आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 दिवसांत 5 अंशांनी वाढले तापमान; फेब्रुवारीदरम्यान सहा जिल्ह्यांत गारपीट, पावसाचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- आठ दिवसांपूर्वी शहराचे कमाल तापमान २९.२ अंश सेल्सियसवर होते. अनपेक्षित हवामान बदलामुळे त्यात पाच अंशांनी वाढ होऊन ते ३४.२ अंशांवर पोहोचले आहे. जळगाव, जळगावजवळील अमरावतीचा काही भाग आणि नाशिक, धुळे, नंदुरबार येथे हलकी गारपीट व पाऊस तर २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी औरंगाबादेतही गारपीट व पाऊस होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे. 


११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात गारपिटीने थैमान घातले. हे संकट कायम असून २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान सहा जिल्ह्यांत हलकी गारपीट व पावसाची दाट शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजेच या भागातील गहू, ज्वारी, हरभरा, करडई, तूर, आंबा मोहोर, द्राक्ष, केळी, डाळिंब, आदी फळ व भाजीपाला पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी त्याच्या संरक्षणासाठी योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी केले. 


समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान ३ अंशांनी वाढले: हिंद महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरी २७ अंश असते. १५ दिवसांत त्यात ३ अंशांनी वाढ झाली आहे. परिणामी वेगाने बाष्पीभवन होत आहे. कमी हवेच्या दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत, अशा भागात हे बाष्पयुक्त वारे, थंड वारे, तेथील उष्णता व आर्द्रता यांचा ढगात संगम होऊन प्रथम ढगांचे अाच्छादन तयार होते, यातून गारपीट व पाऊस होतो. अशीच स्थिती जळगाव, अमरावती, धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद आदी जिल्ह्यांत निर्माण झाली असून २३ व २५ फेब्रुवारी रोजी गारपीट होण्याची शक्यता डॉ. साबळे यांनी वर्तवली. 


सूर्य तळपला तर मान्सूनसाठी चांगले संकेत 
सूर्य तळपायला सुरुवात झाली आहे. मार्च ते मे असा उन्हाळा ऋतूला मोठा कालावधी आहे. उन्हाळा ऋतूत गारपीट, पावसाचा व्यत्यय आला नाही तर मान्सून वेळेवर दाखल होऊन चांगला बरसेल. मार्चच्या पंधरवड्यात प्रखर ऊन तापण्यास प्रारंभ होईल, असे डॉ. साबळे म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...