आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणी देण्यासाठी हवालदाराने दाराचे कुलूप उघडले, दोन कैदी त्यालाच कोंडून पळाले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय आठवले याला पोलिसांनी ताब्यात घेतले. - Divya Marathi
अक्षय आठवले याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

औरंगाबाद- घाटी रुग्णालयातील कैद्यांच्या वॉर्डामध्ये चित्रपटांमध्ये दाखवतात तसाच प्रकार सोमवारी (२३ एप्रिल) सकाळी घडला. तेथील दोन कैद्यांनी पाणी घेऊन आलेल्या पोलिस शिपायालाच कोठडीत कोंडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात एक जण यशस्वी झाला, तर दुसऱ्याला रुग्णवाहिका चालकांनी पकडून दिले. पळून गेलेला कैदी सोनू दिलीप वाघमारेवर (२०, रा. राजूनगर) रेल्वे पोलिसांत खुनाचे दोन गुन्हे दाखल असून सध्या तो चोरीच्या प्रकरणात एक वर्षाची शिक्षा भोगत होता. तर पकडलेल्या अक्षय श्याम आठवले यास (२३, रा. माळी वेस, बीड) बीड येथे वेटरला मारहाण, एअरगनच्या फैरी झाडल्या प्रकरणी अटक झाली होती. या दोघांविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 


सोमवारी सकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास सोनू, अक्षयने हवालदार योगेश जोशी यांना औषधाची गोळी घेण्यासाठी पाणी मागितले. त्यांनी आधी कोठडीच्या दाराजवळील एक छोट्याशा खिडकीतून पाण्याची बाटली आत सरकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती आत गेली नाही. म्हणून त्यांनी दरवाजा उघडत बाटली दिली. तोच दोघे बाहेर आले. अक्षयने त्यांना खाली पाडत मारहाण करण्यास सुरुवात केली. मग सोनूने जोशींचा मागून गळा आवळला. त्यामुळे त्यांची पकड ढिली झाली. त्यानंतर या दोघांनी जोशींना आत कोंडून बाहेरून कडी लावून पळ काढला. जोशींनी आरडाओरड केल्याने गोळा झालेले वैद्यकीय कर्मचारी कैद्याच्या पाठीमागे पळाले. ही बाब जवळच उभे असलेले रुग्णवाहिकेचे चालक विनोद खरे, आकाश हिवराळे आणि शेख सलीम यांना कळली. त्यांनी दुचाकीने त्यांचा पाठलाग करण्यात सुरुवात केली. मात्र, सोनूने त्यांना चकवा देत पळ काढला. तर अक्षयला धाप लागली आणि तो घाटीच्या क्वाॅर्टर्सपर्यंतच पळू शकला. विनीत आणि सलीम यांनी झडप मारून त्याला पकडले. दुचाकीवर बसवून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्यांचे कौतुक केले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त ज्ञानोबा मुंढे, निरीक्षक राजेंद्र कत्तुल, जयश्री आढे, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.


अक्षयच्या वडिलांचे झाले होते एन्काउंटर
अक्षयचे वडील श्याम आठवले यांच्यावर खंडणी, लूटमार, दहशत माजवणे असे अनेक गुन्हे होते. दोन वर्षांपूर्वी गेवराई येथे एलसीबीचे निरीक्षक राहुल देशपांडे आणि सध्या शहरात सहायक पोलिस आयुक्त असलेले सी. डी. शेवगण यांनी श्याम आठवलेचे एन्काउंटर केले होते. ज्या चालकांनी सोमवारी त्याला पकडून दिले त्यांना अक्षयने मला सोडून द्या, मी तुम्हाला दहा लाख रुपये देतो, असे आमिषही दाखवले होते. मात्र, चालक त्याला बळी पडले नाहीत. सहा महिन्यांपूर्वी बीड येथील माळी वेस भागात एका बिअर बारमध्ये भांडण झाले असता त्याने वेटरला मारहाण केली होती. त्या वेळी एअरगनने गोळीबारही झाला होता. या प्रकरणात त्यांच्यावर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून तो अटकेत आहे. 


सोनूवर दोन खुनाचे गुन्हे....
९ जानेवारी:
रेल्वे मालधक्क्याच्या निर्मनुष्य ठिकाणी सकाळी दहाच्या सुमारास युसूफ जोसेफ कांबळे (१४, रा. राजीव गांधीनगर) याचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी त्याच्यावर रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. 


