आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस ठाण्यात तोडफोड; शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वालांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जुन्या शहरात उसळलेल्या दंगलीच्या कारणांपैकी एक कारण समजल्या जाणाऱ्या गांधीनगरातील गॅरेजचालकावरील चाकूहल्ला प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना सोडा म्हणत, क्रांती चौक पोलिस ठाण्यात रविवारी रात्री अकराच्या सुमारास जाऊन दादागिरी, तोडफोड करत पोलिसांना धमक्या आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप शिवनारायण जैस्वाल (५९, रा. शकुंतला निवास, रॉयल रेसिडेन्सी, निराला बाजार) यांना सोमवारी दुपारी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर जैस्वाल हे राजकीय नेते असल्यामुळे त्यांची सुटका केल्यास ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, असा युक्तिवाद पोलिसांच्या वतीने केल्यानंतर जैस्वालांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर जैस्वाल यांची हर्सूल तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. मंगळवारी पुन्हा त्यांना सत्र न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज करता येईल. 


क्रांती चौक पोलिसांनी हाणामारी, धमकी दिल्याप्रकरणी गांधीनगरातील विशाल रवी कागडा (१९), रोहित सुमेश डुलगज (१९) आणि सुमीत ऊर्फ शेरा प्रेम कागडा (२६) यांना गुरुवारी रात्री अटक केली होती. या तिघांमुळेच ११ मे रोजी गांधीनगरात वादाला सुरुवात झाली होती. रविवारी रात्री जैस्वाल क्रांती चौक पोलिस ठाण्यात गेले आणि विशाल कागडा आणि रोहित डुलगज या दोघांना लगेच जामिनावर सोडून द्या म्हणत त्यांनी ठाण्यात राडा सुरू केला. त्या वेळी पोलिस ठाण्यात जमादार चंद्रकांत निवृत्ती पोटे, तांदळे, महिला जमादार सिंधू गिरी, मंगला सोनवणे, आशा अडागळे, संगीता राजपूत आणि सहायक फौजदार संजय बनकर हजर होते. 

जैस्वालांची मागणी ऐकून ठाण्यातील पोलिसांनी सहायक पोलिस निरीक्षक शेख अकमल यांना बोलावून घेतले. अकमल यांनी जैस्वालांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाच पोलिस अटक करीत आहे. तुम्ही व तुमचे वरिष्ठ अधिकारी माझ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहात, असे म्हणत पोलिसांसमोर वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच या मुलांना सोडले नाही तर उद्या शहरात काय घडते ते बघा अशी धमकी दिली आणि जैस्वाल निघून गेले. थोड्या वेळाने पुन्हा पोलिस ठाण्यात येऊन त्यांनी ठाणे अंमलदार पोटे यांच्या टेबलवरील काच पेन स्टँडने फोडत खुर्च्या अस्ताव्यस्त फेकून दहशत निर्माण केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रभारी अधिकारी विजय घेरडे यांनी धाव घेतली. त्यांनी जैस्वाल यांना समजावून सांगितले. जैस्वालांसोबत सात ते आठ कार्यकर्ते होते. यानंतर चंद्रकांत पोटे यांच्या तक्रारीवरून जैस्वालांविरुद्ध सरकारी कामात अडथळा व सरकारी नोकरदारांना मारहाण केल्याप्रकरणी भादंविच्या कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६, ४२७, सहकलम ७ नुसार गुन्हा दाखल केला. 


जैस्वाल यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. व्ही. खारकर यांनी सुनावली. जैस्वालांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. जैस्वाल यांच्यावतीने `अड. अशोक ठाकरे, अड. अभयसिंह भोसले, `ड. गोपाल पांडे, अड. विष्णू मदन, अड सचिन शिंदे, अड. उमेश रूपारेल यांनी काम पाहिले. सरकारी वकिलांनी त्यांच्या जामिनास विरोध केला. प्रशासन व अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याने पुढेही हाच प्रयोग त्यांच्याकडून केला जाण्याची शक्यता असल्याचे न्यायालयास सांगण्यात आले. 


