आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासाला आला वेग; सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी एसआयटीची धावपळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दंगलीच्या चौथ्या दिवशी जुने शहर पूर्वपदावर आले असून पोलिसांच्या तपास कार्याने वेग घेतला आहे. तपासासाठी स्थापन एसआयटीतील अधिकारी घटनास्थळाचे फुटेज मिळवण्यासाठी धावपळ करीत आहेत. आतापर्यंत क्रांती चौक, सिटी चौक आणि जिन्सी पोलिस ठाण्यात १० गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील बहुतांश गुन्हे हे जमावावर असून जमावाची संख्या अडीच हजारांपर्यंत आहे. त्यापैकी ३३ जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ आणि एमआयएमचे नगरसेवक फिरोज खान यांचाही समावेश आहे. 

 

नवाबपुरा, सिटी चौक, शहागंज, गांधी पुतळा, राजा बाजार, गांधी नगर, मोती कारंजा या भागात स्मार्ट सिटीअंतर्गत आणि खासगी सीसीटीव्हीची पाहणी सुरू केली आहे. मात्र, स्मार्ट सिटीतील अनेक सीसीटीव्ही शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास फोडण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेचे व्हिडिअाे किंवा छायाचित्रे ज्यांच्याकडे असेल त्यांनी पोलिसांकडे द्यावीत त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी केले आहे. दरम्यान, चौथ्या दिवशी राजेंद्र जंजाळ यांना अटक केेल्यानंतर शहरातील शिवाजीनगर, टीव्ही सेंटर आणि चिकलठाणा भागातील दुकाने कार्यकर्त्यांनी बंद केली. तर रात्री फिरोज खान सिटी चौक पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतरही मोठा जमाव जमाला होता. मात्र, पोलिसांच्या प्रयत्नानंतर तो तत्काळ शांत झाला. 


बन्सिले प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल 
शहागंज परिसरातील ज्येष्ठ नागरिक जगनलाल छगनलाल बन्सिले (७२) यांचा शुक्रवारी रात्री घरात जळून मृत्यू झाला. ३० ते ३५ जणांच्या जमावाने घर जाळले. त्यात वडिलांचा मृत्यू झाला, अशी फिर्याद जगनलाल यांचा मुलगा सुरेश बन्सिले यांनी दिली असून या प्रकरणात सिटी चौक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


महिलांनी मागितली शस्त्र बाळगण्याची परवानगी 
चार दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीत आमचे प्रचंड नुकसान झाले. जमावाने आमची वाहने जाळली. रात्रभर हैदोस सुरू होता. या वेळी पोलिसांवरही हल्ला चढवण्यात आला. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्वरक्षणासाठी आम्हाला शस्त्र ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राजा बाजार, कंुवार फल्ली, नवाबपुरा आणि जाधवमंडी परिसरातील महिलांनी मंगळवारी पोलिस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली. यात नीता गादिया, मनोरमा पाटणी, पिंकी पाटणी, राखी लोखंडे, उमा ढोलिया, कंचन कासलीवाल, किरण अोस्तवाल, ममता धोका यांचा समावेश होता. 


दोन दिवसांनंतर मोबाइल इंटरनेट सुरू 
दोन दिवसांपासून बंद करण्यात आलेले इंटरनेट मंगळवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आले. इंटरनेट सुरू होताच दंगलीतील व्हिडिअाे आणि फोटो व्हायरल होण्यास पुन्हा सुरुवात झाली. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि समाजात अशांतता निर्माण होईल, अशा पोस्ट पाठवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 


दंगलीत मृत्यू झालेल्या जगनलाल बन्सिले यांच्या कुटुंबीयांना जिल्हा बँकेचे संचालक अभिजित देशमुख यांच्याकडून ५० हजारांची मदत देण्यात आली. दत्ता भांगे, बाळासाहेब औताडे, राहुल येडे पाटील उपस्थिती होते. 


दोषींचा शोध घेऊनच कारवाई 
सिस्टिमशिवाय कोणीही मोठे नाही. त्यामुळे दंगल घडवून आणणाऱ्यांवर कारवाई होणारच, हे निश्चित. अटक केलेल्यांची संख्या वाढवण्यापेक्षा जे खरे दोषी आहेत त्यांचाच शोध घेऊन त्यांना अटक केली जाईल. पोलिसांकडे कोणतीही यादी नाही. जसाजसा तपास पुढे जातो आहे. तसे दोषी समोर येत आहेत, त्यानुसार कारवाई केली जात आहे. कोणताही पक्ष, संघटना किंवा समाज याला अपवाद असणार नाही, असे उपायुक्त विनायक ढाकणे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...