आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔैरंगाबाद- जलसंधारण विभागाच्या अखत्यारित असलेल्या जल व भूमी व्यवस्थापन (वाल्मी) च्या महासंचालकपदी जलसंपदा विभागाने गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक हरिभाऊ ढंगारे यांची नियुक्ती केल्यामुळे राज्य सरकारच्या दोन विभागांत वादाला तोंड फुटले आहे. जलसंपदा विभागाचा आदेश धुडकावून लावत जलसंधारण विभागाने ढंगारे यांना रुजू करून घेण्यास नकार दिला आहे. याही परिस्थितीत ढंगारे रुजू झालेच तर मृद व जलसंधारण आयुक्तालयाचे आयुक्त दीपक सिंघला यांची अडचण होणार असून त्यांना बसण्यासाठी जागाच राहणार नाही. ३१ मे २०१७ रोजी जलसंधारण विभागाने अध्यादेश काढून वाल्मी ही संस्था जलसंपदा विभागाकडून जलसंधारणकडे वर्ग केली आणि वाल्मी मृद व जलसंधारण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आणली. या अध्यादेशाच्या अनुषंगाने वाल्मीच्या नियामक मंडळाची बैठक १७ मार्च रोजी मुंबईत होणार आहे. त्यात नियामक मंडळात जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव अध्यक्ष होणार आहेत. सध्या जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव हे नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत. नियामक मंडळात हे बदल होण्यापूर्वीच ही नियुक्ती करून जलसंपदा विभागाने जलसंधारण विभागावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. हरिभाऊ ढंगारे हे जानेवारी २०१७ पासून गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक होते. त्याच्या बदलीमुळे आता त्याचा प्रभारी कार्यभार महामंडळाचे मुख्य अभियंता अजय कोहीरकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
बोर्डावरून वाद
वाल्मीमध्ये जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी उद््घाटन केलेला बोर्ड जलसंपदा अधिकाऱ्यांनी काढला. त्यावर शिंदे यांनी या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत प्रधान सचिवांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले होते. वाल्मीमध्ये जलसंपदा विभागाचे लेखापरीक्षक विभागाचे कार्यालय आहे. या विरोधात तक्रार करण्यात आली होती.
ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नाही
जलसंपदा विभागाला नियुक्ती आदेश रद्द करण्यास सांगितले आहे. अशी ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नाही. म्हणून हरिभाऊ ढंगारे यांना रुजू करून घेतलेले नाही. वाल्मी जलसंधारण विभागाकडेच कायम राहील.
- राम शिंदे, जलसंधारण मंत्री
...तर आम्हाला कार्यालयच राहणार नाही
सध्या आयुक्त आणि वाल्मी महासंचालकाच्या प्रभारीपदाचा कार्यभार माझ्याकडे आहे. मात्र, महासंचालकपद गेल्यास बसण्यासाठीही जागा नाही. १७ मार्चच्या नियामक मंडळाच्या बैठकीपर्यंत वाल्मीचा कार्यभार माझ्याकडेच ठेवणार आहे. नव्या नियुक्तीबाबत मला काहीही विचारलेले नाही.
- दीपक सिंघला, प्रभारी महासंचालक, वाल्मी आणि आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.