आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील दीड वर्षात विद्यापीठ प्रशासन होणार गतिमान; प्र-कुलगुरूंच्या नियुक्तीने शैक्षणिक संवाद वाढणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पहिल्या प्र-कुलगुरुपदी ज्येष्ठ भूगर्भशास्त्र तथा जलतज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील पाच महिन्यांपूर्वी कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मुलाखत घेतली होती. त्यानंतर डॉ. तेजनकर यांची अत्यंत महत्त्वाच्या पदावर वर्णी लागली आहे. पुढील दीड वर्ष विद्यापीठातील उच्च शिक्षण, संशोधन, विकास आणि उद्योग जगताशी सुसंवाद ठेवून गुणवत्ता वृद्धिंगत करण्याची जबाबदारी डॉ. तेजनकर यांच्यावर आहे. 


महाराष्ट्र विद्यापीठ कायदा -१९९४ नुसारही प्र-कुलगुरुपद निर्माण केलेले होते. त्यासाठी विद्यापीठाने वनस्पतिशास्त्र विभागातील एक प्रोफेसरचे पद विद्यापीठाने उच्च शिक्षण विभागाला सरेंडर केले होते. पण जुन्या कायद्यानुसार प्र-कुलगुरुपद भरले तर आपल्या अधिकार क्षेत्रात लुडबुड वाढेल म्हणून आधीच्या कुलगुरूंनी या पदावर कुणाचीही नियुक्ती केली नव्हती. आता महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा -२०१६ च्या कलम १३ (१) नुसार नियुक्त होणाऱ्या प्र-कुलगुरूंना खूप अधिकार दिलेले असून त्यांची नियुक्ती अनिवार्य केली होती. त्यामुळे कुलपतींनी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस मुलाखत घेतली होती. आता पाच महिन्यांनी नियुक्ती केली आहे. चार अधिष्ठातांचे अधिष्ठाता मंडळ, विद्यापीठ उपपरिसर, विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, नव्याने स्थापन झालेले आंतरविद्याशाखीय मंडळ, महाविद्यालयांमधील पदव्युत्तर पदवी शिक्षण आदी मंडळांचे अध्यक्षस्थानी डॉ. तेजनकर राहणार आहेत. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ संपेपर्यंत म्हणजेच आणखी दीड वर्ष डॉ. तेजनकर प्र-कुलगुरू म्हणून काम पाहणार आहेत. विद्यापीठीय संशोधन, शैक्षणिक विकास आणि उद्योग जगताशी सुसंवाद साधत त्यांना दीर्घ आणि अल्प मुदतीच्या योजना आखण्याचे त्यांच्यापुढे आव्हान राहणार आहे. 


जबाबदाऱ्या अशा 
तेजनकर कुलगुरूंच्या उपस्थितीत विविध मंडळे व समित्यांचे प्रमुख राहतील. शिवाय कुलगुरूंच्या गैरहजेरीत सर्व अधिकार मंडळांचे अध्यक्षपद त्यांच्याकडे राहणार आहे. ज्ञानस्रोत केंद्र अर्थात ग्रंथालय, परिसरातील प्रयोगशाळांची गुणवत्ता व दर्जा त्यांना पाहणे त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार त्यांच्यातील संवाद साधण्याचे कामही करावे लागेल. 

बातम्या आणखी आहेत...