आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Aurangabad Riot Ware Pre planned : Detectives Report, दंगल पूर्वनियोजितच : गुप्तचरांचा अहवाल; पोलिस, मनपाचा निष्काळजीपणा भोवला

दंगल पूर्वनियोजितच : गुप्तचरांचा अहवाल; पोलिस, मनपाचा निष्काळजीपणा भोवला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जुन्या शहरातील दंगल पूर्वनियोजित होती. शिवसेना आणि एमआयएममधील दोन गटांतील वाद आणि शत्रुत्व दंगलीला कारणीभूत आहे, असा अहवाल राज्य गुप्तचर यंत्रणेच्या औरंगाबाद शाखेने सरकारला दिला आहे. विशेष म्हणजे दंगल होणार आहे, अशा सूचना शहर पोलिसांना होत्या, मात्र त्या गांभीर्याने घेतल्या गेल्या नाहीत, असेही अहवालात नमूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


मनपाने अतिक्रमण आणि अवैध नळ कनेक्शनवर कारवाईची मोहीम हाती घेतली होती. राजा बाजार आणि चमन परिसरातील हातगाड्यांवरूनही वाद सुरू होता. याबाबत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील आणि एक गट पोलिसांना भेटला होता. त्याच वेळी त्यांनी हा वाद वाढू शकतो असे संकेत दिले होते. याचदरम्यान शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांच्या नेतृत्वातील व्यापाऱ्यांचे एक शिष्टमंडळ पोलिसांना आणि पोलिस आयुक्तांना हातगाड्यांची तक्रार घेऊन भेटले होते. दरवेळी ईदचा महिना सुरू होण्याच्या अगोदर अशा प्रकारचे वाद होतात. हा अनुभव असतानाही पोलिसांनी कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही. आलेले शिष्ट मंडळ जर कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचवण्याचे संकेत देत असेल तर त्यांना कलम १४९ ची नोटीस देणे आवश्यक होते. पण पोलिसांनी तसे केले नाही. शहरात गेल्या चार महिन्यांत अनेकदा कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले. मनपाच्या विविध भूमिकांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असे अहवालात म्हटले आहे. 


राजा बाजार, सिटी चौक, शहागंज परिसरात पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र नवाबपुरा, जिन्सी परिसरातून जमावाला थोपवण्यासाठी कुठलीही यंत्रणा नव्हती. त्यामुळे त्या ठिकाणच्या जमावावर कुठलेही नियंत्रण नव्हते. सिडको, एमआयडीसी सिडको, जवाहरनगर, सातारा, हर्सूल पोलिस ठाण्यातील कर्मचारी जर जिन्सीचा दिशेने आले असते नुकसान रोखता आले असते. असे का झाले नाही, याच्या चौकशीची गरज अहवालात नमूद केली आहे. 

 

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घडवली दंगल 
गुलमंडी आणि चमन हे दोन्ही भाग राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. हे दोन्ही भाग शहराच्या मध्यभागी आहेत. या ठिकाणी घडलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण शहरात उमटतात. त्यामुळेच निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून येथे दंगल घडवून आणण्यात आली, असे गुप्तचर विभागाच्या अहवालात म्हटले आहे. 


पूर्वनियोजित नव्हती, पण पूर्वतयारी होती : भारंबे 
ही दंगल पूर्वनियोजित नव्हती मात्र तिची पूर्वतयारी असल्याचे अनेक पुरावे तपासात पुढे आले आहेत. हे लक्षात घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहराला वेठीस धरणाऱ्यांची गय केली जाणार नाही. नि:पक्षपणे तपास सुरू आहे, असे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...