आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखो भाविकांच्या उपस्थितीत इज्तेमा कार्यक्रमाला सुरुवात; गर्दी होऊनही सर्वकाही शिस्तबद्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- गंगापूर तालुक्यातील वाळूजलगतच्या लिंबेजळगाव येथील तब्लिगी इज्तेमा कार्यक्रमाला लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शनिवारी प्रारंभ झाला. फजरच्या नमाजनंतर दिल्लीतील निजामुद्दीन मरकजचे हजरत मौलाना साद सहाब व मौलाना युसूफ कंदलवी यांनी मार्गदर्शन केले. इज्तेमा कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी सुमारे साडेआठ लाख भाविकांनी हजेरी लावली. लाखोंच्या संख्येत भाविकांची गर्दी होऊनही सर्वकाही शिस्तबद्ध होते. त्यामुळे नगर -औरंगाबाद महामार्गाच्या दक्षिणेला राज्यस्तरीय इज्तेमा कार्यक्रमाचे जिल्हा कमिटीच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान हा तीनदिवसीय इज्तेमा कार्यक्रम होत आहे. 


या धार्मिक कार्यक्रमासाठी भव्य दिव्य सोयी-सुविधा व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. राज्यस्तरीय इज्तेमा कार्यक्रम असल्याने १० ते १२ लाख भाविकांची गर्दी होणार हे गृहीत धरून सुविधा केल्या गेल्या आहेत. त्यादृष्टीने आयोजन कमिटीने विविध उपाययोजना केल्या आहेत. तब्बल ९१ लाख ६५ हजार ६०० चौरस फूट जागेत मंडप टाकण्यात आला आहे. जमातमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी तीन स्वतंत्र मंडपांची व्यवस्था करण्यात आली आहे. इतर देशांतून व परप्रांतातून आलेल्या तसेच व्हीआयपींसाठीही स्वतंत्र मंडपांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होऊनही कोणताही अनुचित प्रकार किंवा घटना घडली नाही. 


मरकजचे हजरत मौलाना साद सहाब यांनी केले मार्गदर्शन 
पहाटे फजरची नमाज झाल्यानंतर दिल्लीतील निजामुद्दीन मरकजचे हजरत मौलाना साद सहाब यांनी मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी कुराण या पवित्र ग्रंथातील शिकवण, अल्लाहची भक्ती आदीसंदर्भात सखोल मार्गदर्शन केले. राज्यस्तरीय इज्तेमासाठी दररोज शेकडो वाहनांतून मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव इज्तेमासाठी एकत्रित आले आहेत. इज्तेमाकडे येणारे रस्ते वाहनाच्या गर्दीमुळे फुलून गेले असून ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहने थांबवून स्वयंसेवक व नागरिक या भाविकांना थंड पाणी, खाद्यपदार्थ, थंडपेय आदींचा पाहुणचार करून त्यांचे आदरातिथ्य करताना दिसून येत आहेत. या इज्तेमास्थळी भाविकांनी गर्दी केल्यामुळे इज्तेमाचा परिसर गर्दीने फुलला आहे. एवढा मोठा जनसमुदाय इज्तेमामुळे एकत्रित आल्याने अनेक जण भारावून गेले आहेत. 


कार्यक्रमावर सीसीटीव्हीचे लक्ष 
भाविकांना तीन वेळा विकत जेवण दिले जातेे. त्यात एकाच वेळी ८० हजार भाविक जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. १०४ डायनिंग हाॅल तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण कार्यक्रमस्थळावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी ठेवण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन जोपर्यंत तयार केलेले जेवण तपासून त्याचे सर्टिफिकेट देत नाही तोपर्यंत जेवण करू दिले जात नाही. आरोग्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे अाहे. भाविकही तिची अंमलबजावणी करीत आहेत. 


आज होणार ५ हजार जोडप्यांचे विवाह 
औरंगाबाद-
रविवारी २५ फेब्रुवारी रोजी जाेहरच्या नमाजनंतर दुपारी ३ वाजेच्या सुमारास विविध जिल्ह्यातून आलेल्या ५ हजार जोडप्यांचे सामुदायिक विवाह सोहळा दिल्ली मरकजचे प्रमुख उलेमा हजरत मौलाना साद यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. इस्लाम धर्माच्या शिकवणीनुसार विवाह सोहळ्यात अनावश्यक खर्च करण्यास पूर्णपणे वर्जीत आहे. 

