आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी ११ सदस्यीय समिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


औरंगाबाद- क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी कोणत्याही विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. त्यामुळे पुतळ्याची उंची वाढवण्याचे काम नूतनीकरणात केले जाणार आहे. त्यासाठी ११ सदस्यीय समिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी गठीत केली आहे. 


महापौर घोडेले यांनी पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी जागेची पाहणी केली. या वेळी सभागृह नेता विकास जैन, गटनेता मकरंद कुलकर्णी, माजी महापौर त्र्यंबक तुपे, पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य, माजी सभापती गजानन बारवाल, कार्यकारी अभियंता सिकंदर अली तसेच वास्तू विशारद धीरज देशमुख आदींची उपस्थिती होती. देशमुख यांनी तयार केलेल्या संकल्पचित्राची पाहणी महापौरांनी केली. देशमुख यांनी विनाशुल्क संकल्पचित्र, तांत्रिक सल्लागार म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली आहे. मनपाच्या अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे निधीचा प्रश्न नाही. संकल्पचित्रामध्ये पुतळ्याच्या परिसरात विद्युत रोषणाई आणि ध्वनीक्षेपक यंत्राचा समावेश करण्याची सूचना केली. 


दोन्ही बाजूंचा विकास
क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या उड्डाणपुलाखालील जागेचा विकास करण्याची तयारी सेवा फाउंडेशनने दाखवली आहे. या संस्थेसोबत करार केला जाईल. 


दिवसभर वाजतील पोवाडे
पुतळ्याचे नूतनीकरण झाल्यानंतर येथे ध्वनिक्षेपक यंत्रणा बसवण्यात येईल. तेथे दिवसभर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडे वाजवले जातील, असे घोडेले यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...