आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारेगावातील कचऱ्याच्या गाड्या बंद करण्यासाठी उरले 8 दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नारेगावातील कचरा डेपो हटवण्यापूर्वी येथे येणाऱ्या शहरातील कचऱ्याच्या गाड्या बंद करण्याचा इशारा मांडकी, गोपाळपूरसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दिला होता. त्यासाठी ४ महिन्यांचा (१६ फेब्रुवारीपर्यंत) वेळही दिला होता. ही मुदत संपण्यास अवघे आठ दिवसच शिल्लक असूनही मनपा प्रशासन कागदी घोडे नाचवण्यातच मग्न आहे. दुसरीकडे नारेगावात पार पडलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत शुक्रवारी ग्रामस्थांकडून मनपासह सर्व विभागांना गाड्या बंद करण्याबाबत इशारा वजा स्मरणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. 


कचरा डेपो परिसरातील गोपाळपूर, मांडकी, महालपिंपरी, पिसादेवी, वरुड,पोखरी, कच्चेघाटी, रामपूरच्या ग्रामस्थांनी गतवर्षी १३ ऑक्टोबर रोजी मांडकी येथे मनपाच्या कचरा गाड्यांना डेपोत येऊ देण्यास मज्जाव केला होता. त्यासाठी तीन दिवस आंदोलनही केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी १६ ऑक्टोबर रोजी माघार घेऊन मनपाने चार महिन्यांत पर्यायी व्यवस्था करून येथे येणाऱ्या कचरा गाड्या बंद कराव्यात, असे बजावले होते. मनपा आयुक्त दीपक मुगळीकर, तत्कालीन महापौर भगवान घडमोडे यांनी यास होकार देऊन कचराकोंडी फोडली होती. ही मुदत आठ दिवसांवर आली असली तरी मनपा प्रशासन कागदोपत्री नियोजनातच असल्याचे गुरुवारी दिसून आले. ग्रामस्थांनी दिलेली मुदत संपत असताना मनपाने काय नियोजन केले याबाबत विचारणा केली असता मुगळीकरांनी "नियोजन सुरू अाहे', एवढेच सांगितले. 


१६ फेब्रुवारी रोजी संपणार ४ महिन्यांची मुदत; मनपा कागदी घोडे नाचवण्यात मग्न 
मांडकी येथे ग्रामस्थांनी बैठक घेत आंदोलनाची दिशा ठरवली. 


मांडकीचा ठराव, यापुढे एक क्षणही वाढवणार नाही 
बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू चाललेल्या बैठकीत मांडकीतील ग्रामस्थांनी आता कुठल्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नसल्याचे निश्चित केले. तसेच मनपा प्रशासनाला एक क्षणही वाढवून दिला जाणार नसल्याचेही ठरवण्यात आले. या वेळी पुंडलिक आप्पा अंभोरे, मनोज गायके, रवि गायके, विजय डक, अनिल हिरडे, विष्णू भेसर, विश्वनाथ चौथे, भाऊसाहेब चौथे, साईनाथ चौथे, नंदू गायके, विठ्ठल गायके, प्रमोद चक्कर, श्याम चक्कर, विलास डक, शिवाजी गायके, रखमाजी गायके, भावराव चक्कर, अहमद शहा, सतीश देवखळे, ज्ञानेश्वर चक्कर, पीरखाँ शहा, अशोक कुबेर, कृष्णा चक्कर, संजय चव्हाण आदींची उपस्थिती होती. 


जागा असलेल्या संस्थेचे अर्ज मागवले 
ज्यांच्याकडे जागा आहे, तसेच ज्या संस्था कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास इच्छुक आहे, अशा संस्थाकडून मागणीपत्र मागवले आहे. दोन संस्था अाधीच तयार असून १६ तारखेनंतर त्यांच्याकडे कचरा पाठवू शकतो. मात्र त्यांना कचरा वाहतुकीचा खर्च हवा असल्याने त्यावरही निर्णय घेऊ. उद्या मागणीपत्राची शेवटची तारीख असून यात अनेक संस्था समोर येतील. 
- दीपक मुगळीकर, मनपा आयुक्त 


दौरे आणि कागदोपत्री नियोजन 
ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर मनपा प्रशासनाने पहिल्या महिन्यात काहीच नियोजन केले नाही. दुसऱ्या महिन्यात चीन, मुंबई, मालेगावसह हॉलंडचाही दौरा निश्चित करून इंग्लंडच्या संस्थेसह आणि स्थानिक संस्थांचे प्रकल्प अहवाल पाहिले. तसेच त्यांच्या कामाची माहिती घेतली. त्यापैकी प्रत्यक्षात एकाही कामाला प्रारंभ करण्यात आला नाही. त्यामुळे कचऱ्याकडे केलेले दुर्लक्ष भोवणार असल्याची चर्चा मनपा वर्तुळात होत आहे. 


मालेगावची मशीन लागणार 
मनपाच्या पथकाने मालेगावातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्राची पाहणी केली. प्रक्रिया मशीन व वर्गीकरण मशीन यांचा खर्च दोन कोटीपर्यंत जातो. रोज २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करू शकणाऱ्या या मशीन खरेदी करण्यासाठी इंदूरची संस्था डीपीआर तयार करत आहे. महिनाभरात मशीन खरेदी प्रक्रिया होऊ शकते. त्यासाठी दीड एकर जागेची आवश्यकता आहे. 


एल्गार लोकक्रांतीचा, कचरा डेपो हटाव 
कचरा डेपो हटाव आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजता सर्व गावातील नागरिकांची बैठक पार पडली. बैठकीत १६ फेब्रुवारी रोजी पुन्हा आंदोलनास सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले. ९ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदने देण्याचेही ठरले. 

बातम्या आणखी आहेत...