२१ फेब्रुवारी: पानेवाडीतील महात्मा फुले शिक्षण विद्यालयातील शिक्षक दत्तात्रय माधवराव पोकळे (४३, रा. शिंदेवडगाव, ता. घनसावंगी, जि. जालना) यांचा दगड आणि फरशीने ठेचलेला मृतदेह सकाळी आठ वाजता प्लॅटफॉर्म क्र. ४ जवळ आढळला होता. त्यांची ओळख पटू नये म्हणून त्याने चेहरा ठेचल्यानंतर ज्वलनशील पदार्थ टाकला होता. तसेच आत्महत्या भासवण्यासाठी त्यांचा मृतदेह रेल्वे रुळांवर टाकला होता. याप्रकरणी त्याच्यावर रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल आहे. हे प्रकरणही न्यायप्रविष्ट आहे. यात सोनू संशयित आरोपी आहे. 


जबरी चोरी प्रकरणातील फेरोजचा झाला खून
गमतीत मोबाइल, पैसे हिसकावल्याचा जाब विचारताच शेख सर्फराज शेख सांडू उर्फ शफू (१८) आणि शेख आदिल शेख रफिक उर्फ लंगडा (१९, दोघेही रा. रोजाबाग) यांनी वस्तऱ्याने वार करून फेरोज खान फारुख खान (२२, रा. रोजाबाग) याचा ३० डिसेंबर २०१७ रोजी बेल्टने गळा आवळून खून केला होता. फेरोज सोनू वाघमारेसोबत जबरी चोरीच्या प्रकरणात आरोपी होता. त्याचा रेल्वे पोलिस शोध घेत असतानाच त्याचा खून झाला होता. 

 

सुरक्षेसाठी दोनच कर्मचारी 
कैद्यांच्या वॉर्डाची सुरक्षा दोन कर्मचाऱ्यांवर आहे. ही घटना घडली तेव्हा योगेश जोशी आणि बबन जाधव कर्तव्यावर होते. जाधव बाहेर गेले होते. त्यामुळे जोशी एकटेच होते. ५३ वर्षांचे जोशी प्रकृतीने सडपातळ आहेत. त्याचाच फायदा घेत अक्षय व सोनूने हा कट रचला. मणक्याचा त्रास होत असल्याने सोनू ३० मार्चपासून घाटीत आहे, तर अक्षयच्या छातीत बंदुकीचे छर्रे अडकले असून त्याला श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने १९ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. 


दिल्लीला जाणार होते पळून 
काल रात्री सोनूला भेटण्यासाठी घाटीत दोन तरुण आले होते. त्यानंतर हा कट शिजला. सकाळी एकच कर्मचारी असतो हे त्याने हेरले होते. जोशी यांना आपण सहज उचलू शकतो, त्यामुळे ते एकटे असताना पळायचे, असे ठरवले होते. विशेष म्हणजे मी तुझ्या वडिलांचा खास होतो, असे सांगून सोनूने अक्षयचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर अक्षय पळून जाण्यास तयार झाला. मी बीडहून वाहन मागवतो. त्यानंतर दिल्ली किंवा हैदराबादला पळून जाऊ, असेही त्याने सांगितले होते. पळून जातानाची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. 


दिव्य मराठीचे प्रश्न.... 
- घाटीतील कैद्यांच्या वाॅर्डात सराईत गुन्हेगार कायम असतात. हे माहीत असूनही केवळ दोनच पोलिस कर्मचाऱ्यांची सुरक्षा का? 
- एक कर्मचारी सहकाऱ्यावर जबाबदारी टाकून कसा जातो? 
- कैद्याच्या वाॅर्डात घाटी प्रशासनाने कुठलीही अतिरिक्त सुविधा दिली नाही. वाॅर्डाभोवती सिमेंटचे उंच कंपाउंड हवे. असे असताना गेल्या अनेक वर्षांपासून तारेचे तुटलेले कुंपण या ठिकाणी आहे. 
- या वॉर्डात यापूर्वीही कैद्यांनी आत्महत्या केली आहे. असे असताना काळजी का घेतली गेली नाही? 
- पाण्याची सुविधा वाॅर्डातच का करण्यात आली नाही? 
- रविवारी रात्री सोनूला भेटण्यासाठी कोण तरुण आले होते? ते पण कटात सहभागी होते का?

 

पुढील स्लाइडवर पाहा, कैदी पळून जातानाचा व्हिडिओ.....

बातम्या आणखी आहेत...