आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लासूरमध्ये 9 महिन्यांत लुटीच्या चार माेठ्या घटना, दाेन खून; अाराेपी अद्यापही माेकाटच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासूर स्टेशन- जाजू दांपत्याला  मारहाण करून झालेल्या जबरी चोरीच्या निषेधार्थ येथील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांनी सकाळी दहा वाजता नागपूर-मुंबई महामार्गावरील सावंगी चौकात तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.  येथील पोलिस चौकीसाठी पंधरा कर्मचारी वाढवून देण्याची तसेच पंधरा दिवसांत या गुन्ह्याचा तपास लावण्याचे आश्वासन प्रभारी पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर दुपारी दीड वाजता रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, या आंदोलनामुळे नागपूर-मुंबई एक्स्प्रेस मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने हायवेच्या दुतर्फा एक-एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.


दरम्यान, लासूरमध्ये झालेल्या घटनांची चाैकशी सुरू असून, लवकरच अाराेपी गजाअाड असतील, असा विश्वास  प्रभारी एसपी उज्ज्वला वनकर यांनी व्यक्त केला अाहे. व्यापाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.    तर कोणत्याही परिस्थितीमध्ये यावर  मार्ग काढण्यात येईल. राज्य शासन एकाच वेळेला राज्यातील नवीन पोलिस ठाण्यांची घोषणा करणार आहे. यात  लासूर स्टेशन आणि वाळूज येथे पोलिस ठाणे निर्मिती करून घेऊ, अशी ग्वाही आमदार प्रशांत बंब यांनी दिली. 


पोलिसांची संख्या कमी
शिल्लेगाव  ठाण्याची हद्द  वरखेड ते वरझडी अशी ७५ किलोमीटरमधील ७४ गावे इतकी असून एक जीप ३ पोलिस अधिकारी व ३३ पोलिस कर्मचारी आहेत. मात्र हे मनुष्यबळ  १९६१ च्या जनगणनेनुसार आहे. 


दाेन खून, तपास जैसे थे....
१९ जून २०१७ :
सायंकाळी सातच्या सुमारास लघुशंकेसाठी नागपूर-मुंबई महामार्गावरील शिवानी हॉटेलजवळ थांबलेले  प्रतिष्ठित बी-बियाणे व्यापारी इंदरचंद मुथा यांना  शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या इनोव्हा कारमधून लाखो रुपयांची   रक्कम चोरून नेली होती. या गुन्ह्याचाही तपास लागलेला नाही. 


२७ सप्टेंबर २०१७: रोजी मध्यरात्री राजुलबाई माणिकचंदजी पाटणी या  ज्येष्ठ महिलेचा चोरट्यांनी खून करून लाखोंचा ऐवज लुटून नेला.  या घटनेचाही अद्याप तपास लागला नाही.


१५ नोव्हेंबर २०१७: रोजी मध्यरात्री लासूर स्टेशन येथील वृद्ध व्यापारी केशरचंद जाजू यांच्या घरी दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत २९ लाखांच्या ऐवजाची लूट करीत केशरचंद जाजू यांचा खून केला. याही घटनेचा अद्याप तपास नाही. 


२० फेब्रुवारी २०१८: रोजी मध्यरात्री   प्रतिष्ठित आडत व्यापारी विनोद जाजू  व त्यांच्या पत्नीला जबर मारहाण करत ५ लाख ६० हजारांचा ऐवज लुटला गेला. 

