

औरंगाबाद- छताचे पत्रे उचकटून चोरटे दुकानात शिरले. शांतपणे सिगारेट पीत हजारो रुपयांचे मोबाइल चोरल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री टाऊन हॉलजवळील उड्डाणपुलाखाली असलेल्या मोबाइल शॉपीमध्ये घडली. शनिवारी सकाळी दुकान उघडले असता हा प्रकार उघडकीस आला. ११०० रुपये रोख आणि ग्राहकांचे दुरुस्तीला आलेले ३० ते ४० हजार रुपयांचे मोबाइल चोरीला गेल्याची नोंद बेगमपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 


गारखेडा आणि जवाहरनगर परिसरात दुकानाचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलांची टोळी गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारीच गजाआड केली. आता शहरातील दुकाने फोडण्याचे सत्र थांबेल, असे वाटत असताना पोलिसांना आव्हान देत पुन्हा मोबाइल दुकान फोडल्याची घटना घडली. शेख फैरोद्दीन शेख नसिरोद्दीन (२५, रा. आसेफिया कॉलनी) यांचे टाऊन हॉल येथे गोल्डन मोबाइल शॉपी नावाचे दुकान आहे. शेख आजारी असल्याने मागील दोन दिवसांपासून दुकान बंद होते. हीच संधी साधत चोरट्यांनी छताचे पत्रे उचकटत दुकानात प्रवेश केला. दुकानातील गल्ल्यामध्ये ठेवलेली रक्कम व मोबाइल लंपास केले. सकाळी शेख दुकान उघडण्यासाठी आले असता हा प्रकार समोर आला. दुकानात अकराशे रुपये रोख आणि दुरुस्तीसाठी आलेले ३० ते ४० हजार रुपयांचे मोबाइल होते, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. बेगमपुरा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. ठसे तज्ज्ञांना देखील बोलावण्यात आले होते. 


घटनास्थळी सिगारेटची थोटके 
दुकानाच्या काउंटरवर सिगारेट पिऊन थोटके टाकलेले दिसले. चोरट्यांनी छताचे पत्रे उचकटून अगदी दोन ते अडीच फुटांची जागा करत प्रवेश केला. तेथे सिगारेट पिऊन चोरी केली. या चौकात रात्री एक वाजेपर्यंत वर्दळ असते. शिवाय रात्रभर वाहनांची ये-जा सुरूच असते. असे असतानादेखील चोरट्यांनी हे दुकान फोडले. 


दुकानफोडीचे सत्र थांबेना 
जवाहरनगर, गारखेडा, पुंडलिकनगर या भागात मागील महिनाभरापासून दुकानफोडीचे सत्र सुरू आहे. शहर व परिसरात गेल्या महिनाभरात तीसपेक्षा अधिक दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे दुकानदारांनी धसका घेतला आहे. काही दुकानांच्या सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाल्यानंतर तीन आरोपींना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला या चोरट्यांनी आव्हान दिले आहे.