आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुकाराम पर्वारंभीच महानगरपालिका कार्यालयात देवदेवतांच्या प्रतिमांना बंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नेहमीच प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भाजपची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेचे अायुक्त तुकाराम मुंढे यांनी अाता महापालिका कार्यालयात देवदेवतांच्या प्रतिमांवर बंदी घालण्याचे फर्मान साेडले अाहे. अायुक्त कार्यालयातील स्वीय सहायकांच्या दालनातील श्री दत्तगुरूंची मूर्तीही मुंढे यांनी हटवली असून उपमहापाैर कार्यालय, शहर अभियंता यू. बी. पवार यांच्यासह बहुतांश विभागातील देवदेवतांच्या मूर्ती काढून घेण्यात अाल्या अाहेत. देवदेवतांच्या या संवेदनशील मुद्यावरून अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे बाेलले जात अाहे. 


शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर मुंढे यांना कामकाजासाठी खऱ्या अर्थाने एकच दिवस मिळाला. त्यानंतर शनिवार व रविवारची जाेडून सुटी अाल्यामुळे मुंढे यांनी घरी न बसता अधिकारी व कर्मचाऱ्यांना महापालिकेत बाेलावून अापापल्या विभागातील स्वच्छता करून घेतली. जुने दप्तर निकाली काढणे व नवीन दप्तराची सुसूत्रता करणे असा अजेंडाही त्यांना दिला हाेता. त्यामुळे दाेन दिवसांत सर्वच विभागांची झाडून स्वच्छताही झाली. 


'मूर्ती वा प्रतिमांबाबत काही नियमच नाही' 
महापालिकेत प्रामुख्याने विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अधिकारी वा कर्मचाऱ्यांना भावनेपाेटी अनेक देवदेवतांच्या प्रतिमा-मूर्ती भेट दिलेल्या अाहेत. या देवदेवतांचे दरराेज पूजन करून अनेक अधिकारी व कर्मचारी कामाची सुरुवात करतात. महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेत अशा पद्धतीने देवदेवतांच्या मूर्ती वा प्रतिमा लावण्याबाबत काही नियम अाहेत का, अशी विचारणा केली असता याबाबत काेणताही नियम नसल्याचे सहायक नगरसचिव गाेरखनाथ अाव्हाळे यांनी स्पष्ट केले. 


मीडियाशी बाेलण्यासही बंदी 
मुख्यालयातील साफसफाईसंदर्भात एका वरिष्ठाने इलेक्ट्राॅनिक मीडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत अायुक्तांचा उल्लेख 'साहेब' अाल्यामुळे स्वच्छता करताेय, असे विधान केल्यावरूनही मुंढे यांनी त्याला फटकारल्याचे समजते. अशा पद्धतीने मीडियाशी काेणीही अापल्या पूर्वपरवानगीशिवाय थेट बाेलू नये, अशी तंबी देतानाच त्यांनी 'अायुक्त म्हणा ना.. साहेब काय', असेही सुनावल्याचे कळते. 


टी शर्ट, जीन्स, स्पाेर्ट‌्स शूज घालू नका.. 
पहिल्या दिवशी शिस्तीचे धडे देत विलंबाने येणाऱ्यांना फैलावर घेणाऱ्या मुंढे यांची साेमवारची कृती सर्वांनाच अचंबित टाकणारी ठरली. खातेप्रमुखांच्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना 'स्पाेर्ट‌्स शूज घालू नका', अशी तंबी दिल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. जीन्स, टी शर्ट व स्पाेर्ट‌्स शूजचा अाणि कामकाजाचा संबंध काय, असा सवाल कर्मचारी खासगीत करीत अाहेत.

 
महाजन, बागूल, दाेरकुळकर, भाेर रडारवर 
खातेप्रमुखांच्या अाढाव्यात मुंढे यांनी तीन दिवसांच्या फीडबॅकमध्ये सर्वाधिक तक्रारी अग्निशामक, नगररचना व लेखा विभागाच्या असल्याचे सुनावले. अग्निशामक दलाचे प्रमुख अनिल महाजन यांना 'तुमच्याशी संबंधित एजन्सीकडून अाॅडिट झाले तरच अग्निशामक ना हरकत दाखला दिला जाताे का', अशीही विचारणा केल्याचे कळते. महाजन यांनी असे काही नसल्याचे सांगितल्यावर मुंढे यांनी मला सर्व काही माहिती असल्याचे सुनावले. नगररचना सहायक संचालक अाकाश बागूल यांना कपाट व अन्य प्रश्नाशी संबंधित महत्त्वाचे विषय प्रलंबित असल्याने 'कामकाजाकडे लक्ष द्या', असे सांगितले. लेखाधिकारी सुभाष भाेर यांनी दायित्वाविषयी स्पष्ट माहिती न देता अाल्याने कानउघाडणी केल्याचे समजते. उपायुक्त दाेरकुळकर यांनाही कामकाज सुधारण्याचा अल्टिमेटम दिल्याचे समजते. 


मुंढे यांच्याकडून मोघम उत्तर 
देवदेवतांच्या प्रतिमांना बंदीबाबत शासनाचा काेणताही निर्णय नसल्यासंदर्भात मुंढे यांना विचारले असता त्यांनी 'जनतेच्या कार्यालयात जनतेचेच काम व्हावे, खासगी नव्हे', असे माेघम उत्तर दिले. मीडियाला काेणताही संवाद साधायचा असेल तर पालिका अधिकाऱ्यांनी जनसंपर्क विभागामार्फत बाेलावे, असेही त्यांचे म्हणणे अाहे. 

बातम्या आणखी आहेत...