आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

22 नवी महाविद्यालये मंजूर, विद्यापीठाचा निर्णय; शेंद्रा येथे फॉरेन्सिक सायन्स कॉलेज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने चार जिल्ह्यांत २२ नव्या महाविद्यालयांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्यात १७ पारंपरिक महाविद्यालये असून कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांची ५ महाविद्यालये आहेत. त्याशिवाय मध्यवर्ती ग्रंथालय आणि वाचन कक्षाच्या इमारतीचा विस्तार करण्यात येणार असून त्यासाठी तीन कोटींची तरतूद केली आहे. गुरुवारी (२६ एप्रिल) व्यवस्थापन परिषदेची बैठक कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली, त्या वेळी निर्णय घेण्यात आलेे आहेत. 


बृहत् आराखाड्यानुसार आलेल्या प्रस्तावावर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. २२ महाविद्यालयांना नव्याने मंजुरी देताना ५ कॉलेज वेगळ्या स्वरूपात देण्यात आले आहेत. त्यामध्ये एमजीएमला हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचे कॉलेज देण्यात आले आहे. शेंद्रा एमआयडीसी येथे फॉरेन्सिक सायन्स अँड सायबर क्राइम अभ्यासक्रमाचे महाविद्यालय देण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे विधी महाविद्यालय, उस्मानाबाद येथे समाजकार्य महाविद्यालय आणि एजीएमच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाच्या तुकडीवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. २२ पैकी १७ महाविद्यालये वाणिज्य, विज्ञान व कला शाखेची आहेत. जालना, बीड, उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यात अशी कॉलेजेस दिले जाणार आहेत. विद्यापीठाने प्रस्ताव मंजूर केले असून अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 


त्याशिवाय प्राध्यापकांना पूर्ववत १५ किरकोळ रजा देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीला प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. डी. एम. नेटके, प्रभारी वित्त व लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी आदींसह पदसिद्ध सदस्यांची उपस्थिती होती. 


साडेसहा कोटींच्या दोन इमारतींच्या खर्चाला मंजुरी 
राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियान अर्थात 'रुसा' अंतर्गत विद्यापीठाला मिळालेल्या निधीतून प्लेसमेंट सेलची इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी साडेतीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या खर्चाला मंजुरी देण्यात आली असून चारमजली इमारत बांधण्यात येणार आहे. यात इंटरनल क्वालिटी अॅश्युरन्स सेलचे कार्यालयही उभारण्यात येणार आहे. त्याशिवाय वाढती विद्यार्थी संख्या लक्षात घेता, मध्यवर्ती ग्रंथालयाच्या इमारतीचे विस्तारीकरण केले जाणार आहे. येथेच असलेल्या वाचनकक्षाच्या विस्तारीकरणाचाही त्यामध्ये समावेश आहे. दोन्ही इमारतींसाठी तीन कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...