आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक; पुन्हा खडसे आणि इशारे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मला पक्षाबाहेर ढकलले जाते आहे’ असे सांगत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी २५ जानेवारीला स्वपक्षीय नेत्यांवरच तोफ डागली.  अर्थात, आपली भारतीय जनता पक्ष सोडण्याची तयारी नाही, अशी पुस्ती जोडायलाही ते विसरले नाहीत. हे सारे त्यांनी पक्षाच्या बैठकीत किंवा स्वत:च्या जाहीर सभेत केले असते तर एक वेळ समजण्यासारखे होते;  पण त्यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाचे व्यासपीठ निवडले आणि माध्यमांना मोठी बातमी पुरवली. हाच नाराजीचा सूर त्यांनी शनिवारीही आळवला. बोदवडला आपल्याच पक्षाचे मंत्री आलेले असताना त्यांनी आपला गुन्हा काय, हे सांगावे असे जाहीर आव्हान स्वपक्षीय नेत्यांना दिले. आपण आता राज्यभर हे बोलत फिरणार आहोत, असेही त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले अाहे. नाथाभाऊंच्या या विधानांमुळे ते पक्ष सोडण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत, असे अंदाज वर्तवले जाऊ लागले अाहेत. 

 
आपल्यावर भाजपच्या नेत्यांनी पक्ष सोडण्याची वेळ आणली अाहे, असे चित्र रंगवण्याचा खडसे प्रयत्न करीत आहेत की वस्तुस्थितीच तशी आहे? अर्थात, खडसे म्हणतात त्यात तथ्य नक्कीच जास्त आहे. फडणवीस मंत्रिमंडळातल्या अन्य मंत्र्यांवर आरोप झाले नाहीत असे नाही. खडसेंवरचे आरोप काहीसे अधिक गंभीर असतीलही, पण गैरव्यवहार ताे गैरव्यवहारच असतो. त्यात लहान आणि मोठा असा भेद करता येत नाही. तरीही खडसेंना राजीनामा द्यावा लागला आणि अन्य मंत्री मात्र आजही मंत्रिमंडळात कायम आहेत. हा दुजाभाव आहे आणि आपल्याला मुद्दाम सत्तेपासून दूर ठेवले जाते आहे अशी भावना त्यामुळेच खडसे यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचीही तीच भावना आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांकडूनही पक्ष साेडण्यासाठी त्यांच्यावर दडपण येते आहे, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. मध्यंतरी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती. त्यात खडसेंना पुन्हा स्थान दिले जाईल, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते सांगत होते. जोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होत नाही ताेपर्यंत तुम्ही शांत बसा,असा सल्लाही त्यांना या ज्येष्ठांनी दिलेला होता. त्यामुळे कितीही आग्रह केला तरी नाथाभाऊ स्पष्टपणे बोलायला तयार होत नव्हते. आता मात्र ते स्वत:च जाहीर सभांमधून स्वपक्षीय नेतृत्वाला आव्हान देऊ लागले अाहेत. त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळ प्रवेशाची अाशा सोडली आहे असे दिसते. पक्षाकडे सत्ता असूनही आपल्याला सत्तेबाहेरच राहायचे असेल तर सत्ताधारी पक्षात राहून उपयोग तरी काय? असा विचारही त्यांनी केला असण्याची शक्यता आहे. म्हणून टोकाची भाषा त्यांनी वापरायला सुरुवात केली आहे असे दिसते. 


असे असले तरी भाजप सोडून अन्य कोणता पक्ष असा आहे, जिथे आजपेक्षा त्यांची परिस्थिती चांगली असेल? काँग्रेस की राष्ट्रवादी? की सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी शिवसेना? स्थानिक पातळीवर या पक्षांची स्थिती कशी अाहे? ज्या मुक्ताईनगर मतदारसंघातून नाथाभाऊ निवडून येतात त्या मतदारसंघात शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी कायमच त्यांच्या विरोधात राहिले आहेत. जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवरही खडसेंना मोठा विरोध शिवसेनेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या मतदारसंघात फारसा प्रभावी नसला तरी जिल्ह्यातील अनेक नेते प्रबळ आहेत. त्या पक्षात राज्य पातळीवर आधीच नेतृत्वासाठी गृहयुद्ध सुरू आहे. अनेक दिग्गज माजी मंत्री आधीपासून रांगेत आहेत. तिथे खडसेंना कुठे स्थान असेल? शिवाय शरद पवार यांनी खडसे विरोधी पक्षनेता असताना केलेले आरोप खडसे विसरणार आहेत का? त्यांना त्यांचे विरोधक ते विसरू देणार आहेत का? राहिला काँग्रेस पक्ष. जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्वच फारसे राहिलेले नाही. शिवाय जिल्हा पातळीवर लेवा समाजाचेच डाॅ. उल्हास पाटील आधीपासून एक स्थान मिळवून आहेत. हायकमांडच्या आदेशावर चालणाऱ्या या पक्षात नारायण राणे यांची काय दुरवस्था झाली हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. अशा परिस्थितीत खडसे तिथे जाऊन काय साधणार आहेत, हा प्रश्नच आहेे. या सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यापैकी काेणत्याही पक्षात जाऊन खडसे यांना सत्ता मिळवता येणार अाहे का, हा मूळ प्रश्न कायमच राहतो. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भलेही भाजपवर नाराजी व्यक्त होईल, पण म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस यापैकी कोणताही पक्ष सत्तेवर येण्याची  चिन्हे आज तरी दिसत नाहीत. अशा स्थितीत नाथाभाऊ त्यापैकी कोणत्याही पक्षात जाऊन काय साधणार आहेत? अर्थात, हा सरळ सोपा विचार खडसेंसारख्या अनुभवी नेत्याने केला नसेल असे वाटत नाही. त्यामुळेच ४० वर्षे खपवून उभ्या केलेल्या पक्षाला सोडण्याचा विचार नाही, असे ते वारंवार सांगत  असावेत. पण भाजपमध्ये राहूनही तेच होणार असेल तर अन्य पक्षात जाऊन भाजपच्या नेत्यांना धडा मात्र ते शिकवू शकतात. तो त्यांचा स्वभावधर्म आहे.


- दीपक पटवे, निवासी संपादक, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...