आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपत्तीच्या वादात जुंपले भांडण; डोक्यात दगड लागून वृद्धाचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - संपत्तीच्या वादात भांडण होऊन डोक्यात दगड लागल्याने वृद्धाचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. मात्र, साडू इतरांनी संपत्तीसाठी वडिलांना मारले, असे मुलाने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांना मुलावरच दाट संशय आहे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर आरोपींना अटक करून तपास करू, असे पोलिसांनी सांगितले. काशीनाथ हरिभाऊ वाघमारे (७०, रा. एरंडे वडगाव) असे मृताचे नाव आहे.

 

वाघमारे यांची वडिलोपार्जित दोन एकर शेती आहे. त्यांना ज्ञानेश्वर हा मुलगा असून त्याला दोन पत्नी आहेत. त्याची पत्नी एसटी वाहक असून दुसरी पत्नी नाशिक येथे राहते. तेथे तो पत्नीसह वडील बहिणीसोबत राहून मजुरी करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. बुधवारी मध्यरात्री ज्ञानेश्वर आणि काशीनाथ हे रेल्वेने मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर उतरले. मध्यरात्री राजनगर भागातील नागरिकांना काशीनाथ गंभीर जखमी अवस्थेत आढळले. यादरम्यान ज्ञानेश्वर कुठे, का गेला, हे अद्याप समोर आले नाही. नागरिकांनीच काशिनाथ यांना घाटीत दाखल केले.

 

माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिसांनी घाटीत जाऊन काशीनाथ यांची चौकशी केली. परंतु ते बोलण्याच्या स्थितीत नसल्याने ज्ञानेश्वरचा जबाब नोंदवला. ज्ञानेश्वरने जबाबात पूर्वीची पत्नी संजीवनी, साडू हरिभाऊ विठ्ठल शिंदे, त्याची पत्नी सत्यशीला आणि संजीवनीचा भाऊ परमेश्वर दोंडगे यांनी वडिलांना दगडाने मारल्याची तक्रार दिली. पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, सहायक निरीक्षक राहुल खटावकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. परंतु रात्री वाद ऐकायला मिळाला नाही तसेच मारामारी झाली नाही, असे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे काशीनाथ यांच्यासोबत हा प्रकार कुठे झाला, कधी झाला, हे तपासात निष्पन्न होईल, असे पोलिसांनी सांगितले.

 

शवागृहातच केली मुलाची चौकशी
काशीनाथयांचा खून नेमका केला कोणी? याचे उत्तर मिळत नसल्याचे पाहून शवागृहात निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे आणि सहायक निरीक्षक डॉ. राहुल खटावकर यांनी ज्ञानेश्वरची चौकशी केली. काशीनाथ जखमी झाले असताना तू बाबा चौकात का गेलास, असे प्रश्न पोलिसांनी विचारले. परंतु त्याने थातूरमातूर उत्तरे दिली. उत्तरीय तपासणीनंतर काशीनाथ यांचा मृतदेह ज्ञानेश्वरच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्यावर एरंडे वडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर पुन्हा ज्ञानेश्वरला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. सध्या याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...