आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजीच्या तुलनेत मराठी शाळांची संख्या चौपट; विद्यार्थ्यांची संख्या मात्र केवळ दीडच पट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कमी पटसंख्येच्या वर्गावरील शिक्षकांचे समायोजन आणि शाळा बंद करण्याचा सरकारचा निर्णय डोळ्यासमोर ठेवून प्राथमिक शिक्षकांनी या वर्षी मराठी शाळांचा ‘हायटेक प्रचार’ सुरू केला आहे. घरोघर जाऊन पालकांमध्ये मराठी शाळांविषयी जनजागृती करण्याबरोबरच राज्यातील अनेक गावांमध्ये थेट रिक्षावर भोंगा लावून जाहिरातबाजी सुरू आहे. विशेष म्हणजे मराठी शाळांच्या जाहिरातबाजीसाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे.   

इंग्रजी शाळांना थेट परवानगी देण्याच्या सरकारच्या धोरणाचा फटकाही मराठी शाळांना बसला. दिवसेंदिवस इंग्रजी शाळांची संख्या वाढली, तर दुसरीकडे मराठी शाळांची पटसंख्या कमी झाली. मराठी शाळांमध्ये मध्यान्ह आहार, सायकल वितरण, पाठ्यपुस्तके, याबरोबरच गणवेश-बूट यांचे वितरण करण्यात आले तरी परिस्थिती सुधारली नाही. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने इतर भाषांचा विकास होतो, ही संकल्पना पटली नसल्याने पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे ओढा वाढला. परिणामी दरवर्षी मराठी शाळांच्या पटसंख्येत घट झाली. गुणवत्ता असूनही मराठी शाळांच्या शिक्षकांना समायोजनाच्या गोंडस नावाखाली बदल्यांना सामोरे जावे लागले. या वर्षी मात्र शिक्षकांनी ही स्थिती बदलण्याचे ठरवले आहे.   


शाळा सुरू होण्यापूर्वी आपापल्या वर्गाची पटसंख्या वाढावी या उद्देशाने गुरुजींनी सुटीवर पाणी फेरून चक्क आपल्या शाळेच्या गावांमध्येच मुक्काम ठोकल्याचे चित्र दिसले. राज्यातील अनेक जिल्ह्यातील गुरुजींनी घरोघर जाऊन पालकांचे प्रबोधन सुरू केले आहे. मराठी शाळांमध्ये राबवण्यात येणारे उपक्रम, सरकारी सवलती, तज्ज्ञ मार्गदर्शन या बाबींचे प्रबोधन थेट सोशल मीडियावरून सुरू झाले आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शिक्षकांनी गावातून रिक्षा फिरवून वाड्या-वस्त्यांवरील पालकांचे प्रबाेधन सुरू केले आहे. राज्यातील शिक्षकांच्या हजारो व्हॉट्सअॅप ग्रुपवरून आणि फेसबुक अकाउंटवर इतरांना टॅग करूनही मराठी शाळेत प्रवेश घेण्याबाबतचा प्रचार सुरू आहे.


राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १०० शाळा करण्यासाठी राज्यभरातून प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला. ३७८ शाळांनी त्यात अर्ज भरले. त्यापैकी १०६ शाळांची निवड करून त्या-त्या गावातील शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापकांना मुलाखतीला आमंत्रित करण्यात आले होते. लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या होणाऱ्या या शाळांची यादी प्रसिद्ध केली जाईल.   


उन्हाळी शिबिरांचे आयोजन 
भामरागड (जि. गडचिराेली), रायगड जिल्ह्यातील शाळा, चिरादेवी (जि, चंद्रपूर), तळणी (जि. जालना) आदी शाळांमध्ये उन्हाळ्याच्या सुटीतही विविध शिबिरांद्वारे मराठी शाळा गजबजलेल्या असतात. पुढच्या वर्गांचा अभ्यास, विशेष वर्ग, छंद वर्ग, कार्यानुभव कार्यशाळेचा यात समावेश असतो.

 

मराठी शाळांबाबत हेही महत्त्वाचे...   
- कुमठे बीट (जि. सातारा) या बीटमधील सर्व ४० शाळा प्रगत असून महाराष्ट्रात १०० टक्के साक्षर असलेले हे पहिले बीट आहे.   

- निफाड बीट (जि. नाशिक) आणि होटगी बीट (जि. सोलापूर) येथील मराठी शाळेतील शिक्षक रजेवर असताना त्या वर्गांमध्ये अध्ययनाची जबाबदारी त्या गावातील उच्चशिक्षित तरुण घेतात.   
- हिवरखेडा (जि. जालना) येथील शाळा व्यवस्थापन समितीने गावातील १३२ विद्यार्थ्यांसाठी रात्रीची अभ्यासिका सुरू केली आहे.   
- कराड शाळा क्र. ३ (जि. सातारा) या मराठी शाळेत गेल्या वर्षी दोन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी होते. या वर्षी पहिलीच्या वर्गासाठी ८९२ अर्ज प्राप्त झाले असून ६०० विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत.   
- जरेवाडी (जि. बीड) येथील मराठी शाळेत बाहेरगावाहून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. तेथील गृहपाठ रोज पालकांच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे दिला जातो.    
- तितरी (जि. नंदुरबार) येथील शाळा कुलूप व घंटाविरहित असून तेथील तरुण चोवीस तास विद्यार्थ्यांना अध्ययनाचे कार्य करतात.

बातम्या आणखी आहेत...