आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात पावसाची शक्यता, उकाड्यापासून मिळेल दिलासा; ऋतुचक्र बदलले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- होळीनंतर खऱ्या अर्थाने सूर्य तळपण्यास सुरुवात झाली.  मराठवाड्यातील आठही शहरांचे तापमान ३५ ते  ३८ अंश सेल्सियस दरम्यान राहिले आहे.  मात्र, सध्या हवामानात अचानक बदल होत आहेत. त्यामुळे ढगाळ वातावरण राहत आहे. ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. शनिवारी औरंगाबादसह अनेक शहरांत हलका पाऊस पडला. तर पुढील आठ दिवस दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. ऋतुचक्र बदलल्याने आरोग्याच्या तक्रारीत वाढ झाली असून आंबा, भाजीपाला आदी उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे.

सध्या मध्य महाराष्ट्रावर  दिवसभर वातावरण ढगाळ राहत असून येत्या दोन तीन दिवस ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता आहे.  हिंदी महासागरात श्रीलंकेच्या पश्चिमेकडे चक्रवात निर्माण होत असल्याने  येत्या दोन दिवसांत चक्रिय कमी दाबाचे क्षेत्रात रूपांतर होईल.   हे क्षेत्र पश्चिमेस उत्तर  दिशेला अरबी समुद्राच्या दिशेला  १४ व १५ मार्च  दरम्यान सरकेल. याचा परिणाम म्हणून दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ भागात हलका ते मध्य स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.


उन्हाळा सुरु होऊन महिना लोटला. सध्या ढगाळ वातावरण असल्याने कमाल तापमानात अपेक्षित वाढ झाली नाही. मात्र, ढगाळ वातावरणामुळे पृथ्वीवरून आकाशात परावर्तीत होणारी ऊर्जा ढगात अडकून उकाडा जाणवत आहे.  ढगाच्या आच्छादनामुळे सूर्याची प्रखर किरणे अडवली जातात.  


पहाटेच्या वेळी थंड वारे वाहत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.  सध्या पश्चिमी विक्षोपीय वारे उत्तर गोलार्धात  सक्रिय आहे.  परिणामी मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पावसासह गारपिटीची  शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.


पाण्याचा काटकसरीने वापर हवा 
मराठवाड्यात गतवर्षी ७७९ मिमी ऐवजी ६७३.८ मिमी म्हणजे ८६.४० टक्केच पाऊस पडला.  औरंगाबाद, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाले. सुमारे १८० पेक्षा अधिक टँकरने सध्या टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जात असून एप्रिल ते जून दरम्यान मराठवाड्यात निर्माण होणाऱ्या अंदाजे ६ हजारांवर पाणी टंचाईग्रस्त गावांचा आराखडा शासनाकडे पाठवण्यात आला आहे. 


धरणे कोरडी बहुतांश लहान, मध्यम प्रकल्प कोरडी पडली आहेत.  जायकवाडी ६० , निम्न दुधना ५०, माजलगाव ५०, मांजरा ७०, सिना कोरेगाव ५३, खडक बंधारा ६८ टक्के अशा मोजक्याच मोठ्या धरणात जलसंचय आहे. उन्हाळ्यासह  मान्सूनची अनिश्चितता लक्षात घेता आतापासूनच प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे झाले आहे.

 

 तापमानात स्थळनिहाय फरक
उन्हाळा सुरू झाल्याने सूर्य तर तळपत आहे पण दुसरीकडे हवामानातील बदलामुळे आकाशात ढगांची चादर पसरत आहे. ढगांमुळे सावली पडते. पण वातावरणात आर्द्रता राहत असल्याने उकाडाही जाणवतो. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत स्थळनिहाय तापमानात एक ते दोन अंश सेल्सियसचा फरक आहे.

 

मान्सूनवर होणार परिणाम 
गुढी पाडव्याच्या काळात ढगाळ वातावरण राहणार असल्याने कमाल तापमानावर याचा परिणाम होऊन या वर्षीचा उन्हाळा काही प्रमाणात सुसह्य राहील, असे  वातावरणातील बदलांवरून स्पष्ट होत आहे. याचा परिणाम आगामी मान्सूनवरही होणार असून पूर्व मराठवाडा,  विदर्भ,  तेलंगणामध्ये  पावसाचे प्रमाणही कमी असण्याचे संकेत मिळत असल्याचे  औंधकर यांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...