आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट कागदपत्रांअाधारे भाडेकरू महिला बनली घरमालकाच्या मुलाची पत्नी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी- औरंगाबाद- दोन वर्षे घरात भाडेकरू म्हणून राहिल्यानंतर एका महिलेने घरमालकाच्या मुलालाच बनावट कागदपत्रांद्वारे पती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी महिलेने याच तरुणाविरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती. बनावट कागदपत्रांच्या आधारे पत्नी बनून तिने त्याला संपत्तीत वाटा मागण्यासही सुरुवात केली होती. तरुणाने पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गेवराईच्या महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 


अजय चैनसिंग राजपूत (२७, रा. एसटी कॉलनी) हा उच्चशिक्षित तरुण असून सध्या एमएस्सी शिकत आहे. २०११ ते २०१२ दरम्यान त्यांच्या घरात बीड जिल्ह्यातील गेवराई येथून अनिता अशोक पाटील व प्रमोद सोमाणी हे दोघे भाड्याने राहायला आले होते. मात्र, दोघांची वागणूक न आवडल्याने अजयच्या कुटुंबाने त्यांना घर रिकामे करण्यास सांगितले. याचा राग आल्याने अनिताने कुटुंबाला सतत धमकावण्यास सुरुवात केली. तिने २०१७ मध्ये मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अजयविरुद्ध विनयभंगाची तक्रारही दिली होती. तक्रारदार महिलेने बनावट कागदपत्रांआधारे अजय राजपूत हा आपला पती असल्याचे पुरावे तयार केले. तोच आपला पती असल्याचे भासवण्यासाठी पती म्हणून त्याचे नाव असलेले बनावट आधार कार्डही तयार करून घेतले. त्या कागदपत्रांआधारे तिने कुटुंबास धमकावण्यास सुरुवात केली. संपत्तीत वाटाही मागू लागली. अखेर अजयने पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 


संपत्तीसाठी केला खटाटोप 
आरोपी महिलेने बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड, पासबुकही तयार केले. ही सर्व कागदपत्रे तिने जळगाव रस्त्यावरील रेणुकामाता मंदिराजवळील एका दुकानातून तयार केल्याचा संशय पोलिसांना आहे. पत्नी असल्याची बनावट, परंतु भक्कम कागदपत्रे तयार झाल्यावर तिने अजय व त्याच्या कुटुंबाला संपत्तीत वाटाही मागण्यास सुरुवात केली. कुटुंबाने अखेर पोलिसांत तक्रार दिली. 


ढोंगी प्रेमाचे दोन रंग 
'प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते...' या संकल्पनेलाच धक्का देणाऱ्या दोन घटना शहरात उघडकीस आल्या आहेत. एका घटनेत संपत्तीच्या लोभापायी भाडेकरू महिलेने प्रेमाचे ढोंग रचून घरमालकाच्या मुलाची पत्नी असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून कुटुंबाला मेटाकुटीला आणले, तर दुसऱ्या घटनेत मैत्रीच्या बहाण्याने एका तरुणीचे फोटो काढून तिला छळल्याचा प्रकार समोर आला आहे. 


भाडेकरू महिला मूळची गेवराईची 
आरोपी महिला ही मूळ गेवराईची आहे. २०११ मध्ये ती प्रमोद सोमाणी नावाची व्यक्ती व मुलीसोबत एसटी कॉलनीत राहण्यासाठी आली होती. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तिने अजयविरोधात तक्रार दिल्यानंतर तपासात तिने अजयची पत्नी असल्याची कागदपत्रे तयार केल्याचे समोर आले. आधीपासूनच तिने त्याच्या कुटुंबाला पत्नी असल्याचे सांगून धमकावणे सुरू केले होते. 

बातम्या आणखी आहेत...