आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतळा बॉम्ब : महापुरुषांचे 167 पुतळे; एकासही ना सुरक्षा ना सीसीटीव्ही निगराणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद शहर जिवंत पुतळा बॉम्बवर उभे आहे. शहरात ठिकठिकाणी महानगरपालिका, विविध पक्ष- संघटनांनी महापुरुषांचे १६७ पुतळे उभारले आहेत. या पुतळ्यांपैकी केवळ ४० पुतळेच रीतसर परवानगी घेऊन उभारण्यात आलेले आहेत. उर्वरित १२७ पुतळे अनधिकृत आहेत. भावी पिढीला महापुरुषांचे स्मरण व्हावे आणि त्यांच्या विचारांचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित व्हावा, अशा 'उदात्त' हेतूने हे पुतळे उभारणारे सगळेच पुतळ्यांच्या सुरक्षिततेबाबत कमालीचे बेफिकीर आहेत. या १६७ पैकी एकाही पुतळ्याला साधी सुरक्षाही नाही की कुणी या पुतळ्यांवर निगराणी राहावी म्हणून पुतळ्याजवळ साधे सीसीटीव्ही बसवण्याची तसदीही कुणी घेतलेली नाही. त्यामुळे या पुतळ्यांची सुरक्षा हा कळीचा मुद्दा असला तरी त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे.

 

शहराच्या ११७ वॉर्डाँत १६७ पुतळे असल्याची नोंद प्रशासनाकडे नोंद आहे. शहरातील गल्लीबोळात नोंद नसलेलेही अनेक पुतळे आहेत. भावनेच्या भरात उभ्या केलेल्या पुतळ्यांकडे अनुयायांचे केवळ जयंती, पुण्यतिथी किंवा विटंबना झाली तरच लक्ष जाते. मात्र या ठिकाणी काही सुरक्षा व्यवस्था असावी याचे कुणालाही गांभीर्य नाही. शहरात २५०० पोलिस कर्मचारी आहेत. त्यांच्यावर असलेला कामाचा भार लक्षात घेता प्रत्येक पुतळ्याची सुरक्षा ठेवणे शक्य नाही. अशा वेळी किमान पुतळा उभारणाऱ्यांनी तरी त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत.

 

१६६ पुतळ्यांपैकी ४० अधिकृत आहेत, तर १२७ अनधिकृत आहेत. ४० पुतळ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी मनपाची आहे, तर इतर पुतळ्यांची ते उभे करणाऱ्या नागरिकांची. सध्या कुठल्याच पुतळ्याची सुरक्षा व्यवस्था चोख नाही. विशेष म्हणजे २०११ नंतर शहरात कुठलाच पुतळा उभारण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. तरीदेखील पुतळे उभे राहत असल्याची बाब समोर आली आहे. महापालिका आणि पोलिसांनाही हे माहीत आहे, पण त्यावर कारवाई काही होत नाही.


शहराच्या विविध भागांत उभारलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांची संख्या अशी 
छत्रपती शिवाजी महाराज- १४
डॉ. बाबासाहेब आंबेडकर- ८२
भगवान गौतम बुद्ध- ३०
विनायकराव पाटील- ०१
झाशीची राणी- ०१
संत एकनाथ- ०१
महात्मा जोतिबा फुले- ०५
शाहू महाराज- ०२
इंदिरा गांधी- ०१
अहिल्याबाई होळकर- ०४
अण्णाभाऊ साठे- ०४
जवाहरलाल नेहरू- ०१
भगवान बाबा- ०१
छत्रपती संभाजी महाराज- ०१
स्वामी विवेकानंद- ०१
लोकमान्य टिळक- ०१
सरदार वल्लभभाई पटेल- ०१
महात्मा गांधी - ०१
अनंत कान्हेरे- ०१
स्वातंत्र्यवीर सावरकर- ०१
बळीराम पाटील- ०१
वसंतराव नाईक- ०१
द्वारकादास पटेल- ०१
तानाजी मालुसरे- ०१
महाराणा प्रताप- ०१
संत गाडगेबाबा- ०१
भाऊ फाटक- ०१
लहुजी साळवे- ०१

( स्त्राेत : पाेलिस अायुक्तालयातील गुड माॅर्निंग पथकाच्या नाेंदीनुसार )

 

सीसीटीव्ही बंद : सेफ सिटीही 'अनसेफ'
शहरात सेफ सिटी प्रकल्पांतर्गत काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र या प्रकल्पांतर्गत बसवलेले सावरकर चौकासह बऱ्याच ठिकाणचे सीसीटीव्हीही बंद असल्यामुळे सेफ सिटी प्रकल्पावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे १६७ पुतळ्यांपैकी काही पुतळे सेफ सिटीच्या सीसीटीव्हीच्या निगराणीत येतात, पण बंद पडलेल्या सीसीटीव्हींची वेळीच देखभाल-दुरुस्तीही होत नाही.

 

पोलिस राबवणार दत्तक पुतळे योजना
शहरात गस्तीसाठी पोलिसांचे गुड मॉर्निंग पथक आहे. पुतळ्यांची देखभाल व सुरक्षा व्हावी म्हणून हे पुतळे पोलिस कर्मचाऱ्यांना दत्तक देण्याची योजना आहे. पोलिस कर्मचाऱ्यांकडे एका पुतळ्याचे पालकत्व आल्यामुळे पुतळे सुरक्षित तर राहतीलच, शिवाय त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था स्थितीही अबाधित राखण्यास मदत होईल, असे पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी सांगितले.

 

समर्थनगरातील सावरकर पुतळ्याची विटंबना
समर्थनगरातील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या पुतळ्याची काळ्या रंगाचा ऑइलपेंट फेकून विटंबना करण्यात आली. शनिवारी पहाटे हा प्रकार लक्षात आल्यानंतर पुतळ्याची लगेच रंगरंगोटी करण्यात आली. घटना जाणून घेणे हा वाचकांचा हक्क आहे. तो अबाधित राखण्यासाठी आम्ही हे संक्षिप्त वृत्त देत आहोत.

बातम्या आणखी आहेत...