आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- किरकोळ कारणावरून पत्नी मनीषाचा (२६) जाळून खून केल्याच्या आरोपाखाली तिचा पती राधेश्याम सुधाकर गजभार (३६, रा. विष्णूनगर) याला सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. पत्नीने कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर दिलेला मृत्यूपूर्व जबाब ग्राह्य धरण्यात आला.
आरोपीचे मनीषासोबत २००३ मध्ये लग्न झाले होते. राधेश्यामला दारूचे व्यसन होते. प्लॉट खरेदी करण्यासाठी मनीषाने माहेरहून एक लाख रुपये आणावेत, यासाठी राधेशाम मनीषाचा शारीरिक मानसिक छळ करत होता. २२ फेब्रुवारी २०१३ रोजी ‘आत्या येणार आहे. चांगला स्वयंपाक तयार कर’ असे राधेश्याम घरातून बाहेर जात असताना पत्नीला म्हणाला. घरात रॉकेल नाही, असे पत्नीने उत्तर दिल्याने दोघांत वाद झाला. संध्याकाळी राधेश्याम रॉकेल घेऊन आला. त्यानंतर त्या दोघांत पुन्हा वाद झाला असता राधेश्यामने तिला मारहाण केली. रॉकेल ओतून तिला पेटवून दिले.
यात मनीषा ५७ टक्के भाजली. सासूने तिला दवाखान्यात दाखल केले. त्या वेळी स्टोव्हच्या भडक्याने भाजल्याचा जबाब मनीषाने पोलिसांना दिला होता. तो जबाब सासू आणि दिराच्या दबावाखाली दिला असल्याचे तिने पोलिसांना नंतर सांगितले. तिने कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या मृत्यूपूर्व जबाबात मात्र, पतीने रॉकेल टाकून जाळल्याचा जबाब दिला होता. राधेश्यामविरुद्ध सुरुवातीस भादंवि कलम ३०७ आणि ३२३ नुसार जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
उपचारादरम्यान १७ मार्च २०१३ रोजी मनीषाचे निधन झाले. त्यानंतर राधेश्यामविरुद्ध कलम ३०२ वाढवण्यात आले. तपासाअंती पोलिस अधिकारी शेख माजीद यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारी अभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यांच्यापैकी डॉक्टर, कार्यकारी दंडाधिकारी आणि मृताचे वडील रामभाऊ शिंदे यांचे जबाब महत्त्वाचे ठरले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी राधेश्यामला पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली भादंवि कलम ३०२ नुसार जन्मठेपेची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. दंड भरल्यास आरोपीला सहा महिने जादा सश्रम कारावास भोगावा लागेल, असे आदेशात म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.