आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लिपकार्टवरून खरेदी केले तलवारी, गुप्त्या; दंगलीनंतर मागवला शस्त्रसाठा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरात दंगल होऊन १५ दिवस होत नाही तोच कुरिअरने मागवलेला मोठा शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती लागला आहे. फ्लिपकार्ट, को मार्केटिंग कुरिअर इन्स्टाकार्ट पार्सलद्वारे मुंबईच्या भिवंडीहून घातक शस्त्रांची आॅनलाइन खरेदी केलेल्या सहा जणांसह कुरिअरच्या हब मॅनेजरला गुन्हे शाखा पोलिसांनी मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले. पोलिसांनी जयभवानीनगर आणि नागेश्वरवाडी भागातील कुरिअरवर छापा मारून सुमारे २८ शस्त्रे जप्त केली. 


फ्लिपकार्टवरून शस्त्रांची ऑनलाइन खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेला सोमवारी रात्री मिळाली होती. त्यावरून सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि अजबसिंग जारवाल यांची पथके रवाना झाली. नागेश्वरवाडी आणि जयभवानीनगरातील को मार्केटिंग इन्स्टाकार्ट सर्व्हिसेसच्या कार्यालयावर सोमवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास पथकाने छापा मारला. या वेळी तलवारी, चाकू, कुकरची, गुप्ती, जांबिया अशी सुमारे २८ शस्त्रे सापडली. पोलिसांनी कुरिअरचा हब मॅनेजर स्वप्निल अशोकराव दहिवालकर (३२, रा. स्वामी विवेकानंदनगर, हडको) याला ताब्यात घेत चौकशी केली. ही शस्त्रे आॅनलाइन मागवण्यात आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. 


याप्रकरणी मुकुंदवाडी आणि क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शस्त्रे मागवताना तरुणांनी त्यांचा मोबाइल क्रमांक न देता घराचा पत्ता दिला होता. त्यामुळे कुरिअरद्वारे आलेले शस्त्र कोणताही व्यक्ती नाव सांगून पार्सल नेऊ शकत होता. तसेच शस्त्रांचे पार्सल घरपोच आल्यानंतरच पैसे दिले जातील, असे ठरले होते. त्यामुळे संशयाला जागाच नव्हती. मात्र, गुन्हे शाखेला याची कुणकुण लागताच पथकातील सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक योगेश धोंडे, अनिल वाघ, नंदकुमार भंडारे, सहायक फौजदार सूर्यकांत महाडिक, जमादार सुभाष शेवाळे, शिवाजी झिने, विलास वाघ, संतोष सोनवणे, नितीन मोरे, संजय धुमाळ, राजेंद्र साळुंके, सुनील धात्रक, सतीश हंबरडे, सुधाकर राठोड, विजयानंद गवळी, हकीम पटेल, भगवान शिलोटे, सय्यद अशरफ, नवाब शेख, सिद्धार्थ थोरात, संतोष सूर्यवंशी, मनोज चव्हाण, शिवा बोर्डे, शेख बाबर आणि प्रभाकर राऊत यांनी कारवाई केली. दरम्यान, शस्त्र मागवणाऱ्या तरुण काही घातपाताचा कट रचत होते का याचाही पोलिस शोध घेत आहेत. 


सात जणांना सुनावली पोलिस कोठडी 
कुरिअरचा हब मॅनेजर स्वप्निल दहिवालकर, विद्यार्थी विकास महादू दळवे (२०, रा. विजयनगर, नक्षत्रवाडी) आणि कामगार जुबेर दिलावर शहा (१९, रा. पोटूळ, ता. गंगापूर) यांना न्यायालयाने ४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, तर कामगार सागर बन्सीलाल पाडसवान (२८, रा. न्यू हनुमाननगर), टपरी चालक नवीद खान उबेद खान (२४, रा. उस्मानपुरा), कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणारा चंदन अनंत लाखोलकर (२२, रा. न्यू एसटी कॉलनी, एन-२, सिडको) आणि विद्यार्थी मुकेश भगवान पाचवणे (२२, रा. लहुजीनगर, हर्सूल) यांना न्यायालयाने ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 


मोबाइलवरून घेतला शोध 
गुन्हे शाखेने शस्त्रसाठा जप्त केल्यानंतर आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली. फ्लिपकार्टवरून १७ ते २० मे दरम्यान कुरिअरच्या माध्यमातून ज्यांनी शस्त्रे मागवली होती त्यांचे मोबाइल क्रमांक पोलिसांनी हस्तगत केले. मोबाइल लोकेशनच्या आधारे सहा जणांना रात्रीतून अटक केली. 

बातम्या आणखी आहेत...