आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दंगलींनंतर पोलिस दलाची हिंमत खचली; सहायक पोलिस आयुक्त कोळेकरांचे भावनिक पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- 'सर, आपण मुंबईला आलात आणि औरंगाबाद पोलिसांची ताकद संपली. तुमचा वचक असल्याने गुंडागर्दी बंद होती. तुम्ही गेलात आणि आमची हिंमत खचली. कोरेगाव भीमा, कचरा प्रकरण आणि नुकत्याच झालेल्या दंगलीत पोलिस जखमी झाले. अापली आठवण औरंगाबादकर व आम्हाला नेहमी येते,' हे शब्द आहेत दंगलीत गंभीर जखमी झालेले व सध्या मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात उपचार घेणारे सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांचे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका डायरीच्या पानावर अमितेशकुमार यांना उद्देशून पत्र लिहिले. 


११ मे रोजी रात्री गांधीनगर, लोटाकारंजा भागात दंगल उसळली. अकरा वाजता जमावाने दगडफेक सुरू केली. त्यांना थांबवण्यासाठी कोळेकर व क्रांती चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी प्रयत्न केले. यात दोघेही गंभीर जखमी झाले. काेळेकर यांच्या श्वसननलिका व स्वरयंत्राला गंभीर दुखापत झाली. सिग्मा रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहा दिवसांपूर्वी शुद्धीवर आल्यावर त्यांनी कागदावर लिहून 'दंगल थांबली का, परोपकारी कसे आहेत? ' अशी विचारणा केली होती. त्यानंतर नुकतेच त्यांनी डायरीच्या पानावर काही लिहिण्याचा प्रयत्न करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. अमितेशकुमार सर, तुम्ही शहरात असायला हवे होता, अशी अपेक्षाच त्यांनी यात व्यक्त करत सध्याची शहर पोलिसांची परिस्थिती समोर आणली. 


मीनाबाजारवरूनच सुरू झाली दंगल
काेळेकर यांनी लिहिलेल्या पत्रात दंगलीचे नेमके कारण विशद केले आहे. गांधीनगर येथील हनुमान मंदिरापासून एक मोर्चा मोतीकारंजा भागाच्या दिशेने जात होता. दोन समाजाच्या गटांमध्ये दगडफेक सुरू झाली. मोतीकारंजावर मला दगड लागला. दोन वेळा असेच झाले. कचरा वाद प्रकरणात (पडेगाव दंगल) आम्ही (श्रीपाद परोपकारी आणि काेळेकर) दोघेच गेलो होतो. शहागंज ते सिटी चौकदरम्यान मीनाबाजार भरू द्यायचा नाही, असे लच्छू पहिलवान व शिवसेना म्हणत होती. पण दुसरा गट आम्ही तेथेच बाजार भरवणार यावर ठाम होता. 


प्रभारी आयुक्त भारंबे यांचेही मानले आभार
काेळेकर यांनी प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांचेही आभार मानले आहेत. ते म्हणतात, सर मी व माझे कुटुंब आपले, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे यांचे आभारी आहोत. नशिबाच्या पुढे कोणीच जाऊ शकत नाही. त्यामुळे समाधानी राहावे, असेही कोळेकर यांनी शेवटी लिहिले आहे. 

बातम्या आणखी आहेत...