आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: प्रदीप जैस्वाल घाटीत; शिवसैनिक-नेत्यांची आयआयसीयूत नियम मोडून गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- क्रांती चौक पोलिस ठाण्यात राडा केल्यामुळे सोमवारी अटक होऊन हर्सूल तुरुंगात रवानगी झालेले शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांना मंगळवारी छातीत दुखू लागल्याच्या तक्रारीमुळे घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उच्च रक्तदाबामुळे प्रकृती बिघडल्याचे प्राथमिक तपासणीनंतर औषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले. मात्र, जैस्वालांना भेटण्यासाठी शिवसैनिकांचे ताफे रुग्णालयात दाखल झाले आणि आयआयसीयूचा प्रोटोकॉल मोडीत काढत त्यांनी तेथ गर्दी केल्यामुळे या विभागातील इतर रुग्णांना त्रास झाला. 


जैस्वालांना सकाळी १० च्या सुमारास घाटीत आणले. आपत्कालीन विभागात तपासून त्यांना औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या आयआयसीयू विभागात दाखल करण्यात आले. छातीत दुखत असल्याची त्यांची तक्रार होती. तपासणीत त्यांचा रक्तदाब वाढल्याचे दिसून आले. सोबतच मधुमेहामुळे साखरेचे प्रमाणही वाढलेले आहे. मात्र, हृदयविकाराचा झटका नसल्याचे डॉ. भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले आहे.


जुन्या शहरात उसळलेल्या दंगलीच्या कारणांपैकी एक कारण समजल्या जाणाऱ्या गांधीनगरातील गॅरेजचालकावरील चाकूहल्ला प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना सोडा म्हणत, क्रांती चौक पोलिस ठाण्यात रविवारी रात्री अकराच्या सुमारास जाऊन दादागिरी, तोडफोड करत पोलिसांना धमक्या आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप शिवनारायण जैस्वाल (५९, रा. शकुंतला निवास, रॉयल रेसिडेन्सी, निराला बाजार) यांना सोमवारी दुपारी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर जैस्वाल हे राजकीय नेते असल्यामुळे त्यांची सुटका केल्यास ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, असा युक्तिवाद पोलिसांच्या वतीने केल्यानंतर जैस्वालांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर जैस्वाल यांची हर्सूल तुरुंगात रवानगी करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...