आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- रायपूरवरून कुटुंबीयांसह मुंबईला जात असलेल्या ७३ वर्षीय वृद्ध प्रवाशाचा पुरी-लोकमान्य टिळक एक्स्प्रेसच्या स्वच्छतागृहामध्ये हृदयविकाराने मृत्यू झाला. एक तास होऊनही ते परत आल्याने कुटुंबीयांनी अन्य प्रवाशांच्या मदतीने स्वच्छतागृहाचा दरवाजा तोडून त्यांना भुसावळ येथे बाहेर काढले. बुधवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेनंतर त्यांना जळगावातील सिंधी समाजाच्या नागरिकांनी मदत करीत धीर दिला.
कांदिवली (मुंबई) येथील सेवानिवृत्त तुलसीदास शोभराज बजाज (वय ७३) हे पत्नी मधू, मुलगा विशाल, मुलगी किरण सालानी या कुटुंबीयांसोबत रायपूरला गेले होते. बुधवारी ते रायपूरवरून पुरी-लोकमान्य टिळक एक्स्प्रेसने मुंबईला निघाले होते. अकोला रेल्वे स्थानकानंतर तुलसीदास हे रेल्वे बोगीतील स्वच्छतागृहात गेले हाेते. एक तास झाला तरी ते जागेवर परतले नाही. त्यामुळे मुलगा विशाल त्यांना बघण्यासाठी गेला. स्वच्छतागृहाचा दरवाजा आतून बंद केलेला होता. त्यांनी दरवाजा ठोठावून वडिलांना आवाज दिला. बराच वेळ आवाज दिल्यानंतर आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे विशाल यांनी प्रवाशांच्या मदतीने स्वच्छतागृहाचा दरवाजा तोडला. आतमध्ये तुलसी हे मृत पडलेले दिसले. त्यांना पाहून बजाज कुटुंबीयांनी रेल्वेतच आक्रोश करायला सुरुवातकेली. भुसावळ स्थानकावर रेल्वेगाडी आल्यानंतर बजाज यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सर्व कुटुंबीयही भुसावळ स्थानकावरच उतरले. तेथेच रेल्वेच्या डॉक्टरांनी तपासल्यावर ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वे पोलिसांनी पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी जळगावला न्यावे लागेल, असे पोलिसांनी त्यांना सांगितले. त्यानंतर बजाज यांच्या कुटुंबीयांनी जळगाव येथील सिंधी बांधवांविषयी रेल्वे स्थानकावर विचारपूस केली. त्यांना माजी आमदार गुरूमुख जगवाणी यांचा मोबाइल क्रमांक मिळाला. त्यांनी जगवाणी यांच्याशी संपर्क साधून घटनेबाबत माहिती दिली. त्यानुसार जगवाणी यांनी अशोक मंधान इतरांना बजाज कुटुंबीयांना मदत करण्यास सांगितले. सकाळी ११ वाजता बजाज यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी १२.३० वाजता मृतदेह रुग्णवाहिकेने कुटुंबीयांसह मुंबईला रवाना करण्यात आलेे, अशी माहिती मंधान यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.