आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: कर्जमाफी २० मार्चपासून ठप्प; ७५ हजार शेतकरी प्रतीक्षेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सुरू असलेली कर्जमाफी प्रक्रिया गेल्या दोन महिन्यांपासून ठप्प आहे. औरंगाबाद विभागातील ७५,३६७ शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. यापूर्वी सात ग्रीन लिस्ट आल्या असून आठव्या ग्रीन लिस्टची प्रतीक्षा आहे. ही यादी वेळेवर आली नाही तर शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळेल की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 


कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर मराठवाड्यात सुरुवातीला शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नव्हता. मात्र, गेल्या दोन अधिवेशनांत विरोधी पक्षांनी आवाज उठवल्यामुळे कर्जमाफीची गती वाढली आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला. आतापर्यंत सात वेळा ग्रीन लिस्टच्या माध्यमाने टप्प्याटप्प्यातून कर्जमाफी देण्यात आली आहे. 


जालना जिल्ह्यात सर्वाधिक ३४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा
औरंगाबादच्या सहकार विभागात औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली हे जिल्हे येतात. जालना जिल्ह्याला १ लाख २३ हजार ७४९ शेतकऱ्यांना ५९३ कोटींची कर्जमाफी मिळाली आहे. मात्र, अजूनही ३४१३७ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी ३६२ कोटींची रक्कम लागणार आहे. परभणी जिल्ह्यात १ लाख ३८ हजार ८९९ शेतकऱ्यांना ७४८ कोटींच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. येथे अजूनही १० हजार २५० शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून २३१ कोटींची रक्कम लागणार आहे. हिंगोली जिल्ह्यात ३७ हजार ८० शेतकऱ्यांना ११६ कोटींची कर्जमाफी मिळाली आहे. जिल्ह्यात अजूनही ६४३२ शेतकऱ्यांना ४५ कोटी लागणार आहेत. औरंगाबाद विभागात चार जिल्ह्यांतील ७५३६९ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून त्यासाठी ६५२ कोटी रुपये लागणार आहेत. 


ओटीएसला शेतकऱ्याचा प्रतिसाद मिळेना
दीड लाखावर थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी वरची रक्कम भरल्यानंतर कर्जमाफी मिळणार आहे. मात्र, वन टाइम सेटलमेंटसाठी शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कापसाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे या योजनेला प्रतिसाद मिळत नाही. 


जिल्ह्यात २४ हजार शेतकरी 
औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४८ हजार १७० शेतकऱ्यांना ४६८ कोटी १६ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेतून ९५२७८ शेतकऱ्यांना १६६ कोटी १० लाख, तर राष्ट्रीयीकृत बँकांकडून ३९१६४ शेतकऱ्यांना २१६ कोटी आणि ग्रामीण बँकेच्या १३२७८ शेतकऱ्यांना ८५ कोटींची कर्जमाफी मिळाली आहे. जिल्ह्यात अजूनही २४५५० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. ही रक्कम २२१ कोटी इतकी आहे. 


आठवी ग्रीन लिस्ट आली नाही 
आतापर्यंत सात ग्रीन लिस्ट आल्या आहेत. त्याद्वारे जिल्हा मध्यवर्ती बँकेने १६६ कोटींची रक्कम वितरित केली. आठवी ग्रीन लिस्ट आली नसल्यामुळे मार्चअखेरपासून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.

- राजेश्वर कल्याणकर, व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती बँक 

बातम्या आणखी आहेत...