आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोंडअळीग्रस्तांना दिलासा: हेक्टरी 6,800 रुपयांची मदत, 2 हेक्टरची मर्यादा, मदतीचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गेल्या वर्षी २०१७ मध्ये खरीप हंगामात कापूस पिकावर बोंडअळी तसेच धान पिकावर तुडतुडे किडीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मदत जाहीर केली आहे. ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या कापूस तसेच धान पिकासाठी कोरडवाहू क्षेत्रासाठी ६ हजार ८०० रुपये, तर बागायत क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर मदतीची रक्कम मिळणार आहे. ही रक्कम थेट संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. जमा रकमेमधून बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असे निर्देशही मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जारी केले.


गेल्या वर्षी खरीप हंगामात कापसावर बोंडअळी आणि धान पिकावर तुडतुडे किडीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यापोटी मदत देण्यासाठी नुकसानग्रस्त शेतीची माहिती गोळा करून राज्य शासनाने मदतीचे निकष व रक्कम जाहीर केली आहे. यासंबंधीचा शासन निर्णयही जारी केला आहे.


३३% वा त्यापेक्षा जास्त नुकसान झाल्यासच मदत
बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकाचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी ६,८०० रुपये तर बागायती क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी १३,५०० रुपये मदत दिली जाईल. तथापि, २ हेक्टरपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंतच मदतीची रक्कम मिळणार आहे. मदतीची किमान रक्कम एक हजार रुपयांपेक्षा कमी असणार नाही. धान पिकासाठीही याच निकषांवर मदत दिली जाणार आहे.

 

मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात
मदतीची रक्कम संबंधित बाधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेखाली झालेल्या पीक कापणी प्रयोगानुसार अधिसूचित विमा क्षेत्र घटकासाठी ३३% वर नुकसान झालेल्या मंडळातील सर्व कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळेल. पीक विमा व बियाणे अधिनियमानुसार भरपाईची कार्यवाही कृषी विभागाकडून स्वतंत्रपणे केली जाईल. मदतीसाठी आवश्यक निधीची तत्काळ मागणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.


मात्र.... ३३% पेक्षा कमी नुकसान झालेल्या आणि मोठ्या शेतकऱ्यांच्या मदतीचे काय ?
- ३३% वर नुकसान व २ हेक्टर म्हणजेच ५ एकरांसाठीच भरपाई मिळणार असल्याने मोठ्या शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. 
- तसेच ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही, याबाबतदेखील संभ्रम आहे.
- कृषिमंत्री फुंडकरांनी पीक विम्यांतर्गत ८ हजार व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत १६ हजार अशी ३७,५०० रुपये मदतीचा दावा केला होता. याबाबत सरकारने स्पष्टीकरण दिलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...