आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- दुपारी १२.२० ची वेळ. शिक्षिका वर्गात आल्या आणि विचारले, ‘आफ्रिकेच्या जंगलातील पाच मोठे प्राणी कोणते?’ सात मुलांनी हात उंचावले. त्यातील चार विद्यार्थ्यांनी ना पुस्तकात, ना कधी खरोखरचे प्राणी पाहिलेले होते. पण सर्वसाधारण मुलांच्या तुलनेत ती मुले झटपट उत्तरे देत होती. हा एकच प्रसंग नाही तर दरदिवशी अगदी उत्साहाने १० दृष्टिहीन विद्यार्थी शाळेतील प्रत्येक उपक्रमात सहभागी होतात. जन्मापासून अंध असताना शेकडो सर्वसाधारण मुलांसोबत ही मुले बागडत, शिकत आहेत. कोणी राज्यस्तरीय खेळाडू आहे, तर कोणी कमालीचा तबलावादक आहे.
औरंगाबादपासून तीन किलोमीटरच्या अंतरावर तारामती बाफना अंध विद्यालय आहे. येथे आठवीपर्यंतच वर्ग असल्याने पुढील शिक्षण घ्यायचे कोठे, हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर होता. सर्वसामान्य मुलांच्या शाळेत त्यांना दाखल करण्यास कोणी तयार नव्हते. ही अडचण ओळखून ब्रिजवाडीच्या नगरसेविका सुरेखा सानप यांनी नारेगाव येथील मनपा शाळेत त्यांना प्रवेश मिळवून दिला. मागील ११ महिन्यांपासून १० अंध विद्यार्थी सर्वसाधारण मुलांसोबत येथे शिक्षण घेत आहेत. पहिली ते दहावी वर्गापर्यंत या शाळेत २५०० विद्यार्थी शिकतात. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त तीन ते चार तासांचा अधिक वेळ देत शिक्षकांनी त्यांना शिकवले. आता ही मुले सर्वसाधारण मुलांप्रमाणेच वर्गात शिकत आहेत. ब्रेन लिपीद्वारे मुले आपला अभ्यास करतात. परीक्षेच्या वेळी वर्गातील सहकारी मित्र-मैत्रिणींना रायटर म्हणून बाजूला बसवले जाते. विद्यार्थ्यांबद्दल बोलताना तिलोत्तमा मापारी म्हणाल्या की, अंध विद्यार्थ्यांना आम्ही सर्वसाधारण मुलांप्रमाणे वागवले. त्यांच्यातील चांगले गुण समोर आणण्याचा प्रयत्न केला. नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेतील विजयी संघात ही मुले सहभागी होती. वर्गशिक्षिका वैशाली पाटील, रविकांत पाटील मुलांना मार्गदर्शन करतात.
प्रत्येकात विशेष गुण
१० अंध मुलांपैकी काकासाहेब बोंगाणेला २०१० ते २०२१ पर्यंतचे कॅलेंडर मुखपाठ आहे. विकास सदावर्तेने अंधांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवले. बुलडाण्याचा सागर शिंदे तबल्याद्वारे शाळेचा स्नेहसंमेलन गाजवतो. तो म्हणाला की, माझ्यात एक उणीव असली तरी गुण तर अनेक आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.