आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील २ हजार २८३ अतिदुर्गम वाड्या, वस्त्या अन् पाड्यांवर आजही वीज पोहोचली नाही, पंतप्रधानांचा दावा ठरतोय फोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचल्याचा दावा केला आहे. मात्र, महाराष्ट्रातील २ हजार २८३ अतिदुर्गम वाड्या, पाड्यांत आजही वीज पोहोचलेली नाही. यात नंदुरबार या एकाच जिल्ह्यातील ४४ वाड्या- पाड्यांचा समावेश आहे. तसेच ३ लाख ५० हजार घरगुती ग्राहक व २ लाख ४५ हजार कृषी पंपधारक शेतकरी अनेक वर्षांपासून वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील ५ हजार कृषी पंपधारक औरंगाबाद जिल्ह्यातील आणि ९०० ग्राहक शहरातील आहेत. 

 

राज्यातल्या ग्रामीण भागातील १ कोटी ४० लाख २६ हजार ३५६ घरांपैकी १ कोटी ३७ लाख ९२ हजार १२५ घरांत वीज पोहोचली आहे. उर्वरित २ लाख ३४,२२८ आणि शहरातील मिळून एकूण साडेतीन लाख ग्राहक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत अजूनही आहेत. १ लाख ६ हजार ९३९ वाड्या-पाड्यांपैकी ९८ हजार ३५६ वाड्यापाड्यांत वीज पोहोचली असून २ हजार २८३ अतिदुर्गम वाड्या-वस्त्या पाड्यांवर आजही वीज पोहोचलेली नाही. त्यात नंदुरबार या आदिवासीबहुल जिल्ह्यातील भादल, भरड, झुनामा, शेल्डा, सारगीरसह ४४ अतिदुर्गम भागातील पाडे, वस्त्यांचा समावेश आहे. 


यामुळे वीज पोहोचली नाही 
डोंगर, पाडे आणि अतिदुर्गम भागात विजेची उपकरणे वाहून नेण्यासाठी चांगले रस्ते नाहीत. येथे पारंपरिक वीज पोहोचवणे अतिशय आव्हानात्मक काम असल्यामुळे महाऊर्जाद्वारे सौर ऊर्जा कार्यान्वित करण्याचा निर्णय झाला. प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र झालेली नाही. 


वीज वितरण, ट्रान्समीटर प्रणाली कुचकामी 
राज्य वीजनिर्मितीत सक्षम झाले असून एकाच दिवशी २३ हजार मेगावॅट विजेची मागणी पूर्ण करण्यात महावितरणला यश आले आहे. परराज्यात वीज वितरण केली जाते. मात्र, महाराष्ट्रातील जीर्ण वाहिन्या, जमिनीला टेकलेले रोहित्र व जमिनीकडे झुकलेल्या वाहिन्या अतिशय धोकादायक ठरत आहेत. यामुळे १५०० पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. वाऱ्याचे झुळूक आले तरी वीजपुरवठा खंडित हाेतो. याचा राज्यातील दीड कोटीवर ग्राहकांना फटका बसतो. 


उत्पन्नाला मोठा फटका 
राज्यातील सव्वादोन कोटी कृषी पंपधारक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. कोटेशन भरूनही त्यांना अद्याप वीज जोडणी दिलेली नाही. पाणी असूनही वीज नसल्याने शेतकऱ्यांना उत्पादन घेता आले नाही. दुष्काळात, पावसाच्या खंडात पिके जगवता न आल्याने उत्पादनाला मोठा फटका बसला. त्याचा राज्य व राष्ट्रीय उत्पन्नातील वाट्यावर परिणाम होत आहे. 


नागरिक अजूनही प्रतीक्षेत 
नंदुरबार, गडचिरोली, अमरावती जिल्ह्यांतील आदिवासी पाड्या, वस्ती, दुर्गम भागातील गावांमध्ये जेथे विद्युत खांब, वाहिन्या घेऊन जाणे अशक्य आहे, अशा ठिकाणी महाऊर्जाच्या वतीने सौर कंदील, सौर दिवे, सौर चूल देण्याचा निर्णय झालेला आहे. राज्यातील १२१४ गावांतील लाखांवर नागरिक पारंपरिक ऊर्जेबरोबरच सौर ऊर्जेची प्रतीक्षा करत आहेत. 


५ हजार कोटींची तरतूद 
राज्यातील संपूर्ण गावात वीज पोहोचली. पण २ हजारांवर वाड्या, वस्त्या, पाडे आजही विजेपासून वंचित आहेत, हे वास्तव आहे. १ हजार ७०४ वाड्यापाड्यांना सौभाग्य योजनेतून, २३२ वाड्यापाड्यांना दीनदयाल योजनेतून आणि ३४७ वाड्यापाड्यांना स्थानिक विकास निधीतून डिसेंबर २०१८ पर्यंत वीज जोडणी देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. २.४५ कोटी कृषी पंपधारकांना वीज जोडणी देण्यासाठी पाच हजार कोटींची तरतूद केली पी. एस. पाटील, राज्य मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण. 

बातम्या आणखी आहेत...