आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक नगरसेवकाच्या वाॅर्डात होतील फक्त १० लाखांची कामे; डॉ. निपुण यांची नूतन नियमावली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- या आर्थिक वर्षात प्रत्येक नगरसेवकाच्या वाॅर्डात १० लाखांची कामे होतील, अशा स्पष्ट सूचना आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे नगरसेवकांत नाराजी अाहे. दुसरीकडे ठेकेदारांना धनादेश देण्यासाठीही नियमावली घालून देण्यात आल्याने पदाधिकाऱ्यांतही नाराजी आहे. ही मर्यादा आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत असणार, असे सांगण्यात आले आहे. मनपाची आर्थिक स्थिती सुधारण्यास काही वर्षे लागू शकतात. त्यामुळे अंदाजपत्रकात समाविष्ट कामे होतील की नाही, असा प्रश्न नगरसेवकांच्या मनात निर्माण झाला आहे. 


तिजोरीची परिस्थिती आणि अंदाजपत्रकात तरतूद करून ठेवलेली कामे याचा ताळमेळ घालताना डॉ. निपुण यांनी हा फंडा वापरला आहे. प्रत्येक नगरसेवकाच्या वाॅर्डात सरासरी २ ते ३ कोटींच्या कामांची तरतूद करण्यात आलेली आहे. चार वर्षांपासून ही कामे अंदाजपत्रकात असून या वेळीही स्पील ओव्हरच्या नावाखाली ही कामे नव्या अंदाजपत्रकात समाविष्ट झाली आहेत. त्यातील किमान निम्मी कामे व्हावीत, अशी नगरसेवकांची इच्छा आहे. निम्मी म्हटले तरी किमान एक कोटीची कामे नगरसेवकांना अपेक्षित आहेत. परंतु डॉ. निपुण यांनी याला थेट मर्यादा घालून फक्त दहा लाखांचीच कामे एका नगरसेवकाच्या वाॅर्डात व्हावीत, असे स्पष्ट केले आहे. 


महापौरांचे मौन 
आयुक्तांनी एका वाॅर्डात १० लाखांची मर्यादा घालून दिल्याप्रकरणी महापौर घोडेले यांनी तूर्तास मौन धारण केले आहे. अशा निर्णयाची माहिती नसल्याचे सांगत त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. चर्चा करून त्यातून मार्ग निघेल एवढेच ते म्हणाले. 


९० टक्के धनादेश जातील ज्येष्ठता क्रमाने 
आयुक्तांनी धनादेश देण्यासाठी मुख्य लेखाधिकारी रामप्रसाद सोळुंके यांनाही मर्यादा घालून दिल्या आहेत. कोणत्याही स्थितीत ९० % धनादेश हे ज्येष्ठतेनुसार जातील. १० टक्के धनादेश हे अत्यावश्यक बाबींसाठी पदाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून दिले जाऊ शकतील. यामुळेही पदाधिकारी नाराज होऊ शकतात. अर्थात १० टक्के अधिकारही काही कमी नाहीत. 


नगरसेवकांची निराशा 
आयुक्तांनी अंदाजपत्रकीय कामांच्या संचिकांवर स्वाक्षरीचे अधिकार अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना दिले. याचा नगरसेवकांना कमालीचा आनंद झाला होता. भालसिंग यांच्याकडून आपल्या प्रत्येक फाइलवर सही घेता येईल, अशी अनेकांची अटकळ होती. परंतु ती क्षणिक ठरली. कारण आयुक्तांनी अापल्या अधिकाराचे विकेंद्रीकरण करताना एका वाॅर्डात दहाच लाखांची कामे करण्याची मर्यादा घातली. डॉ. निपुण यांच्या आदेशाची माहिती अजून सर्व नगरसेवकांपर्यंत पोहोचलेली नाही. जेव्हा सर्व नगरसेवकांपर्यंत ही बातमी पोहोचेल तेव्हा खळबळ माजेल. 

बातम्या आणखी आहेत...