आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑइल डेपोसाठी सटाणा येथील जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाड  - केंद्र शासनाच्या अखत्यारीतील आयओसी, बी.पी.सी.एल., एच.पी.सी.एल. या तीन बड्या तेल कंपन्यांचे डेपो करमाड नजीकच्या सटाणा गाव शिवारात उभारले जाणार आहेत.  यासाठी सटाणा शिवारातील गट क्रमांक ७ ते ३० मधील एकूण १०९.०२ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. औरंगाबादच्या उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकाऱ्यांनी  नोटीस बजावून एक महिन्याच्या आत आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. हे संपादित होणारे क्षेत्र करमाड डीएमआयसीला (ऑरिक सिटी) लागूनच आहे. 


शेंद्रा-बिडकीन या १०  हजार हेक्टर क्षेत्रात औद्योगिक वसाहत उभी राहत आहे. यासाठी करमाड, लाडगाव व बिडकीन परिसरातील अंदाजे सहा हजार हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून यावर झपाट्याने विकास कामे सुरू आहेत. करमाड येथील रेल्वे लाइनच्या उत्तरेकडील ५५५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून येथील विकास कामे डिसेंबर २०१८ च्या शेवटी संपण्याच्या मार्गावर आहेत. कोरियातील वस्त्रोद्योगात अग्रेसर असणाऱ्या एका कंपनीने तर डीएमआयसी क्षेत्रात १०० एकर जागा खरेदी केली आहे. डीएमआयसीमध्ये सर्व कामे उत्कृष्ट दर्जाची होत आहेत. 


सटाणा येथील संपादित होणारी जमीन करमाडच्या जमिनीला लागूनच आहे. तसेच करमाड शिवारात होत असलेल्या क्रमांक दोनच्या उड्डाणपुलाचा उपयोग या संपादित जमिनीसाठी होणार आहे.  उत्तरेकडे तीन किमीवर समृद्धी महामार्ग तर दक्षिणेकडे करमाड शिवारात बारा हेक्टर क्षेत्रात राज्यातील सर्वात मोठे औषधी भांडार उभे राहत आहे. त्यामुळे शेकटा गावापर्यंतचा सर्व भाग विकसित होणार असून या भागातील तरुणांना आपल्या आवडीनुसार उद्योग उभे करता येणार आहेत.


चार पट मावेजाची मागणी 

 शासन संपादित करित असलेली सटाणा येथील १०९ हेक्टर जमीन बागायती असून या क्षेत्रावर मोसंबी, डाळींब व आंब्याच्या बागा आहेत. त्यामुळे रेडीरेकनरच्या  चार पट भाव मिळावा. एकूण जमिनीच्या  १५ टक्के विकसित भूखंड मिळावा.  तसेच प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी सटाणा येथील सरपंच  जैनाबी शहा, उपसरपंच नारायण घावटे, कैलास मुळे, भुजंगराव घावटे, माजी सरपंच नारायण घावटे,  अशोक वाघ,भाऊसाहेब ठोंबरे,जानीमियाँ शहा, शिवाजी दंदाळे, शंकरराव ठोंबरे,भाजयुमोचे तालुका अध्यक्ष सुदाम ठोंबरे, ज्ञानेश्वर ठोंबरे, दादाराव घावटे, दगडू घावटे, बाबासाहेब मुळे, बाबासाहेब घावटे आदींनी केली आहे.

 

खासदार खैरेंचा पाठपुरावा 
करमाड-सटाणा शिवारात ऑईल डेपो उभारावेत, अशी मागणी खा. चंद्रकांत खैरे सतत्याने संसदेत लावून धरली होती. या औद्योगिक विस्तारामुळे खैरे यांच्या मागणीला यश मिळाल्याचे दिसून येत आहे.

 

रेडीरेकनरप्रमाणे मावेजा देऊ 
विस्तारित एमआयडीसीसाठी सटाणा येथील १०९.९२ हेक्टर जमीन संपादित करण्यासाठी ३२(२) ची नोटीस देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना रेडीरेकनरप्रमाणे पैसे मिळतील. शेतातील पक्के बांधकाम, फळबागा यांना वेगळे पैसे देण्यात येतील.  कोणालाही शासन नाराज करणार नाही. 

- शशिकांत हदगल, उपविभागीय अधिकारी औरंगाबाद.


अतिरिक्त जमिनीची मागणी केली  
औद्योगिक विस्तारासाठी महसूल विभागाकडे २५० एकर अतिरिक्त जमिनीची मागणी केली.जमीन संपादनाची प्रक्रिया होताच  जमिनी, फळबागा व  बांधकामांचे मोजमाप होईल. शासनस्तरावर ऑईल डेपोंच्या जागेसाठी मागणी झाली आहे. परंतु  लेखी मागणी अद्याप आमच्याकडे आली नाही. 

- सोहम वायाळ, विभागीय अधिकारी एमआयडीसी.

बातम्या आणखी आहेत...