आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वनिक्षेपकावर घोषणा करूनच नो पार्किंगमधून वाहने उचलण्याचा आदेश, शहरात मात्र सांगताच सपाटा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नो पार्किंग परिसरात दुचाकी उचलण्यापूर्वी किंवा चारचाकी वाहनांना जॅमर लावण्यापूर्वी ध्वनिक्षेपकावर घोषणा करावी आणि नंतरच वाहने उचलावीत, असे पोलिस महासंचालकांचे स्पष्ट आदेश असूनही हे आदेश धाब्यावर बसवून शहरात वाहतूक पोलिस गुपचूप दुचाकी वाहने उचलत आहेत. विशेष म्हणजे वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक वाहतूक शाखेतील अन्य कर्मचाऱ्यांनाच असे काही आदेश असल्याचे माहीतच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 


शहरातील प्रमुख चौक, मार्गांवर दुतर्फा वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. काही वर्षांपासून रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकी उचलून दुचाकीचालकाला दंड करण्याची मोहीम सुरू आहे. खासगी कंत्राटदारामार्फत हे काम सुरू असून कंत्राटदार दुचाकी वाहून नेण्यासाठी टेम्पो आणि युवक पुरवण्याचे काम करतो. त्यांच्यासोबत एक पोलिस कर्मचारी असतो. दुचाकी उचलणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणात अरेरावी करत असल्याचे अनेक तक्रारी पोलिसांकडे गेल्या. त्यातून वाद उद््भवू लागल्यानंतर पोलिस महासंचालकांनी नो पार्किंगमधील दुचाकी उचलण्यापूर्वी आणि चारचाकी वाहनांना जॅमर लावण्यापूर्वी ध्वनिक्षेपकावर घोषणा करणे अनिवार्य केले खरे, परंतु शहरात त्याची अंमलबजावणीच होत नाही. 


फलक असेल तेथे एकदा आणि नसेल तेथे दोनदा घोषणा आवश्यक 
ज्या ठिकाणी नो पार्किंगचा फलक आहे तेथील वाहने उचलण्यापूर्वी किमान एकदा आणि ज्या ठिकाणी नो पार्किंगचा फलक नाही अशा ठिकाणी किमान दोन वेळा वाहतूक पोलिसांनी ध्वनिक्षेपकावर घोषणा करावी, असे पोलिस महासंचालकांच्या आदेशात बजावण्यात आले आहे. मात्र औरंगाबादेत पोलिस एकदाही घोषणा करत नाहीत. 


ध्वनिक्षेपकच नाहीत 
गाड्याउचलण्यासाठी खासगी टेम्पोंचा वापर केला जातो, परंतु घोषणा करण्यासाठी या खासगी वाहनावर ध्वनिक्षेपकच नाही. त्यामुळे टेम्पोवर तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला आता मोबाइल ध्वनिक्षेपक देण्यात येणार आहेत. 


सूचना देऊ 
पोलिस महासंचालनालयातर्फे याप्रकरणी नुकतेच आदेश प्राप्त झाले आहेत. नो पार्किंगचा फलक नसल्यास घोषणा केल्याशिवाय दुचाकी उचलली जात असेल तर संबंधितांना सूचना करण्यात येतील.
- डॉ.दीपाली धाटे-घाडगे, पोलिस उपायुक्त. 

बातम्या आणखी आहेत...