आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थाई मुलींकडे बनावट पासपोर्ट; सेक्स रॅकेटप्रकरणी प्रोझोन मॉलचीही होणार चौकशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- प्रोझोन मॉलमधील स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटमध्ये अटक केलेल्या थायलंडच्या एका मुलीकडे बनावट पासपोर्ट आढळला असून एक पासपोर्ट असलेली मुलगी बेपत्ता असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्या मुलीचा शोध सुरू असून थाई दूतावासाशी चर्चा सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली. 


डिसेंबर रोजी प्रोझोन मॉलमधील अनंतरा आणि दि स्ट्रेस हब या दोन स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी धाड टाकली होती. त्यात देहविक्री करणाऱ्या थायलंडच्या नऊ मुलींना ताब्यात घेतले होते. त्यांना सध्या सुधारगृहात ठेवले आहे. या नऊपैकी दोन मुलींकडे बनावट पासपोर्ट आढळले. यामुळे बनावट पासपोर्ट तयार करून मानवी तस्करीसारखे प्रकार चालत असल्याचा दाट संशय यादव यांनी व्यक्त केला. याच्या पाठीमागे स्पा मालक डेरिक मचदो आणि फैजन शेख आहेत. 

 

दोघांनीच मुलींना बनावट पासपोर्टवर देशात नंतर शहरात आणले. त्यानंतर देहविक्रीसाठी वापरले. मुलींची चौकशी करण्यासाठी दुभाषकाची मदत घेण्यात येत असून बनावट पासपोर्ट, त्यांचे भारतातील वास्तव्य कसे असते, किती दिवसांचे आहे, त्यांना भारतात आणणारे नेमके कोण, याचा उलगडा यातून होईल, असे यादव यांनी सांगितले. 

 

नऊपैकी एका मुलीच्या व्हिसाची मुदत संपलेली आहे. मुदत संपल्यानंतरही देशात वास्तव्य केले जात होते. याप्रकरणी पासपोर्ट अधिकारी दूतावासाला कळवण्यात आले आहे. दरम्यान, हा सर्व गैरप्रकार प्रोझोन मॉलमध्ये सुरू होता. त्यामुळे प्रोझोन व्यवस्थापनाचीदेखील या प्रकरणात चौकशी केली जाणार असल्याचे आयुक्त म्हणाले. बनावट पासपोर्ट, व्हिसाची संपलेली मुदत यांसारखे गंभीर मुद्दे समोर आल्यानंतर प्रकरणाची खोली वाढत जात आहे. मागील सहा दिवसांपासून एमआयडीसी सिडको पोलिस प्रकरणाचा तपास करत होती. परंतु बुधवारी गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्याकडे तपास सोपवण्यात आला. 


मारहाणीचा आरोप खोटा
दरम्यान,‘स्पा’ चालक शशांक यशदीप खन्ना याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी बुधवारी १५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. खन्नाला काल न्यायालयात हजर केले असता त्याने पोलिस उपायुक्त दीपाली घाडगे यांच्यासमक्ष गणवेशातील दोन पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला मारहाण केल्याची तक्रार न्यायालयात केली होती. त्यावरून न्या. वमने यांनी त्याचा जबाब नोंदवून घेऊन खन्नाची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश मंगळवारी पोलिसांना दिला होता. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी खन्नाला न्यायालयात हजर करून वैद्यकीय अहवाल सादर केला. त्यात त्याला मारहाणीच्या कुठल्याही खुणा आढळल्या नाहीत.


स्पामालक मानवी तस्करच
स्पा सेंटरचे मालक मचदो आणि शेख यांचे देशभरात स्पा सेंटर आहेत. प्रोझोन मॉलप्रमाणे त्यांचे नागपूर, पुणे, मुंबईसह संपूर्ण देशात वीसपेक्षा अधिक स्पा सेंटर आहेत. या सर्व ठिकाणी तो टुरिस्ट व्हिसा आणि बनावट पासपोर्टच्या आधारे थायलंडवरून मुली आणत होता. तसेच एका शहरात महिनाभर ठेवून दुसऱ्या शहरात नेत असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांचे एक पथक मुंबईला गेले असता दोघेही घर सोडून पळाले आहेत. बनावट पासपोर्ट आढळल्याने मानवी तस्करीचा हा प्रकार असल्याचे यादव म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...