आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनी आणि वेडी माणसेच पक्षात घेत नाही; इनकमिंगवर हरिभाऊ बागडेंची सडेतोड प्रतिक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पूर्वी खूप चौकशी करून पक्षात प्रवेश दिला जायचा. आता मात्र पक्षात कोणाला घ्यायचे याबाबत आपण बोलू शकत नाही. ज्यांच्यावर खुनाचा गुन्हा आहे आणि जी माणसे वेडी आहेत फक्त अशाच लोकांना पक्षात घेतले जात नाही, असे मत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त दयाराम बसैये यांच्या पुढाकाराने सोमवारी सीमंत मंगल कार्यालयात आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. 


या वेळी आमदार अतुल सावे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवजी पटेल, रामभाऊ गावंडे, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, भाऊसाहेब दहिहंडे, सुभाष पाटील, कन्हैयालाल सिद्ध, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, लता दलाल, पांडुरंग बनकर, माधुरी अदवंत यांच्यासह अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. बागडे यांनी वाजपेयी यांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. १९५३ ला जनसंघातर्फे अटलजी निवडणूक लढले. त्यांचा पराभव झाला. मात्र डगमगता त्यांनी काम सुरू ठेवले. पुढे ते सातत्याने विजयी झाले. वाजपेयी नेहमी म्हणत होते, जो वाईट प्रसंगात असतो तो नक्कीच जिंकतो. 


पक्षात योग्य व्यक्तींनाच प्रवेश दिला पाहिजे, या भाऊसाहेब दहिहंडे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत बागडे म्हणाले, पूर्वी पक्षात प्रवेश देताना खूप चौकशी केली जायची. मात्र आता सहजरीत्या कोणालाही पक्षात प्रवेश दिला जातो. जयसिंगराव गायकवाड म्हणाले की, कार्यकर्त्यांना सन्मान दिला तर तो पावतो. जुन्या कार्यकर्त्यांनी गाळलेला घाम, सांडलेले रक्त दिलेल्या बलिदानावर भाजप उभा आहे. कार्यकर्ता हाच संघटनेचा प्राण आहे. त्यास योग्य सन्मान दिला तरच तो पावतो. भाजपच्या सामर्थ्यात संघाचे सामर्थ्य दडलेले आहे. पूर्वी पक्षाला शिव्या घालणारे आज पदाधिकारी आहेत. तो आहे तसा घ्यायचा, पाहिजे तसा करायचा या सूत्रानुसार आपले काम सुरू आहे. लोकशाही बळकट होण्यासाठी ते गरजेचे आहे. 


ज्येष्ठांचा सन्मान व्हावा
स्नेहमिलनातसर्वच ज्येष्ठांनी वृक्ष वाढवणाऱ्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडेही लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पूर्वी भाजपचा कार्यकर्ता घरी आला की पाहुणा घरी आल्यासारखे वाटायचे. मात्र आता तो जिव्हाळा राहिला नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. 

बातम्या आणखी आहेत...