आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातुरात 2 वर्षांपूर्वी रेल्वेने पाणी, आज एक टँकर; उस्मानाबाद झाले टँकरमुक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -  दोन वर्षांपूर्वीच्या भीषण दुष्काळात रेल्वेने पाणीपुरवठा कराव्या लागलेल्या लातूर जिल्ह्यात यंदा पाण्याचे एक टँकर सुरू आहे. लोकसहभागातून जलसंधारण, गतवर्षी लाभलेली पावसाची साथ यामुळे लातूरप्रमाणेच उस्मानाबाद जिल्हा टँकरमुक्त झाला आहे. बीड जिल्ह्यात केवळ ८ टँकर सुरू आहेत. या उलट मागच्या पावसाळ्यात पावसाची तूट पडलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात   सध्या ५५० टँकरने पाणीपुरवठा होत आहे. राज्यातील एकूण टँकरच्या प्रमाणात ३७.१४ टक्के टँकर एकट्या  औरंगाबाद जिल्ह्यात सुरू आहेत. गतवर्षी पावसाने दगा दिलेल्या उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही टँकरची संख्या यंदा लक्षणीय आहे.

 

सध्या राज्यात एकूण १४७० टँकरने २४५२ गावे-वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. दोन वर्षांपूर्वी (२०१६) याच काळात राज्यातील १२,०१८ गावे-वाड्यांना ५७३८ टँकरने पाणीपुरवठा होत होता. विशेष म्हणजे, २०१६ च्या दुष्काळात ज्या लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले होते, तेथे यंदा केवळ एक टँकर सुरू आहे. दुष्काळग्रस्त अशी ओळख असलेल्या उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांची वाटचाल टँकरमुक्तीकडे सुरू आहे. 


अपुऱ्या पावसाचा विदर्भाला फटका : एक जून ते ३० सप्टेंबर २०१७ या काळात विदर्भात कमी पाऊस झाला. या काळात विदर्भात सरासरी  ७३१.५ मिमी पाऊस झाला, वार्षिक सरासरीच्या तुलनेत विदर्भात २३ टक्के पाऊस कमी पडल्याने विदर्भाला मे महिन्यात पाणीटंचाईच्या  झळा सोसाव्या लागत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत १३%, नंदुरबारमध्ये ११%, तर धुळ्यात १% पावसाची तूट राहिली.

 

गतवर्षीच्या पावसाने बिघडले गणित
गतवर्षी झालेल्या कमी पावसाचा फटका औरंगाबाद जिल्ह्याला बसला आहे. एक जून ते ३० सप्टेंबर २०१७ या काळात औरंगाबाद जिल्ह्यात केवळ ४९१.१९ मिमी पाऊस झाला, वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ७२.७२ टक्के होते. पावसातील तुटीमुळे औरंगाबाद जिल्ह्यात सध्या ५५० टँकर सुरू आहेत. विशेष म्हणजे सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ओळख असलेले जायकवाडी यंदा १००% भरल्याने पाणी सोडावे लागले होते. याच काळात बीड जिल्ह्यात ९०.५५%, लातूर जिल्ह्यात ८५.४७%, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ९१.५७% पाऊस झाला होता. यामुळे या जिल्ह्यांत यंदा टँकर घटले.

 

जलसंधारणाने लातूर, उस्मानाबादला तारले
लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे या दोन्ही जिल्ह्यातील पाणी पातळी लक्षणीय वाढली. लातूर जिल्ह्यात सरासरी २.१५ मीटर तर उस्मानाबादेत २.५० ते ३ मीटरने पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्हे यंदा टँकर मुक्त झाले आहेत.

 

 पुढील स्लाईडवर पहा दोन वर्षांत टँकरचे प्रमाण ७५% घटले

बातम्या आणखी आहेत...