आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांचा 90% वेळ तर परीक्षेतच जातो, नवनिर्माण होणार कसे? : डॉ. काकोडकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरीही अनेक गोष्टीत बदल झालेला नाही. शिक्षण क्षेत्रात ही उणीव फार जाणवते. अजूनही आपल्या शिक्षण पद्धतीत शिक्षकांचा ९० टक्के वेळ परीक्षेच्या कामात खर्च होतो आणि शिकवण्यासाठी केवळ १० टक्के वेळ मिळतो. हे चित्र बदलून शिक्षण अधिकाधिक प्रयोगात्मक व्हावे, असे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. शिक्षण पद्धती प्रभावी करण्याच्या काही टिप्सही त्यांनी दिल्या. निमित्त होते भारत व जर्मनीच्या पुढाकाराने आयोजित 'इंडस्ट्री अकॅडमिक एंगेजमेंट समिट- २०१८' च्या बक्षीस वितरण समारंभाचे. जर्मनीतील जीआयझेड कंपनी व मसिआ या उद्योजक संघटनेच्या वतीने ही समिट आयोजित केली होती. त्यात शहरातील सर्वच अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रावर ७२ संशोधने सादर केली. त्यातून निवडण्यात आलेल्या पाच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या टीमची निवड झाली. याच कार्यक्रमात लोणेरेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) कुलगुरू डॉ. विलास गायकर यांचेही अभ्यासपूर्ण भाषण झाले. डॉ. काकोडकर आणि डॉ. गायकर यांनी मांडलेली मते त्यांच्याच शब्दांत.... 


डॉ. अनिल काकोडकरांनी दिल्या या टिप्स 
मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना मेकॅनिकलचे प्रॉब्लेम सोडवायला सांगू नका, सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घ्या, अनेक पर्याय मिळतील. 


क्रिएटिव्हिटी कशी येणार? 
शिक्षकांचा ९० % वेळ परीक्षेची कामे करण्यात जातो. १० % वेळ शिकवण्यास मिळतो. मग नवी संशोधने कुठून येणार? अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी फक्त पास होण्यासाठी अभ्यास केला तर कसे होणार? तुम्हीच तर खरे क्रिएटर आहात. शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे. त्यांना नवी आव्हाने स्वीकारावी लागतील. त्यांचा वेळ परीक्षणातच जात असेल तर ते विद्यार्थ्यांना शिकवणार कधी? 

 

डॉ. विलास गायकर म्हणाले, गतिमान संशोधनावर विद्यार्थ्यांना शिकवायला हवे 
बाटूच्या १४ विद्यार्थ्यांकडे पेटंट: डॉ. गायकर म्हणाले, आम्ही अनेक स्पर्धा घेतो. यात कारखान्यात जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याची स्पर्धा असते. त्यांना शेवटच्या वर्षाला कंपनीत सहा महिन्यांचा परीविक्षा कालावधी सक्तीचा आहे. विद्यापाठीतील १८ विद्यार्थ्यांकडे पेटंट आहेत. त्यातील ४ विद्यार्थ्यांचे पेटंट नागपूरच्या कंपनीने घेतले आहेत. दीड कोटी खर्च करून मायक्रोव्हेव रिअॅक्टर तयार करत आहोत. यात विद्यार्थी खूप काही शिकले. आमचे विद्यापीठ मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह ओडिशा राज्यांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांना बाटू मार्गदर्शन करीत आहे. 


डॉ. काकोडकर म्हणाले, अभियांत्रिकी महाविद्यालयात असे होते की कोणतीही स्पर्धा असो, मेकॅनिकलचे प्रॉब्लेम मेकॅनिकलच्याच विद्यार्थ्यांना सोडवायला सांगितले जाते. म्हणजे विषयांवर स्पर्धा होते. तसे न करता एका प्रश्नावर सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे. मेकॅनिकलचा प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, सिव्हिल अशा सर्वच शाखांच्या विद्यार्थ्यांना बोलवा, त्यांना सहा महिन्यांचे टार्गेट द्या. मग बघा. एका प्रॉब्लेमचे अनेक पर्याय ते शोधून काढतील. याचा उद्योजकांना मोठा फायदा होईल. मसिआ- जीआयझेडने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी संशोधनाचा औरंगाबाद पॅटर्न तयार करून नवा आदर्श निर्माण केला. असाच अभ्यास करायला हवा. ही अगदी योग्य दिशा आहे. या औरंगाबाद पॅटर्नचा प्रचार-प्रसार करा. 


समस्येवर तोडगा मागा 
मसिआने चांगले काम केले. त्यांनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना कंपनीत पाठवून प्रॉब्लेमचे सोल्युशन मागितले. हाच प्रकार शिक्षणात असायला हवा. केंद्राच्या राजीव गांधी विज्ञान व संप्रेषण केंद्राने देशात अशी ६ केंद्रे सुरू केली आहेत. त्यात सांगलीचे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूरच्या रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील केंद्राचा समावेश आहे. 


डॉ. गायकर म्हणाले, बाटूमध्ये अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये समाविष्ट होत आहेत. पण लोकांना बाटू म्हणजे काय हे मला समजावून सांगावे लागतेे. आमच्या विद्यापीठात गतिमान संशोधनावर शिकवले जाते. तेथे परीक्षार्थी नव्हे, तर विद्यार्थ्यांना आम्ही संशोधनात्मक जॉब देतो. उदा. मोबाइलमध्ये आता ५जी येत आहे. आमचे ६जीवर संशोधन सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...