 

पवित्र कुराणाची शिकवणच खऱ्या जीवनाचा मार्ग दाखवू शकते : हजरत मौलाना साद 
औरंगाबाद ।
लिंबेजळगाव येथे सुरू असलेल्या तब्लिगी इज्तेमासाठी देश विदेशातून लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव जमा झाले आहे.या इज्तेमामध्ये देश विदेशातील उलेमा मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी इज्तेमाच्या पहिल्या दिवशी सकाळच्या फजरच्या नमाजनंतरच्या आपल्या मार्गदर्शनपर बयानमध्ये दिल्ली मरकजचे प्रमुख उलेमा हजरत मौलाना साद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की प्रत्येकाने पवित्र कुराणाचे शिक्षण घेतले पाहिजे. केवळ शिक्षण घेऊन चालणार नाही, तर ते त्याची शिकवण आपल्या आयुष्यात उतरवून आचरणात आणली पाहिजे. त्याचप्रमाणे ते पुढे म्हणाले की लहान मुले, स्त्रिया यांना नमाजचे महत्त्व पटवून द्यावे, कारण नमाज ही खऱ्या अर्थाने खऱ्या जीवनाचा खरा मार्ग आहे. त्याद्वारे जगातील आयुष्य व त्याचप्रमाणे मृत्यूनंतरचे आयुष्य सुखकारक करू शकते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्यासह आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पवित्र कुराणाची शिकवण दिली पाहिजे व त्याची शिकवण सर्वांपर्यंत पोहोचवणे प्रत्येक इस्लाम धर्मीयांचे कर्तव्य आहे. असे मार्गदर्शन केले. रविवारी इतर उलेमा मार्गदर्शन करणार आहेत. 


नगर-औरंगाबाद महामार्ग दोन दिवस बंद 
इज्तेमा हा राज्यस्तरीय कार्यक्रम असल्याने लाखोंचा जनसमुदाय एकत्र आला आहे. त्यांच्या वाहनांचीही गर्दी झाली आहे. त्याचा ताण नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतुकीवर पडू नये यासाठी पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक लासूर स्टेशन व इसारवाडी फाट्यापासून वळती केली आहे. आवश्यक असणारी वाहतूकच या मार्गावर सुरू आहे. 


अप्रिय घटना टाळण्यास १२ बंब 
लिंबेजळगाव येथे झालेली भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने आगीसारख्या घटना टाळण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. हे जवान अग्निशमन दलाच्या १२ बंबांसह परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबर आरोग्य विभागाचे वैद्यकीय पथक १२ अॅम्ब्युलन्ससह तयार ठेवण्यात आले आहे.

 
आरोग्य अधिकारी, पाणीपुरवठा अधिकाऱ्याकडून पाहणी 
इज्तेमामध्ये लाखोंच्या संख्येने मुस्लिम समाजाचे अनुयायी येत आहेत. त्या दृष्टीने आयोजकांसह शासकीय प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेत आहेत. शनिवारी आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. विजय कंडेवाड व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी पाहणी करून काही सूचना दिल्या व एकंदरीत आयोजकांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. या पथकात जिल्हा शल्यचिकित्सक जी.एम.गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, सहायक संचालक विनायक भटकर उपस्थिती होती. सध्या शासकीय रुग्णालयाचे ३० डॉक्टर, आरोग्य विभागाचे ३८ डॉक्टर्स, १६ फार्मासिस्ट, ७ रुग्णवाहिका,जालना विभागातून २ याव्यतिरिक्त शासकीय यंत्रणेतर्फे १० रुग्णवाहिका व १० डॉक्टर्स उपलब्ध करून दिले. 


पोलिसांकडून ड्रोनद्वारे परिसराची पाहणी 
औरंगाबाद ।
तब्लिगी इज्तेमाची पोलिसांकडून शनिवारी ड्रोनद्वारे पाहणी करण्यात आली. संपूर्ण सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेण्याकरिता ड्रोनचा उपयोग करण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पुढील दोन दिवस देखील अशा प्रकारे पाहणी करण्यात येईल. इज्तेमाच्या सुरक्षेसाठी पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या शिवाय १० हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवक काम करीत आहेत. अशी माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...