आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: शिवसेनेची काेंडी अन‌् कानपिळणी!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय राजकारणाला एेतिहासिक वळण देणाऱ्या शिवसेना-भाजप युतीत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपासून निर्माण झालेला दुरावा पालघरच्या लाेकसभा पाेटनिवडणुकीनंतर अधिकच वाढला. शिवसेनेचे बाेट धरून महाराष्ट्रात भाजपने पक्ष विस्तार जरूर केला; मात्र त्याच वेळी मानलेल्या या माेठ्या भावाला प्रसंगाेपात खिजवणे, दुय्यम लेखणे काही साेडले नाही. अशा परिस्थितीत ताेडीस ताेड प्रत्युत्तर देणे, शिवसैनिकांचे मनाेधैर्य वाढवणे अपरिहार्यच हाेते. म्हणूनच स्वबळाचा नारा देत भाजपला धडा शिकवण्याचा मनसुबा ५२ व्या वर्धापनदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना स्पष्ट करावा लागला. भाजपची काेंडी करण्याची भूमिका कदाचित अात्मघाती वाटू शकेल, परंतु पक्षहिताचा विचार करता ते स्वाभाविक ठरते. काेणत्याही पक्षाला स्वत:चा विस्तार करण्याचा अधिकार अाहे. युतीमुळे सत्ताप्राप्तीच्या संधी वाढत असल्या तरी पक्षवाढीवर मर्यादा येतात, त्यामुळे शिवसेनेला स्वबळाची गरज वाटणे साहजिकच अाहे. तथापि, भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेली, मराठी अस्मिता अाणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वाटचाल करणारी शिवसेना गेल्या ५२ वर्षांत स्वबळावर सत्ता काबीज का करू शकली नाही? या प्रश्नाच्या उत्तरातच अनेक मर्यादा दडलेल्या अाहेत. केवळ स्वबळाच्या किंवा देशभर शिवसेना नेण्याच्या गावगप्पा करून भागणार नाही, तर मनाेहर जाेशींच्या 'कानपिळणी'वर पदाधिकारी अाणि शिवसैनिकांनी जरूर अात्मचिंतन, कठाेर परिश्रम करायला हवेत; तरच खऱ्या अर्थाने इप्सित गाठणे शक्य हाेईल. अन्य राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचे सरकार स्वबळावर सत्तारूढ हाेतात. मात्र, शिवसेनेला ५२ वर्षांचा इतिहास असताना ते का साध्य हाेऊ शकले नाही? सक्षम नेतृत्व अाणि झुंजार शिवसैनिक असतानाही महाराष्ट्रात सर्वदूर पाळेमुळे का रुजवू शकली नाही? यावर खरे तर गांभीर्याने मंथन व्हायला हवे. 


शिवसेनेचे नाव लाेकांच्या मनांत, महानगरांपासून गाव-वाड्यांपर्यंत जरूर पाेहाेचले. परंतु पदाधिकारी एकतर लाेकांसमाेर विकास कार्यक्रम ठेवत नसावेत किंवा त्यांना सामावून घेत नसावेत. विराेधी पक्षाच्या भूमिकेत वावरणाऱ्या शिवसेनेने सत्तेतील सहभागाचा लाभ सामान्यांपर्यंत कितपत पाेहाेचवला, हा कळीचा मुद्दा अाहे. स्वबळावर निवडणूक जिंकायची असेल, सत्ता प्राप्त करायची असेल तर शिवसैनिकांची एकजूट हाेणे, त्याचबराेबर लाेकांपर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न साेडवणे, शिवसेना नेमके कुठे कमी पडते ते शाेधणे अाणि ती उणीव दूर करणे तितकेच गरजेचे अाहे. 


वस्तुत: एकहाती सत्ता काबीज करण्याचे दिवस अाता राहिले नसल्याचे संकेत कर्नाटक विधानसभा निवडणुकीने दिलेच अाहेत. त्यामुळे भाजप असाे की काँग्रेस यांना मित्रपक्षांना साेबत घेणे अपरिहार्यच ठरले अाहे. उत्तर प्रदेशपाठाेपाठ लाेकसभेच्या सर्वाधिक जागा महाराष्ट्रातून मिळतात हे अमित शहांना कळून चुकले. त्यामुळेच त्यांनी 'माताेश्री'वर धाव घेतली, तर काँग्रेसने महाअाघाडीसाठी कंबर कसली अाहे. गेल्या चार वर्षांत शिवसेना-भाजपची महाराष्ट्रात ताकद वाढली असली तरी अहंगंड जाईल का, हा खरा प्रश्न अाहे. भाजपने नमते घेतले याचा अर्थ शिवसेनेने अर्धी लढाई जिंकली अाहे, अाता २०१९ मधील निवडणुकीसाठी जागावाटपाच्या तहात राजकीय मुत्सद्दीपणा दाखवण्याची गरज अाहे. लाेकसभेच्या जागावाटपावरून युतीत फारशी खळखळ हाेणार नाही, परंतु २०१४ च्या विधानसभा निवडणूक काळात गाफील राहण्याचा फटका बसलेली शिवसेना काय पवित्रा घेते याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या अाहेत. कारण, शिवसेनेतला एक गट युती तुटावी म्हणून सक्रिय असला तरी राजकीय स्वार्थासाठी त्यांचा वापर करून घेण्यातच उद्धव ठाकरेंची खरी कसाेटी लागणार अाहे. 


१९८९ मध्ये शिवसेनेने विधानसभेच्या ५२, तर भाजपने ४२ जागा जिंकल्या. १९९५ मध्ये शिवसेनेने ७३, भाजपने ६३ जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली. १९९९ व २००४ मध्येही अधिक जागा पटकावत शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेतच राहिली. २००९ मध्ये भाजपपेक्षा दोन जागा कमी मिळाल्याने शिवसेनेला धक्का बसला, विरोधी पक्षनेतेपदही गमवावे लागले. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या कणखर नेतृत्वामुळे फारसा फरक पडला नव्हता. त्यांच्या पश्चात मात्र भाजप आक्रमक झाली आणि त्याचे पर्यवसान युती तुटण्यात झाले. २०१४ मध्ये विधानसभेच्या २८२ जागा लढवणाऱ्या शिवसेनेच्या वाट्याला ६२, तर २६० जागा लढवणाऱ्या भाजपला १२२ मिळाल्या. अाता १५२ जागा अाणि मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव अमित शहांसमाेर ठेवून उद्धव ठाकरेंनी एकूणच भाजपची काेंडी करण्याच्या हेतूने डाव टाकला हे खरे; त्यात शिवसेना बाजी मारते का, ते पहावयाचे! 

- श्रीपाद सबनीस 

 

बातम्या आणखी आहेत...