आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- हडको एन-१२ येथील सामाजिक सभागृह वार्षिक ५ हजार रुपये भाड्याने देण्यावरून मोहन मेघावाले आणि सीमा खरात या शिवसेना नगरसेवकांमध्ये शुक्रवारी जोरदार वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की याबाबतचा प्रस्ताव महापौर नंदकुमार घोडेले यांनी निर्णयासाठी राखून ठेवला. या दोघांना शनिवारी खा. चंद्रकांत खैरे यांच्यासमोर उभे करण्यात आले तेव्हा हा वाद मिटला.
मेघावाले नगरसेवक असताना त्यांनी येथे एक सामाजिक सभागृह बांधले होते. ते भाड्याने देण्यासाठी खरात यांनी सर्वसाधारण सभेसमोर अशासकीय प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला मेघावाले यांनी हरकत घेतली. हरकत घेणारे मेघावाले कोण, असा सवाल खरात यांनी केला. तेव्हा मेघावाले यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला. भरसभागृहात एकाच पक्षाचे दोन नगरसेवक एकमेकांच्या विरोधात तुटून पडले. महापौर घोडेले यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
यातून मार्ग काढण्यासाठी महापौर घोडेले यांनी या प्रस्तावावरील निर्णय राखून ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले. शुक्रवारी सभा संपल्यानंतर दोघांमध्ये महापौर दालनातही वाद झाला. दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे घोडेले यांनी हा मुद्दा खासदार खैरे यांच्या कोर्टात नेला. शनिवारी दुपारी दोघांनाही सुभेदारीवर बोलावण्यात आले होते. त्यात समेट घडवून आणण्यात आला. आता प्रस्तावाचे काय करायचे याचा निर्णय महापौर घोडेले घेणार आहेत.
रागात सभागृह सोडले
महापौरांकडून हा प्रस्ताव मंजूर होत असल्याचे समजताच माझ्यासारख्या ज्येष्ठ नगरसेवकाचे ऐकणार नसाल तर मी निघून जातो म्हणत मेघावाले बाहेर पडले. मात्र बाहेर गेल्यानंतर प्रस्ताव मंजूर झाला तर काय, असे म्हणत पुन्हा सभागृहात येऊन मागील बाकावर बसून राहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.