जैस्वालांच्या गटाचे दोघे आधीच हर्सूलमध्ये 
दंगलीनंतर आठवडाभरात पोलिसांनी शिवसेनेच्या तिघांना अटक केली. नगरसेवक राजेंद्र जंजाळ, नगरसेविकेचे वडील लच्छू पहिलवान आधीच अटकेत आहेत. सोमवारी जैस्वाल तुरुंगात गेले. विशेष म्हणजे राजेंद्र जंजाळ आणि लच्छू पहिलवान हे दोघेही जैस्वालांच्या विश्वासू गटातील आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यावर महापौर नंदकुमार घोडेलेंसह अनेक कार्यकर्ते न्यायालयात आले होते. खासदार चंद्रकांत खैरे मात्र दिल्लीत आहेत. 


सोशल मीडियावर मात्र चर्चा स्टंटबाजीची 
जैस्वालांच्या अटकेनंतर ही राजकीय स्टंटबाजी असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर सुरू झाल्या. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे वातावरण निवडणुकीच्या दीड वर्ष अाधीच तापायला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघातील हिंदू मतदारांत आपले स्थान पक्के करण्यासाठी जैस्वालांचा हा स्टंट असल्याच्या काही पोस्ट सोशल मीडियावर फिरत होत्या. 


गुलमंडी, केळी बाजार बंद 
गुन्हा नोंदवून जैस्वालांना अटक करण्यापूर्वी पोलिसांचा मोठा फौजफाटा क्रांती चौक पोलिस ठाण्यात मागवण्यात आला. नजीकच्या सर्वच पोलिस ठाण्यांतील निरीक्षकांसह राज्य राखीव बल, वज्र वाहन, बॉडी प्रोटेक्टर असलेले जवान तैनात करण्यात आले. जैस्वालांना अटक केल्याचे समजताच गुलमंडी व केळी बाजारातील व्यापाऱ्यांनी भीतीपोटी दुकाने बंद केली.


दंगलीतील सहभागाबाबतही आता पोलिस करणार विचारपूस 
जैस्वाल यांनी पोलिसांना उद्या शहरात काय होते, असे धमकावले आहे. हाच मुद्दा पुढे करत पोलिसांनी जैस्वाल यांची पोलिस कोठडी मागितली होती. दंगलीच्या गुन्ह्यात विविध पक्षांचे कार्यकर्ते अटक होत आहेत. यासाठीही जैस्वाल दबाव आणतील, असे कारणही पोलिसांकडून समोर केलेे. त्यामुळे त्यांचा दंगलीशी नेमका काय संबंध आहे याचा तपास करायचा आहे. ११ ते १२ मे रोजी झालेल्या दंगलीत सहभाग होता काय याची विचारपूस करायची आहे, असे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास उपनिरीक्षक ए. जी. सूर्यवंशी करत आहेत. 


पोलिस घरी येताच जैस्वाल स्वत:च्या वाहनाने ठाण्यात 
जैस्वाल यांना अटक करण्यासाठी उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलिस आयुक्त ज्ञानोबा मुंडे यांनी निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, अनिल आडे आणि प्रल्हाद घोडके यांनी त्यांच्या घरी पाठवले. तेथे चर्चा झाल्यानंतर जैस्वाल यांनी स्वत:च्या गाडीत पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर होत असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिस त्यांच्या घरापासून काही अंतरावर थांबले. जैस्वाल यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि कार्यकर्ते दुपारी तीनच्या सुमारास क्रांती चौक पोलिस ठाण्यात दाखल झाले. तेथून जैस्वालांना पोलिस वाहनाने घाटीत वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. यानंतर पोलिसांनी त्यांना थेट न्यायालयात नेले. 

बातम्या आणखी आहेत...