आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅक्टरांच्या परिषद ‘सहलीं’ना छेद; ग्रामीण रुग्णसेवेतूनच मिळतील गुण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) नियमानुसार दर पाच वर्षांनी डॉक्टरांच्या परवान्यांचे नूतनीकरण करावे लागते. यासाठी त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान परिषदांच्या माध्यमातून प्राप्त करून ३० गुण संपादन करावे लागत होते. मात्र, परिषदांच्या नावाखाली डॉक्टरांनी सहली आणि पार्ट्यांवरच भर दिल्याने ग्रामीण आरोग्य बँकेचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. त्यामुळे परवाना नूतनीकरणासाठी गुण मिळवण्याकरिता डाॅक्टरांना आता ग्रामीण भागात जाऊन अतिरिक्त रुग्णसेवा करावी लागणार आहे.  


ग्रामीण आरोग्य बँकेच्या योजनेमुळे विशेषत

ग्रामीण भागातील रुग्णांना फायदा होणार आहे. याशिवाय डॉक्टरांना विविध प्रकारचे रुग्ण हाताळण्याची संधी मिळणार आहे. याविषयी नुकत्याच झालेल्या बैठकीत वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी अनेक सूचना केल्या. या वेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव उपस्थित होते. त्यांनीही या प्रस्तावाला मंजुरी दिली, अशी माहिती समोर आली आहे.  


विविध शहरांतून फाइव्हस्टार हॉटेल्समध्ये वैद्यकीय परिषदांचे आयोजन केले जाते. बड्या औषध कंपन्या या परिषदांचा खर्च उचलतात. या ठिकाणी आलेली तज्ज्ञ डॉक्टर मंडळी तीन किंवा दोन दिवसांतील एखाद्या व्याख्यानाला हजेरी लावतात आणि त्यानंतर त्या त्या भागात पर्यटनाला निघून जातात. त्यामुळे प्रत्यक्षात या परिषदांचा फारसा फायदा होताना दिसत नाही. परिषदेत उपस्थित असलेल्या अनेकांना जेव्हा परिषदेच्या फलिताबद्दल बोलते केले जाते तेव्हा यामध्ये नवीन काय शिकलात, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. त्यामुळे या परिषदा कशा फोल आहेत, हे वारंवार पुढे येते होते. मात्र, परिषदांना असलेल्या गर्दीमागील कारण शोधल्यावर हे निदर्शनाला आले की, दर पाच वर्षांनी परवाना नूतनीकरणासाठी डाॅक्टरांना ५ गुण मिळवणे अत्यावश्यक असते. यासाठी डॉक्टरांची गर्दी किमान नोंदणीदिवशी तरी परिषदेत दिसते. 


ग्रामीण रुग्णांना लाभ : महाजन
डॉक्टरांची तसेच विशेषज्ञ डॉक्टरांची संख्या वाढली असली तरी ग्रामीण  व दुर्गम भागात हे डॉक्टर्स जात नाहीत. आर्थिक अडचणींमुळे रुग्णही विशेषज्ञांकडे जाऊ शकत नाहीत. होमिओपॅथी, आयुर्वेदिक व युनानी डॉक्टरांवर ग्रामीण रुग्णांची मदार असते. ही दरी भरून काढण्यासाठी   ग्रामीण आरोग्य बँक हा प्रभावी उपाय ठरणार आहे, असे  वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.  

 

अशी असेल पद्धती  
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या संकेतस्थळावर याविषयीची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील प्रत्येक डॉक्टरची माहिती आहे. संकेतस्थळावरून डॉक्टरांनी जवळच्या ग्रामीण भागाचा पर्याय निवडायचा आहे. यानंतर अनुलोम संस्थेतील कार्यकर्ते डॉक्टरांच्या विभागानुसार रुग्णांसाठी शिबिराचे आयोजन करतील. याद्वारे डॉक्टर रुग्णांना सेवा देतील. यामुळे रुग्णांना सेवा तर डॉक्टरांना विविध प्रकारचे रुग्ण आणि गुण मिळतील.  

 

 

रुग्णसेवेसाठी आरोग्य बँक हा उत्तम पर्याय   
डॉक्टरांना वैद्यकीय परिषदांच्या माध्यमांतून गुण मिळवण्याची पद्धत होती. मात्र, ग्रामीण भागात जाऊन प्रत्यक्ष रुग्णसेवेतून गुण देण्याची योजना अधिक उत्कृष्ट आहे. हल्ली परिषदांमध्ये येण्याचे डॉक्टरांचे प्रमाण कमी झाले असून सर्जिकल कार्यशाळांची गर्दी वाढली होती. याला ग्रामीण आरोग्य बँक हा उत्तम पर्याय आहे.  
डॉ. रमेश रोहिवाल, अध्यक्ष आयएमए