आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: ‘व्हिडिओकाॅन’वरचे संकट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओकाॅन कंपनीला दिवाळखोर जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याच्या बातम्यांनी कोणाच्या मनात काय भावना निर्माण झाल्या असतील हे सांगता येत नाही. पण मराठवाड्यासाठी, विशेषत: औरंगाबादसाठी ही बातमी अत्यंत क्लेशदायक अशीच आहे. कंपनीने १८ बँकांकडून १७०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे आणि ते वेळेवर परत करण्यात कंपनीला अपयश आले. त्यात स्टेट बँकही आहे आणि तिनेच ही कारवाई सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे अर्ज केला आहे. त्या अर्जाच्या सुनावणीच्या वेळी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने दिवाळखोरी जाहीर करण्यासंदर्भातल्या प्रक्रियेला एक प्रकारे हिरवा कंदील दिला आहे. कोणत्याही यशस्वी कंपनीसाठी ही शुभवार्ता मुळीच नाही.

 

व्हिडिओकाॅनसाठीही नाही. त्यामुळे कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कंपनीच्या या धडपडीला किती यश येते हे लवकरच कळेल. पण केवळ दिवाळखोरीच्या या वृत्तानेच कंपनीचे भवितव्य अंधारात ढकलले गेले आहे हे कसे नाकारता येईल?  
सन २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कंपनीला मिळालेले टूजी स्पेक्ट्रम रद्द केले. त्यानंतर कंपनीला तेलाच्या व्यवसायातही मोठा आर्थिक फटका बसला आणि त्यामुळेच कंपनीचा अचानक अध:पात सुरू झाला असे सांगतात. हीच खरी कारणे आहेत की आणखीही काही आहेत या तपशिलात इथे जायचे नाही. अति सावधगिरीमुळे बँकांनी उचललेल्या पावलांचा कंपनीला फटका बसला आहे की कंपनीने खरोखरच बँकांचे नुकसान केले आहे याचीही चर्चा करायची नाही.

 

कंपनीचा दोष असेल तर कंपनीच्या चालकांना योग्य ती शिक्षा व्हायलाच हवी. पण या सर्व घडामोडींचे होणारे परिणाम हीदेखील एक बाजू आहे आणि त्याचीही चर्चा कोणत्या तरी पातळीवर व्हायला हवी. विशेषत: या कंपनीची पाळेमुळे मराठवाड्यात, औरंगाबादमध्ये आहेत आणि हाच मराठवाडा सध्या नव्या, मोठ्या उद्योगांच्या प्रतीक्षेत आहे. पायघड्या घालूनही उल्लेखनीय अशी मोठी रोजगाराभिमुख कंपनी अजून इथे आलेली नाही. अशा परिस्थितीत व्हिडिओकाॅनसारख्या रोजगारक्षम मोठ्या कंपनीला उतरती कळा सुरू व्हावी. नव्हे, कंपनीच्या अस्ताची चिन्हे दिसू लागावीत ही बाब नकारात्मक संदेश देणारी आणि म्हणून क्लेशदायक आहे. 


व्हिडिओकाॅन ही औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातील नंदलाल धूत यांनी ९० च्या दशकात सुरू केलेली कंपनी. एकीकडे बजाज कंपनी वाढत गेली तशी व्हिडिओकाॅनही वाढत गेली. शहर परिसरात कंपनीने तीन मोठे प्रोजेक्ट सुरू केले होते. त्यातून साधारण साडेपाच हजार कर्मचाऱ्यांना थेट रोजगार मिळाला. याशिवाय कंपनीने आपल्या उत्पादनातील म्हणजे टीव्ही, फ्रिज आणि एसीच्या उत्पादनातील अनेक सुटे भाग बाहेरून तयार करून घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे किमान २१० व्हेंडर्सला कंपनीसाठी छाेटे उद्योग सुरू करता आले आहेत. त्यांच्याकडे तयार झालेला रोजगार वेगळा आहे. शिवाय या कंपनीमुळे वाहतूक व्यवसायाला मोठा रोजगार मिळाला. पॅकेजिंग इंडस्ट्रीला काम मिळाले. या सर्व हातांना मिळालेले काम आणि एक्साइज खात्याला मिळणारा आणि अन्य संस्थांना मिळणारा कर अशा दोन्ही स्वरूपात ही कंपनी औरंगाबादकरांसाठी मोठा आधार आहे.

 

गेल्या तीन महिन्यांपासून कंपनीची अवस्था बिकट होत गेली. कंपनीत आता केवळ १० टक्केच कामगार टिकला आहे असे सांगण्यात येते आहे. कंपनीचे उत्पादनही अत्यल्प होते आहे. त्यामुळे व्हेंडर्स अडचणीत आले आहेत. इथे अॉटो इंडस्ट्रीलाही व्हेंडर्स लागतात. अनेकांना अॉटोबरोबरच व्हिडिओकाॅन कंपनीलाही सुटे भाग पुरवण्याचे काम मिळाले होते. दोन कंपन्यांना मालाचा पुरवठा करायचा म्हणून अनेक उद्याेजकांनी मोठी गंुतवणूक करून ठेवली आहे. आता या कंपनीला मालाची गरज पडत नसेल तर केलेल्या अतिरिक्त गुंतवणुकीचे काय, असा प्रश्न त्यांना पडला आहे. इथले ६० टक्के उद्योजक हे पहिल्या पिढीतले उद्योजक आहेत. त्यातल्या अनेकांसाठी कंपनीची ही अवस्था म्हणजे मोठे संकटच असणार आहे. 


ज्या वेळी मराठवाडा, विशेषत: औरंगाबाद ‘दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर’मध्ये मोठे आणि चांगले उद्योजक यावेत यासाठी चातकासारखी प्रतीक्षा करते आहे. त्याच वेळी मराठवाड्याचा ब्रँड बनलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल्या व्हिडिओकाॅनला हे दिवस यावेत ही बाब या प्रांताविषयी नकारात्मक संदेश देणारी तर ठरणार नाही ना, ही इथल्या संवेदनशील माणसाची चिंता आहे. नकारात्मक संदेश देणाऱ्या असंख्य बाबी आधीच अस्तित्वात असताना त्यात पडलेली ही मोठी भर लवकर आटावी एवढीच अपेक्षा आहे. 

 
- दीपक पटवे

निवासी संपादक, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...