 
व्यापारी झाले अाक्रमक; म्हणाले, जगणं कठीण झालं
लासूर स्टेशन व परिसरात खून, जीवघेणे हल्ले आणि चोरीच्या घटनांचा  अद्याप तपास लागलेला नाही.  त्यामुळे आमचा पोलिसांवर भरवसाच राहिला नाही,  अशा तीव्र भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या. जाजू दांपत्यावरील चोरट्यांच्या हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ   लासूर स्टेशन-सावंगी येथील नागरिकांनी दुकाने बंद ठेवून निषेध नाेंदवला. दरम्यान, वैजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, अतिरिक्त पाेलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर, उपजिल्हाधिकारी संदीपान सानप,  स्थानिक पोलिस ठाण्याचे सपोनि मिलिंद खोपडे, एलसीबीचे सुभाष भुजंग यांनी आंदोलनकर्त्यांची  समजूत घालण्याचा प्रयत्न केला.  परंतु येथे एसपींना बोलवा  असा पवित्रा अनिल चंडालिया, भरत पाटणी, कैलास जाजू, सचिन पांडे, आनंद लड्डा, महावीर पाटणी, विशाल मुंदडा, उपसभापती संपत छाजेड, उपसरपंच गणेश व्यवहारे, दिलीप पवार, जनार्दन पा. तायडे, नारायण वाकळे, नितीन कांजुने, अमोल शिरसाठ, दिगंबर गोटे, दीपेश नाबरिया आदींनी घेतला.

 

आम्ही जगायचे कसे?
लासूरच्या दोन व्यापाऱ्यांचे खून झाले. आता या घटनेत जाजू गंभीर जखमी आहेत.  मागील घटनेचाही  तपास लागलेला नाही.  आम्ही कसे जगायचे? अंधार पडताच भीती वाटते.  घरच्यांना धाक वाटतो. अशा किती घटना घडल्यावर आरोपींना पकडणार.   
- अनिल चंडालिया, जिल्हा सचिव, मनसे 


पोलिस बळ वाढवावे
सतत घडणाऱ्या घटनांमुळे लासूरमध्ये दहशत निर्माण झाली आहे.  पोलिसांनी अनोळखी व्यक्तींची कसून चौकशी करावी.   मोठी बाजारपेठ असल्याने लासूर स्टेशनला पोलिस बळ वाढवून  पेट्रोलिंग वाढवावी. त्यामुळे अशा घटना घडणार नाहीत.
- संपत छाजेड, उपसभापती, पंचायत समिती  तथा उद्योजक 


घटना कशी घडली: सुषमा जाजू यांच्या एफअायअारनुसार
साेमवारी रात्री जेवण झाल्यानंतर अाम्ही ११ वाजता झाेपी गेलाे. रात्री दीड वाजेच्या सुमारास मला काही तरी अावाज जाणवला. यानंतर मी जागी झाले. तेव्हा माझ्यासमाेर दाेन अनाेळखी इसम उभे दिसले. यातील एक उंच तर दुसरा उंचीने कमी हाेता. त्या दाेघांना पाहिल्यावर मी माेठ्याने अाेरडले असता त्यापैकी उंची कमी असलेल्या इसमाने लोखंडी पट्टी माझ्या डाव्या पायांवर मारली व ‘चिल्लाअाे मत, तुम्हारे पास जाे भी है वाे दे दाे’ असे म्हणून धमकावू लागला. या वेळी भीतीने माझ्या बांगड्या, गळ्यातील साेन्याची पाेत त्यांना काढून दिली. अावाजाने माझे पतीही जागे झाले. यानंतर उंच इसमाने त्याच्या हातातील लाेखंडी पट्टीने माझ्या पतीला मारण्यास सुरुवात केली. ‘तुझे ताे मार देंगे, तेरे पास जाे है वह दे दे’ अशी धमकी त्याने दिली. यानंतर माझ्या पतीनेही त्यांच्या गळ्यातील साेन्याची चेन व हातातील दाेन अंगठ्या दिल्या. चोरट्यांनी माझ्या पतीच्या कानावर लाेखंडी पट्टी मारल्याने त्यांच्या कानाला दुखापत झाली अाहे. यानंतर पुन्हा त्यांनी धमकावत कपाटातून राेख रक्कम व काही दागिने काढून घेतले. ‘हम जाने के बाद अावाज मत कराे, चिल्लाअाे मत वरना फिर तुम्हारे घर अाएंगे’ अशी धमकी देत ते दाेघे इसम साडेतीन वाजता निघून गेले. सकाळी रस्त्यावर वर्दळ सुरू झाल्यानंतर मी बाहेरील व्यक्तींना अावाज देत घडलेली घटना सांगितली व पाेलिसांनाही याची कल्पना दिली. यानंतर माझ्या पतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...