आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजपुरवठा नसलेल्या नागरिकांना सौभाग्य योजनेअंतर्गत 500 रुपयांत वीज जोडणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- केंद्र सरकारने प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, सौभाग्य या महत्त्वाकांक्षी योजना २५ सप्टेंबर २०१७ रोजी सुरू केल्या. याअंतर्गत महावितरणने ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत राज्यात १०० टक्के विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. प्रत्येक घरात वीज पोहोचावी यासाठी ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना अवघ्या ५०० रुपयांत वीज जोडणी देण्यात येणार आहे. शिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थींना मोफत वीज जोडणी मिळेल. 


सौभाग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणानुसार ११ लाख ६४ हजार १३५ नागरिकांच्या घरात वीज नसल्याचे समोर आले आहे. या सर्वांना वीज जोडणी देण्यात येणार आहे. यापैकी ७ लाख ६७ हजार ९३९ लाभार्थींना पारंपरिक पद्धतीने, तर २१ हजार ५६ लाभार्थींना अपारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. दारिद्र्य रेषेखालील घरे व सौभाग्य योजनेत पात्र घरांना पूर्वी मंजूर झालेल्या पंडित दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेंतर्गत राज्यातील ३ लाख ९६ हजार १९६ घरांना वीज जोडणी देण्याचे काम सुरू आहे. तसेच सौभाग्य योजनेत शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या घरांना वीज जोडणी देण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थींना मोफत वीज जोडणी देण्यात येणार असून इतर लाभार्थींना फक्त ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे ५०० रुपये लाभार्थीने त्याच्या बिलातून १० टप्प्यात भरावयाचे आहेत. 


मोफत वीज जोडणीसाठी लाभार्थी कुटुंबांची पात्रता २०११ च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्यात येणार आहे. योजनेत वीजपुरवठा प्राप्त झालेल्या ग्राहकांना मासिक वीज बिल भरणे बंधनकारक आहे. मात्र, थकबाकीमुळे कायमचा वीजपुरवठा खंडित झालेले घरे, तात्पुरत्या शिबिरातील स्थलांतरित होऊ शकणारी घरे तसेच शेतांमधील घरे या योजनेस पात्र ठरणार नाहीत, अशी माहिती महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. 


डिजिटल डॅशबोर्डद्वारे मिळेल अद्ययावत माहिती 
वीज ग्राहकांना दर्जेदार, गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांना अधिक सुलभ व्हावे या उद्देशाने महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी डिजिटल डॅशबोर्ड तंत्रज्ञान विकसित केले आहे. कर्मचाऱ्यांना डॅशबोर्डवर अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. डॅशबोर्डवर वीज जोडणी, ग्राहक तक्रारी, ऊर्जा अंकेक्षण, वीज विक्री, महसूल व वसुली, साधनसामग्री, विविध प्रकल्पाची प्रगती, वितरण व वाणिज्यिक हानी, ग्राहक वर्गवारी, ग्राहक वर्गवारीनुसार वीज वापर, वीज देयकाची अद्ययावत माहिती, वीज देयक भरणा, मीटर रीडिंग आदींची माहिती मिळेल, असे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले. 

 

वीज जोडणीसाठी येथे साधा संपर्क 
वीजपुरवठा नसलेल्या नागरिकांनी सौभाग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या जवळच्या कार्यालयाशी किंवा १८००२००३४३५ / १८००२३३३४३५ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा. 


मीटरसोबत चार्जिंग पॉइंट, एलईडी बल्ब मोफत 
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉइंट, एक एलईडी बल्ब मोफत देण्यात येणार आहे. तसेच अतिदुर्गम भागात ज्या ठिकाणी पारंपरिक विद्युतीकरण करणे शक्य नाही अशा घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा करण्यात येईल. त्यांना अंतर्गत वायरिंगसह एक डीसी पंखा, पाच एलईडी बल्ब आणि एक डीसी चार्जिंग पॉइंट मोफत देण्यात येईल. पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदिम योजना व इतर योजनेतून तयार झालेल्या घरांनासुद्धा मोफत वीजपुरवठा देण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...