आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंड सुनावताच भविष्यात निवडणूक न लढण्याची शपथ; जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद- उस्मानाबाद येथील शिवसेना उमेदवार गौतम रामा लटके यांनी जि. प. निवडणूक २०१७ मध्ये तीन अपत्ये असताना दोनच अपत्ये असल्याचे खोटे शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले होते.  आैरंगाबाद खंडपीठात यासंबंधी दाखल याचिकेवरील सुनावणीअंती न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी खोटी माहिती दिल्याप्रकरणी तीन लाख रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला. खंडपीठाचा रोख लक्षात येताच संबंधित जि. प. सदस्याने यापुढे स्वत: आणि  पत्नी मिळून भविष्यात कुठलीच निवडणूक लढवणार नसल्याचे शपथेवर सांगितले. खंडपीठाने लटके यांचे जि. प. सदस्यत्व रद्द केले.  त्यामुळे लटके स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रातील निवडणूक आता कधीच लढवू शकणार नाहीत.  


  परंडा तालुक्यातील अनाळा गटातून लटके यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवर जि. प.  निवडणूक जिंकली. त्यांच्या निवडीस चंद्रकांत  हिवरे यांनी विभागीय आयुक्तांकडे आव्हान दिले. लटके यांना तीन अपत्ये असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. या अपत्यांची म्हणजे कल्याणी (१ नोव्हेंबर २००० , कीर्ती (१ सप्टेंबर २००२) आणि गौरव (५ एप्रिल २००५) अशी मूळ जन्मतारखेची नोंद असल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले.  परंतु शाळेच्या रेकॉर्डमध्ये कल्याणी व कीर्ती जुळ्या दाखवण्यात आल्या असून त्यांच्या जन्माची नोंद १ नोव्हेंबर २००० दाखवली असून गौरवचा जन्म १ एप्रिल २००५ असा दाखवला आहे. यासंबंधी लसीकरण व पत्नी गर्भवती असतानाच्या तपासण्यांची नोंद लसीकरण केंद्र व सामान्य रुग्णालयाकडे उपलब्ध आहे. असे असताना निवडणूक आयोगाकडे लटके यांनी ३१ जानेवारी २०१७ रोजी दिलेल्या शपथपत्रात आपणास दोनचे अपत्ये असल्याचे नमूद केले. कीर्ती नावाच्या मुलीचा त्यांनी शपथपत्रात उल्लेखच केला नाही.  अप्पर विभागीय आयुक्त विजयकुमार फड यांनी लटके यांचे सदस्यत्व रद्द केले. याविरोधात त्यांनी खंडपीठात अपील केले.  ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे यांनी मतदार चंद्रकांत हिवरे यांच्यावतीने बाजू मांडताना सांगितले की, एका प्रसूतीमध्ये कायद्यात नमूद केल्याप्रमाणे एकपेक्षा जास्त अपत्ये झाली तरी त्यास एकच अपत्य समजले जावे. १३ सप्टेंबर २००० पूर्वी कितीही अपत्ये असली तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवण्यास बाधा नव्हती. परंतु त्यानंतर १२ सप्टेंबर २००१ तारखेपर्यंत नियम शिथिल करण्यात आला. उपरोक्त तारखेनंतर दोन पेक्षा जास्त अपत्य असणारा अपात्र ठरतो. लटके यांच्या पत्नीला एकाच प्रसूतीमध्ये दोन मुले १ नोव्हेंबर २००० रोजी झाली असे जरी गृहीत धरले आणि तिसरे अपत्य गौरव १ एप्रिल २००५ रोजी झाले असले तरी निवडणूक आयोगाकडे त्यांनी खोटे शपथपत्र दाखल करून दोनच अपत्ये असल्याचे भासवले असा युक्तिवाद केला.   

 

विनंतीवरून तीन लाखांचा दंड मागे  
न्यायमूर्ती घुगे यांनी लटके यांना तीन लाख रुपये दंड का करण्यात येऊ नये असे तोंडी विचारले असता त्यांनी भविष्यात कधीच आता निवडणूक लढवणार नसल्याचे न्यायालयास आश्वस्त केले. खंडपीठाने लटके यांच्या विनंतीवरून तीन लाख रुपयांचा दंड मागे घेतला. यानंतर त्यांचे जि. प. सदस्यत्व रद्द करण्यात आले. शासनाच्या वतीने सरकारी वकील सुभाष तांबे, लटकेतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ विनायक दीक्षित यांनी बाजू मांडली.

बातम्या आणखी आहेत...