आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरबी समुद्रात चक्रीय स्थिती, मान्सूनच्या आगमनात खोडा; हवामान तज्ञांचा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत ते पश्चिमेकडे सरकण्याची दाट शक्यता आहे. याचे रूपांतर चक्रीय स्थितीत होऊन मान्सूनच्या आगमनात खोडा घालण्याची स्थिती निर्माण होत असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. यामुळे दोन ते तीन दिवस उशिराने म्हणजे २९ ऐवजी १ ते ३ जून दरम्यान केरळमध्ये मान्सून दाखल होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 


आता मान्सून डोक्यावर आला आहे. सूर्य सध्या आग ओकत आहे. किमान तापमान २६ तर कमाल तापमान ४१.८ अंशांवर जाऊन पोहोचले आहे. मान्सूनच्या आगमनासाठी हे चांगले संकेत आहेत. तापमान, हवा, बाष्पयुक्त वारे आदींचे निरीक्षण करून स्कायमेट आणि हवामान संस्था, भारतीय हवामान विभागाने यंदा समाधानकारक पर्जन्यमान होणार असल्याचे सांगितले आहे. स्कायमेटनुसार वेळेच्या चार दिवस अगोदर म्हणजे २८ मे रोजी तर भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार २९ मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, उत्तर भारतात सध्या सुरू असलेले धुळीचे वादळ व गारपिटीसह पाऊस, उंच पठारी प्रदेशावर ऐन उन्हाळ्यात झालेली बर्फवृष्टीमुळे आजही ध्रुवीय वारे सक्रिय आहे. त्यात पठारी प्रदेशात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेचा परिणाम म्हणून दक्षिणेस असलेल्या हिंदी महासागर व अरबी समुद्राच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तीन ते चार दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. शिवाय २६, २७ मेपर्यंत चक्रीय स्थिती पश्चिमेकडे सरकणार आहे. यामुळे मान्सूनसाठी निर्माण झालेल्या पोषक वातावरणास चक्रीय स्थिती खोडा घालणार असे दिसून येत आहे. अंदमानमध्ये वेळेच्या आधी पोहोचणारा मान्सून पुढे केरळमध्ये दाखल होताना दोन ते तीन दिवसांचा जास्त कालावधी घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात तो दाखल होईल, अशी माहिती एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. 


गत पाच दिवसांपासून तापमान ४१ अंशांवर स्थिर 
१५ मे रोजी कमाल तापमान ३९.७ तर किमान २४.६ अंशांवर होते. त्यानंतर त्यात दोन अंशांनी वाढ होऊन ते ४१ व २६ अंशांवर पोहोचले. गत पाच दिवसांपासून पारा उच्चांकी पातळीवर स्थिर आहे. उन्हाच्या काहिलीने नागरिक हैराण झाले असून ते प्री-मान्सून व मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची तयार जाेमाने सुरू केली असून ती अंतिम टप्प्यात आहेत. 


पोषक हवामान 
यंदा वेळेवर मान्सून दाखल होण्यासाठी पोषक हवामान आहे. तुरळक चक्रीय स्थितीचा फारसा धोका नाही. अंदमान, केरळ, मुंबईमार्गे मराठवाड्यात १० ते १५ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल. 
- डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ 

बातम्या आणखी आहेत...